विद्यालयाचे उद्घाटन
पहिल्या सर्वसाधारण सभेच्या मूळ इतिवृत्ताचे छायाचित्र
आज मिती जेष्ठ शु ४ गुरुवार शके १८४३ (दिनांक ९ जून १९२१) रोजी सकाळी ८ वाजता पार्ले टिळक विद्यालयाचे उद्घाटन झाले. हस्तपत्रके पाठवून व स्टेशनवर वगैरे चिकटवून विलेपार्ले येथील तमाम लोकांस व काही बाहेरील सभ्य गृहस्थांस या समारंभास निमंत्रणे केली होती. समारंभास ६० लोक हजर होते. हा गोड समारंभ श्री त्रिं. मो. उर्फ दादासाहेब पारधी यांच्या बंगल्यात झाला.या समारंभाचे अध्यक्षस्थान पार्ल्यातील एक जुने नागरिक श्री. विष्णु बाळकृष्ण उर्फ तात्यासाहेब परांजपे यांना देण्यात आले होते.
या समारंभास मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कनिष्ठ बंधु डॉ. नारायण दामोदर सावरकर हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षांचे परवानगीने श्री वि.स घाटे यांनी शाळेचा पूर्वेतिहास संगितला ते म्हणाले की,
“मुंबईस मराठी भाषा बोलणाऱ्यांच्या शिक्षणाच्या सोयी अनेक आहेत.परंतु बी.बी. सी. आय. रेल्वे लगतच्या गावातून मुंबई किंवा दादर येथील शाळेत मुले धाडणे पालकांस फार अडचणीचे व धोक्याचे वाटते. साधारणपणे दादर सोडल्यावर बी.बी.सी.आय. रेल्वेवर सांताक्रूझ ,विलेपार्ले ,मालाड ,बोरिवली ,विरार इत्यादी ठिकाणी मराठी बोलणाऱ्यांची वस्ती फार आहे. त्यातल्या त्यात विलेपार्ले येथी हवा चांगली असून ते गाव मुंबईपासून फार दूरही नाही व फार नजिकही नाही.
या ठिकाणी जर एखादी शिक्षण संस्था निघाली तर ती वर सांगितल्याप्रमाणे लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचे एक केंद्रस्थान होऊन बसेल हि गोष्ट विलेपार्ले येथिल लोकांच्या लक्षात बरेच दिवसापासून होती. तसेच राजातर्फे व प्रजातर्फे राष्ट्राच्या अभ्युदयासाठी चाललेल्या घडामोडींमुळे प्रचलित शिक्षणाची व्यंगेंही स्पष्ट दिसू लागली होती.
ती लक्षात घेउन लोकमान्य टिळक स्मारक फंड कमिटी व पार्ले सार्वजनिक मंडळ या दोहोंच्या सुंदर मिलाफामुळे व तसेच पार्ल्यातील उदार धनिक, उद्योगी व सुशिक्षित लोक यांचा जोडयत्न यामुळे पार्ले टिळक विद्यालय उघडण्याचा आज मंगल समारंभ होत आहे. त्यास पुष्कळ लोकांनी हजर राहून त्या विद्यालयासम्बधी आपली प्रेमाची भावना व्यक्त केली.
खरोखर कार्य अजून पुढेच आहे परंतु ते कार्य वर सांगितलेल्या पार्ले येथील लोकांच्या जोडगुणामुळे अव्याहत चालण्याची अशा आहे. यानंतर कै.श्री.गोपाळराव फाटक (विद्यालयाचे तेव्हाचे खजिनदार) यांनी अध्यक्षांना विद्यालयाचे नावाचा फलक दिग्दर्शित करून विद्यालयाचे उद्घाटन करण्यास व लोकमान्य टिळकांचे छायाचित्रास पुष्पहार अर्पण करण्यास विनंती केली. उद्घाटनानंतर अध्यक्षांनी विद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त केली.
मग डॉ. नारायणराव सावरकर यांचे विद्यालयाच्या अभिनंदनपर भाषण झाले. डॉक्टरसाहेबांनी लोकमान्यांच्या जीवनकार्याची थोडी माहिती देउन पार्लेकरांना त्यांनी अंगीकृत कार्याचे महत्व ध्यानी आणून दिले व संस्थेस शुभाशीर्वाद दिला.
यानंतर अध्यक्ष श्री. तात्यासाहेब परांजपे यांनी सर्वास या कार्याचे शुभ चिंतून त्यास हातभार लावण्याची विनंती केली.
