पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते. पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या या अभिनव प्रदर्शनाचे उद्घाटन काल शनि. दि ७ जाने. ला नेहरू प्लॅनेटेरियमचे संचालक श्री. अरविंद परांजप्ये यांच्या हस्ते झाले.
या प्रदर्शनात प्रशस्त अशी सात दालने होती. अंतरिक्ष अर्थात space याविषयाची सर्व माहिती विविध रंजक पद्धतीने विशद करण्यात आली. वातावरणाचे स्तर, आपली सूर्यमाला, ग्रह , तारे, नक्षत्र, आकाशगंगा याविषयी मॅाडेल्स, चार्ट्स, दृकश्राव्य माध्यमातून विस्तृत माहिती अतिशय रंजक पद्धतीने देण्यात आली. याशिवाय अवकाशयानातून दर्शकांना अवकाश भ्रमणाचा अनुभव देण्यासाठी अतिशय कल्पकतेने अवकाशयानाची मांडणी करण्यात आली होती.तर अंतराळवीराचे अवकाशातील जीवन कसे असते? दिनक्रम कसा असतो हे सर्व अवकाशयानाच्या आतील रचनेतून विद्यार्थ्यांना अनुभवता आले. याशिवाय भारतीय प्राचीन साहित्याचे अवकाशासंदर्भातील योगदान या विषयी कित्येक संदर्भ स्पष्ट करणाऱ्या चित्रफितीचे दर्शकांनी कौतुक केले. दोन दिवस हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले होते . सुमारे दहा हजाराहून अधिक विद्यार्थी,पालक आणि नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. बोरिवली, गोरेगाव इ ठिकाणच्या शाळांतून शिक्षक व विद्यार्थी हे प्रदर्शन पाहण्यास खास आले होते.