आभार प्रदर्शन , हारतुरे, मुलांस खाऊ वगैरे झाल्यावर हा छोटासा गोड समारंभ पार पडला.
पार्ले टिळक विद्यालय शाळेचे सुरुवातीचे वर्ग
पार्ले टिळक विद्यालयाचा पहिल्या दिवशीचा पहिला विद्यार्थी
श्री. कृ. शं. पटवर्धन , बी. एस्सी. , एस. टी. सी.
शिक्षक , आ. पो. हायस्कूल , सांताक्रूझ
पार्ले टिळक विद्यालय शाळेचे प्रवेशपत्रक
पार्ले टिळक विद्यालयाचे आद्य संस्थापक
मुलींचे शिक्षण – शतकमहोत्सवी सदर क्र 2
१९२१ साली पार्ल्यात वस्ती फार नव्हती. मुलींच्या शिक्षणाची आबाळ होत होती. त्यांच्या शिक्षणाची सोय करण्याचे महत्वाचे कार्य करणाऱ्या तीन धडाडीच्या भगिनींची दखल आपल्याला घ्यावीच लागेल.
त्या भगिनी होत्या चंद्राबाई पारधी , कमलाबाई भिडे व गंगाबाई उर्फ बगूताई कुंटे .
या मुलींच्या शिक्षणाची सुरवात जानेवारी १४, १९२१ रोजी मकरसंक्रांतीचे दिवशी सार्वजनिक हळदीकुंकवाचे निमित्त करून श्री दादासाहेब पारधी यांच्या बंगल्यावर झाली.
चंद्राबाई पारधी , गंगाबाई उर्फ बगूताई कुंटे व कमलाबाई भिडे या मुलींना शिकविण्याचे काम स्वत: हौसेने व कर्तव्यबुद्धीने करीत असत. उपकरणे व साहित्य लागत असे तो सर्व खर्च. पारधी या एकट्या सोशित. या शिकणाऱ्या सर्व मुली जुलै १९२१ पासून पारले टिळक विद्यालयाच्या मराठी शाळेत दाखल झाल्या.
या तिन्ही भगिनींचा परिचय थोडक्यात पुढे दिला आहे. यातून आजच्या पिढीतील मुलींना निश्चित प्रेरणा मिळेल.
चंद्राबाई त्रिंबक पारधी :
चंद्राबाई त्रिंबक पारधी ह्या पार्ले टिळक विद्यालयाच्या आद्यप्रवर्तकांपैकी श्री दादासाहेब पारधी यांच्या पत्नी होत.
मुलींच्या हरएक शिक्षण बाबतीत चंद्राबाई पारधी लक्ष पुरवीत. शिवणकाम शिक्षणाची त्यांनीच सुरुवात केली. अगदी प्रारंभीच्या दोन वर्षात तर पारधी यांची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या ऑनररी लेडी सुप्रीटेंडंट म्हणून नेमणूक केली होती. हे काम पारधी यांनी आनंदाने केले. पारधी यांचे विद्यालयावर मुलीसारखे प्रेम होते. १९२६ ते १९३० च्या दरम्यान ५/६ वर्षात त्या मुलींच्या ‘ गर्ल गाईड’ पथकाच्या मार्गदर्शिका होत्या. विद्यालयातील सुमारे २५-३० मुलींचे गर्ल गाईड पथक यशस्वीरीत्या चालविण्याचा मान पारधी यांचा आहे. या पथकाच्या सहली , प्रवास, कॅम्पस, परेड्स वगैरे कार्यक्रमांना स्वत: पारधी याच चालना देत. या त्यांच्या कामात विद्यालयातील शिक्षिका श्रीमती रमाबाई रोडे व कुमारी कुसुम गुप्ते या दोघी मदत करीत.
सन १९३० च्या जानेवारीत मकरसंक्रांतीचे सुमारास विद्यालयात एक मोठे ‘ स्त्रियांच्या हस्त कौशल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्या प्रदर्शन कमिटीच्या पारधी या अध्यक्ष होत्या. या प्रदर्शनाइतके आकर्षक व मोठे असे प्रदर्शन यापूर्वी पार्ल्यात भरले नव्हते. या प्रदर्शनाचे सजावटीस श्री. त्रिं. मो. पार्धी यांनी बरीच मदत केली होती व पुष्कळसे प्रचारकार्य विद्यालयातील एक शिक्षक कै. श्री. भी. गु. कुळकर्णी (कु. यशोद ) यांनी केले होते.
पारधी ह्या जरी विश्वविद्यालयीन पदवीधर नसल्या तरी अनुभवजन्य ज्ञानाच्या बाबतीत त्या फार थोर होत्या. विलायतेतील शिक्षणसंस्था त्यांनी पाहिल्या होत्या. शिक्षण पद्धतीचे दोष हे मुलींच्या शिक्षणातून अजिबात वगळून त्यांची शारिरीक व बौद्धिक वाढ कशी होईल त्या पद्धतीचे व संसारी जीवनास पोषक असे शिक्षण मुलींच्या शाळांतून चालू झाले पाहिजे असे त्यांचे मत होते.
कमलाबाई भास्कर भिडे:
कमलाबाई भिडे ह्या पार्ले टिळक विद्यालयाच्या आद्यप्रवर्तकांपैकी भास्करराव भिडे यांच्या पत्नी होत. त्या शीघ्र कवयित्री होत्या.त्या शिक्षिका म्हणून चांगले काम करीत. हसतमुख चेहरा, आनंदीवृत्ती व खेळीमेळीने काम करण्याचा उत्साह या गुणांमुळे त्या सर्वांनाच हव्या हव्या असे वाटे.
गंगाबाई शंकर कुंटे: (बगूताई कुंटे):
चंद्राबाई पारधी व कमलाबाई भिडे यांच्या बरोबरीनेच पुढाकार घेऊन मुलींच्या शिक्षणाची सोय करण्यात बगूताई याही होत्या.पार्ल्यांतील स्त्रियांच्या हरएक हितसंबंधी बाबीत जातीने लक्ष घालत.
पार्ल्यातील अनेक संस्थांमध्ये आपुलकीने काम करण्यात त्या नेहमी पुढे होत्या .त्या विशेषत: स्त्रियांच्या चळवळीत पडून स्त्रियांच्या उत्कर्षासाठी खटपट करण्यात पुढाकार घेत.
शाळेची सुरवात : शतकमहोत्सव सदर क्र.3
जून ९, १९२१ या दिवशी पार्ले टिळक विद्यालय हि मराठी शाळा स्थापन झाली. आद्य संस्थापक श्री भिडे यांच्या बंगल्यातील खोलीमध्ये वर्ग सुरु झाले.सुरवातीला इंग्रजीचे दोन वर्ग तर मराठीचे ३ वर्ग होते.त्यावेळी पाचवी पासून पुढील इयत्ताना इंग्रजी शाळा तर इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळेला मराठी शाळा म्हणत. मराठी शाळा पारधी यांच्या घरी भरत असे.
जून १९२१ महिन्याचा अहवाल
1.शाळा लोकांस माहिती व्हावी या हेतूने लोकमान्य पत्रात ३ वेळा जाहिरात द्यावी व १००० पर्यंत शाळेचे माहितीने भरलेली वृत्तपत्रके वाटावी असे ठरले.
वर उल्लेखल्याप्रमाणे शाळा हि दोघा संचालकांच्या घरात भरवली जात होती. असे असताना शाळेची माहिती असलेली १००० वृत्तपत्रके वाटायचे ठरवले. यावरून दिसते कि आद्य संस्थापकांनी पहिल्यापासून मोठ्या शाळेचे स्वप्न पाहिले होते.
2.फक्त ७ मुले असताना शाळेची तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अभिप्राय मजेदार आहे.
“काम बरे चालले आहे. मुले शिस्तीची दिसतात.”
जुलै १९२१ महिन्याचा अहवाल
जुलै या एका महिन्यात झालेला अभ्यास बघून आश्चर्य वाटते. आणि तरी शालेय तपासनीसांचा अभिप्राय ” काम बरे चालले आहे “असाच आहे.
शाळा सुरु झाल्यावर शाळेच्या व्यवस्थापनेने पहिल्या काही महिन्यात घेतलेले निर्णय व केलेल्या सूचना *
1.चिटणीसाने दरमहिन्यास सभेपुढे दरमहिन्याचा मासिक अहवाल सादर करीत जावा.
2.शाळेच्या व्यवस्थापनाने सभेमध्ये चर्चा करुन “मराठी शाळेतील मुलींस फी न घेता मोफत शिक्षण द्यावे असे ठरवले.” ही सभा १२ जून १९२१ साली झाली होती.
3.विलेपार्ले येथे मुलींची इंग्रजी शाळा नसल्याने पार्ले टिळक विद्यालयाच्या मुलांच्या शाखेत पालकांच्या परवानगीने दुय्यम शिक्षण घेऊ इच्छिणार्या मुलींना विद्यालयात दाखल करून घ्यायची परवानगी दिली (दुय्यम म्हणजे इयत्ता पाचवींच्यापुढे)
4.मुलींनी शाळा सुरु झाल्यावर १० मिनिटांनी यावे व सुटण्यापूर्वी १० मिनिट आधी जावे.
मुलींसाठी खास घेतलेल्या या निर्णयामागे संस्थेच्या संचालकांचा मुलींच्या शिक्षणाविषयीचा उदार दृष्टिकोन दिसून येतो. शतकमहोत्सव सदर क्र.4: विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत
विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत
आपण पाहिले कि सुरवातीला इंग्रजी शाळांचे वर्ग भास्कर भिडे यांच्या घरी तर मराठी शाळांचे वर्ग दादासाहेब पारधी यांच्या घरी भरत असत. थोड्याच अवधीत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. पहिल्या वर्षाच्या अखेरीसच शाळेला मिळणारा प्रतिसाद बघून शाळेसाठी एक स्वतःच्या मालकीची स्वतंत्र इमारत असावी व त्या दिशेने त्वरित प्रयत्न करावेत असे ठरले. विद्यालयाचे अनेक हितचिंतक होते आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या देणगीतून शाळेचा दैनंदिन खर्च भागत असे. परंतु शाळेची इमारत बांधण्यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक होते.
सर्वात प्रथम जर कुणी पाऊल उचलले असेल तर ते पार्ल्यातील दानशूर व्यक्ती श्री विष्णू बाळकृष्ण परांजपे यांनी. त्यांच्या मालकीची असलेली ९६६ चौरस वार मौल्यवान जागा विद्यालयाला विनामूल्य दिली.तसेच त्या जागेच्या पूर्वेस व उत्तरेस रस्तेही बांधून दिले.
या व्यतिरिक्त श्री फाटक व श्री पारधी यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये, भास्कर राव भिडे व शंकरराव कुंटे यांनी प्रत्येकी पाचशे रुपये तर इतर हितचिंतकांनी अनेक छोट्या मोठ्या देणग्या दिल्या.
या भांडवलाचे आधारावर चैत्र शुद्ध ९ शके १८४४ ( ६ एप्रिल १९२२) रामनवमीच्या मुहूर्तावर इमारतीचे बांधकामाला सुरुवात झाली. इमारतीचे आराखडे मुंबईतील कोरा आणि भट या कंपनीच्या चालकांपैकी पैकी श्री सी बी कोरा यांनी तयार केले व ते कार्य त्यांनी विद्यालयासाठी विनामूल्य केले.
एकंदर इमारत बांधकामासाठी येणाऱ्या खर्चाची कल्पना देण्यात आली होती. या इमारत बांधकामाच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी या कामांमध्ये हिरीरीने भाग घेतला व उदार धनिकांच्या देणग्या व स्वावलंबी स्वयंसेवकांची मेहनत यांचा सुंदर समन्वय विद्यालयाच्या स्थापनेपासून दिसून येत होता.
सन १९२३ च्या प्रथमार्धात विद्यालयाची इमारत विद्यालयाचे मालकीचे जागेत उभी राहिली. इमारतीची वास्तुशांत दादासाहेब पारधी व त्यांच्या पत्नी चंद्राबाई पारधी यांच्या हस्ते झाली. मार्च १९२३ सुमारास शाळेचे वर्ग या नव्या इमारतीत भरू लागले. श्री विष्णू बाळकृष्ण परांजपे यांनी विद्यालयाला क्रीडांगणासाठी सुमारे सव्वाचार हजार वाराचा विस्तृत प्लॉट विनामूल्य दिला . दादासाहेब पारधी यांनी आर्थिक बाजू उचलली. त्यांचे इमारत बांधकामापोटी सुमारे ३५००० रुपये खर्च झाले. विद्यालयाच्या कामात अनेक व्यक्तींनी आपल्या परिस्थितीनुसार यथाशक्ती मदत केली. काहींनी शारीरिक तर काहींनी आर्थिक.
आता विद्यालयाला स्थैर्य प्राप्त झाले. परंतु हे स्थैर्य प्राप्त करून देण्याचे श्रेय मुख्यत्वेकरून दोन व्यक्तींना जाते . ते म्हणजे तात्यासाहेब उर्फ विष्णू बाळकृष्ण परांजपे व दादासाहेब उर्फ त्रिंबक मोरेश्वर पारधी.या दोघांनीही निरपेक्ष बुद्धीने दिलेले दान होते. आपले कुठे नाव द्यावे अशी अपेक्षाही नव्हती.
अशा ह्या सात्विक दानाच्या अधिष्ठानावर पार्ले विद्यालय असोसिएशन हि संस्था उभी आहे.खरंतर हि संस्था नसून विद्यादानाचे एक पवित्र मंदिर आहे.या मंदिरात विद्यादानाचा नंदादीप अखंड तेवत राहील.
शतकमहोत्सव सदर क्र.5: औद्योगिक शिक्षण व सरकारी मान्यता
विद्यालयाची स्वतःच्या मालकीची इमारत १९२३ साली झाली आणि मार्च १९२३ पासून शाळेचे वर्ग या नवीन इमारतीत भरण्यास सुरवात झाली. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने ह्या शाळेची स्थापना झाली होती. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यावेळच्या संचालक मंडळावर होता. लोकमान्य टिळकांचा बौद्धिक शिक्षणाबरोबरच औद्योगिक शिक्षणावर सुद्धा भर होता. विद्यालयाचे ध्येय ठरवताना औद्योगिक शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन ते मूळ ध्येयामध्ये समाविष्ट करण्यात आले.जीवनास उपयुक्त असे पायाशुद्ध शिक्षण देण्याचा संस्थेचा हेतू होता. टिळक विद्यालयाचा विद्यार्थी सतेज बुद्धिमान व स्वावलंबी झाला पाहिजे. या दृष्टीने औद्योगिक शाखा काढण्याचे ठरवले.
विद्यालयाचे ध्येय :
बौद्धिक व औद्योगिक शिक्षण हे विद्यालयाचे ध्येय अगदी आरंभापासून होते. या ध्येयामध्ये लवकरचं शारिरीक शिक्षणाची भर पडून पूर्वीचेचं ध्येय थोडे व्यापक करण्यात आले. या ध्येयानुसार फक्त औद्योगिक शिक्षणाबाबतची बाब सोडून मुलामुलींची बौद्धिक व शारीरिक प्रगती करण्यासाठी सर्व व्यवस्था करावी असे नमूद करण्यात आले.
औद्योगिक शिक्षण :
सन १९२३ पासून १९२६ अखेरपावेतो औद्योगिक खाते चालू होते. विद्यालयातून नुसते कारकून बाहेर पडण्याऐवजी सुशिक्षित कारागीर बाहेर पडले तर ते आधिक चांगले असे वाटत असल्यामुळे औद्योगिक शाखा काढण्यात आली. औदयोगिक शिक्षण हा राष्ट्राचा पाया आहे. बौद्धिक शिक्षणास जर औद्योगिक शिक्षणाची जोड मिळाली नाही तर बुद्धिजीवी व्यक्तीला निराशेने तळमळत बसावे लागेल असे संचालक मंडळाचे ठाम मत होते.
या शाखेत विणकाम, सुतारकाम, बागायत यासारखे विषय शिकविले जात. मुलींना शिवण वर्ग होता.लहान मुलामुलींना कागदकाम व मातकाम यासारखे विविध विषय ठेविले होते.
औद्योगिक विभागात प्रवेश घेणाऱ्या मुलांकडून थोडीशी वेगळी फी घेतली जात असे. या मुलांना वेळापत्रकात ४० मिनिटांचे २ तास विणकाम व सुतारकाम यासाठी दिलेले असत. त्यावेळी पुष्कळसे स्थानिक विद्यार्थीचं विद्यालयाचा शिक्षण फायदा घेणारे असल्यामुळे ते शाळेच्या ठरीव वेळेबाहेरही बागवाना बरोबर बागायतीचे व्यवसायात्मक प्रात्यक्षिक शिक्षण घेऊ शकत असत. औद्योगिक शाखा त्यावेळी तरी लोकप्रिय होती यात संदेह नाही.
विणकाम शाखा :
ही शाखा ३ वर्ष चालू होती. १९२३ पासून विणकाम वर्ग सुरु झाले. या वर्गात सुताच्या लड्या तयार करणे, बोबिन्स भरणे,फणीभरणे, ताणा तयार करणे, मागावर कापड विणणे, या सर्व गोष्टी शिकविल्या जात. तो काळ स्वदेशीच्या जास्त पुरस्कारचा होता.मुलांना विणकामात हौस वाटे. या विभागाकरिता पॉवर लूम्स आणले होते.श्री दाते हे विणकाम शिक्षक होते.
कापड विक्रीसंबंधी त्यावेळी संचालक मंडळाने व्यवस्था केली होती. यात विक्रीची किंमत व वितरणाच्या बाबतीत विचारविनिमय झाला. त्यानुसार कापडात सुताची किंमत एका वारास जी पडेल ती व त्यात मजुरी, इतर खर्चाकरिता ३ आणे प्रत्येक वारास मिळवून जी येईल ती विक्रीची किंमत धरावी असे ठरले. या खात्यात तयार होणारा माल –(रुमाल ,धोतरे,शर्टिंग वगैरे) खपविण्याची तजवीज चालकांपैकी श्री.पारधी व श्री. गणेश पेठे यांनी केली होती. मागाची व्यवस्था व्यापारी नफा तोट्याचे दृष्टीने चालवावी कि केवळ शिक्षण म्हणून चालू ठेवावी या विषयी तज्ज्ञांची समिती नेमली.त्या समितीचा रिपोर्ट सोबत दिले आहेत.
शेवटी आर्थिकदृष्टया बुडीत खाते म्हणून विणकामाचा वर्ग बंद करावा लागला.
सुतारकाम :
या विभागाची व्यवस्था शिक्षक श्री. रावजी रणछोड यांजकडे होती. विद्यालयाच्या आरंभीच्या लाकडी सामानसुमानाचे पुष्कळसे भाग या सुतारवर्गातील मुलांनीच तयार केले होते.
बागायत :
मुले हौसेने बागेत काम करायला तयार असत. विद्यालयाच्या परीसरातील फुलझाडांची मशागत मुलेच हौसेने करीत असत. शाळेस विहीर नसल्यामुळे बाग करणे अव्यवहार्य ठरत होते.
शिवणकाम व हस्तकौशल्य वर्ग:
मुलींना ३ इयत्तापर्यंत शिवण कामाची सोय करुन दिलेली होती. मुलामुलींना कागदकाम व मातकाम यांचेहि शिक्षण देण्याची वेळोवेळी तजवीज केलेली होती. तथापि कागद व मातकाम यांसारख्या स्वतंत्र अशा उपयुक्त विषयांचे शिक्षक हवे तेव्हा नेहमीच मिळू शकतात असे नाही.
म्हणून विद्यालयाने श्रीमती रमाबाई रोडे यांना मुद्दाम कागदकाम व फॅन्सी वर्क या विषयांचे स्वतंत्ररीत्या शिक्षण घेण्याकरीता पाठवून त्यांचेकडे कागदकाम व मातकाम वगैरे विषय सोपविले होते. मुलांच्या छंदवृतीस (Hobbies) भरपूर वाव मिळावा यासाठी दरसाल एक हस्तकौशल्याचे प्रदर्शन भरविण्याचा सामान्य प्रघात होता.
वरीलपैकी बागकाम शिवणकाम हस्तकला अजूनही चालू आहे. ज्या औद्योगिक शिक्षणाचा लोकमान्यांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी पुरस्कार केला होता तेच आता जॉब स्किल या नावाने शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे.विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी / विद्यार्थिनी स्वावलंबी होतील अशी व्यवस्था केल्यास ती लोकमान्यांना खरी आदरांजली होईल .
सरकारी मान्यता (१९२५ ते १९२८ )
शाळा वाढता वाढता काही मुले इंग्रजी सहावी पास झाली .यापुढे विश्वविद्यालयास शाळा जोडून विद्यार्थ्यांना ज्ञानाचा पुढील मार्ग खुला करून देणे जरूर होते. यासाठी प्रथमच शाळा मुंबई विश्वविद्यालयास जोडून घेण्याचा व सरकारी मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात कायमचे यश मिळून देण्याचा मुंबई विश्वविद्यालयाचा व सरकारच्या शिक्षण खात्याचा प्रघातच नसल्यामूळे केवळ आमच्या प्रयत्नास तात्पुरते यश व हंगामी मान्यता या दोघांकडून मिळाली. परंतु ती देताना वेळोवेळी निरनिराळ्या अधिकाऱ्यांनी व युनिव्हर्सिटी कमिशनने जी कसून कसोटी लावली त्यास पुरे पडण्यातच पाच वर्षे गेली.सरकारी ऑफिसरला तर प्रथम हि असहकारितेतली राष्ट्रीय शाळा आहे असे वाटले. सरकार अशा चरख्याच्या शाळा मान्य करणार नाही असे शाळेत न येता ऑफिसमधील खुर्चीत बसून सांगू लागले, त्यांना ऑफिसमधील खुर्ची सोडून शाळेत इन्स्पेक्शनसाठी यावयास लावण्यातच व शिवाय पत्रव्यवहार , कित्येक प्रत्यक्ष भेटी , खुलासा, स्टॅस्टिस्टीक्स वगैरेची माहिती पुरविणे यासाठी सहा महिने खर्ची घालावे लागले. इन्स्पेक्शनसाठी अधिकारी एकदा, दोनदा नाही तर तीनवेळा सुद्धा येऊन गेले..पण याचा एक चांगला परिणाम झाला तो म्हणजे सरकारी मान्यतेमुळे मुलांची संख्या वाढू लागली. वेळोवेळी केलेल्या तपासणी अधिकाऱ्यांचे अहवाल सोबत दिले आहेत.
वरील अनुभव त्यावेळच्या संचालकांना व शाळा चालवणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याना (१९२५ ते १९२८ मध्ये) आला होता. लोकमान्य टिळक द्रष्टे होते. त्यांनी आधीच ओळखले होते कि ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीतून कारकून तयार होतील.पण त्यांच्यात राष्ट्रीय अस्मिता जागृत होणार नाही. चरख्याच्या शाळा मान्य करणार नाही या सरकारी ऑफिसरच्या वक्त्यव्यावरून हे स्पष्ट होते . तसेच ब्रिटिशांनी नोकरशाही व त्यांच्याकडून राबविले जाणारे प्रशासन याची एक घट्ट वीण बनवली होती. ही व्यवस्था एवढी बळकट आहे कि भल्या भल्यांना त्यात बदल करणे अवघड जात आहे.
शतकमहोत्सव सदर क्र. ६ : शालेय अभ्यासक्रम व इतर उपक्रम
सदर क्र. ५ मध्ये आपण औद्योगिक शाखेची विद्यालयात काय व्यवस्था होती तसेच विद्यालयाला सरकारी मान्यता मिळवताना किती अडचणी आल्या ते आपण पाहिले. टिळक विद्यालयाचा विद्यार्थी सतेज बुद्धिमान व स्वावलंबी झाला पाहिजे. विद्यालयाच्या ध्येयानुसार मुलामुलींची बौद्धिक व शारीरिक प्रगती करण्यासाठी सर्व व्यवस्था करावी असे घटनेत नमूद करण्यात आले होते. पार्ले टिळक शाळेने स्वतःच्या मालकीची इमारत झाल्यावर १९४६ पर्यंतच्या कालावधीत विद्यालयाचे ध्येय साध्य करण्यासाठी काय व्यवस्था केली होती व ती कशी यशस्वी झाली ते आपण पाहू या.
बौद्धिक प्रगती :
बौद्धिक वाढीस आवश्यक असणाऱ्या इतर क्रमिकेतर शैक्षणिक बाबींकडे सुरवातीपासून लक्ष पुरवले जात असे. यात मुलांकरिता वाचनालय, वक्तृत्व सभा, सहली, छात्रसमिती, खेळांचे सामने, शालेय उत्सव , निबंध स्पर्धा इत्यादींचा अंतर्भाव त्यात होता.
शाळेतून हिंदुस्थानी भाषेच्या परीक्षेला बसवत असत. शिवाय मराठी साहित्य संमेलनाचे वतीने घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या ” प्राज्ञ” व “विशारद” या परीक्षेसाठी सुद्धा विदयार्थ्यांची तयारी करून घेतली जात असे.
क्रमिकेतर उपक्रमातील विशेष बाबींकडे आपले लक्ष वेधतो :
‘विद्यार्थ्यांचे पार्लमेंट’ :
मुलामुलींना बौद्धिक शिक्षण देताना ‘हुकमसे चलना’ अशी त्यांची परावलंबी भूमिका राहू न देता त्यांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव व्हावी, आपल्या आंगच्या बहुविध गुणांचे आविष्करण करण्यास संधी मिळावी, भावी नागरिक जीवनास उपयुकत ज्ञान संपादिता यावे, लोकसंग्रह करताना येणाऱ्या थोड्याफार अडचणींची जाणीव व्हावी, अशा अनेक दृष्टींनी विद्यालयाच्या अध्यापकांनी सन १९२८ च्या अखेरीस ‘विद्यार्थ्यांचे पार्लमेंट’ या नावाचा एक विभाग काढला विद्यालयाच्या प्रगतीतील एक महत्वपूर्ण टप्पा या नात्याने या मुलांच्या पार्लमेंटचे स्थान मोठे आहे, म्हणूनचं त्या घटनेचे व कार्याचे समालोचन करणे आवश्यक आहे.
पार्लमेंटचे काम छात्रमतानुवर्ती होण्याकरीता मुलांमधून प्रतिनिधीची निवड केली जाई. प्रतिनिधीची संख्या ३५ असून त्यात २५ मुलगे व १० मुली असत. पार्लमेंटची मुदत १ वर्षाची असून त्याचा अध्यक्षही प्रतिनिधींमधूनच निवडला जाई. या अध्यक्षीय निवडणुकीस शिक्षकसंघ व विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचीही समंति मिळावी लागत असे. क्रीडामंडळ, उत्सवमंडळ, कन्यामंडळ, स्टेशनरी स्टोअर्स ही चार पार्लमेंटची मंडळे असून प्रत्येक मंडळावर तीन पार्लमेंटचे सभासद व दोन सल्लागार शिक्षक शिक्षकसंघातर्फे निवडले जात. याशिवाय अध्यक्ष , खजिनदार, चिटणीस यांच्या कामांची वाटणी केलेली असे. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत पार्लमेंटने निवडलेल्या तात्पुरत्या अध्यक्षांचे मार्फत सभेचे काम चाले. मतभेदाचा प्रश्न उद्भवल्यास शिक्षकसंघाचा निर्णय मान्य केला जाई.
इतिहास मंडळ या नावाचे एक मंडळ त्याचवेळी विद्यालयात कार्य करीत होते. तिची व्यवस्था श्रीयुत रत्नपारखी व श्रीयुत आ. रा. चितळे या दोन शिक्षकांकडे सुपूर्त केली होती. विद्यालयाचे दृष्टीने पार्लमेंटची घटना अभूतपूर्व होती. कारण पार्लमेंटचा अध्यक्ष विद्यार्थी असे व पार्लमेंटचा सालीना तनखा ६०० रुपयांचा असे. शिक्षक केवळ सल्लागार होते. व मुख्याध्यापकांची पार्लेमेंटचे कामावर पूर्णतया देखरेख असे.
छात्रसमिती :
विद्यालयात सध्या अस्तित्वात असलेल्या छात्रसमितीचे मूळ बीज १९२८ साली स्थापन झालेल्या याच विद्यार्थ्यांच्या पार्लमेंट मध्ये आढळून येते.
सन १९३० ते १९३६ या सहा वर्षांच्या सुप्तावस्थेनंतर १९३६ च्या डिसेंबर महिन्यात विद्यालयाचे त्यावेळचे मुख्याध्यापक श्री. रा. म मराठे यांनी पार्लमेंटचे छात्रसमितीच्या रूपाने पुरुज्जीवन केले. सन १९३६ च्या डिसेंबरच्या ८ तारखेस स्थापन झालेल्या प्रथम छात्रसमितीचे मुख्याध्यापक श्री. रा. म.मराठे यांनी नियुक्त केलेले अध्यक्ष श्री. मा. सी. पेंढारकर व कायम कार्यवाह निवडले असल्यामुळे समितीच्या कार्यात त्यांना बराच वेळ खर्चून कामाकडे लक्ष पुरविता आले. शिवाय मुख्याध्यापक हेही समितीबाहेर राहून दोषांचे निरीक्षण करून योग्य ते मार्गदर्शन पदाधिकाऱ्यास करीत असत.
विद्यार्थ्यांनी केलेले नियम त्यांच्याकडून लवकर पाळले जातात.त्यायोगे स्वयंस्फूर्तीने शिस्त पाळण्याची सवय लागते.निरनिराळ्या उपक्रमांमध्ये जबाबदारीची कामे करण्यामुळे स्वावलंबनाचे शिक्षण मिळते. शिवाय नेतृत्वाचे बीजारोपण होते. हि छात्रसमिती शिस्त परिषद , ग्रंथ संग्रहालय, स्टोअर्स , वाचनालय, खेळ व विद्यार्थी सहाय्यक मंडळ चालवते. ह्या समितीला दोन शिक्षक मार्गदर्शक असत. प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनापासून कार्यवाहीपर्यंत सर्व जबादारी समितीची असते, हा स्वयंस्फूर्त शिस्तीचा प्रयोग शिक्षणशास्रात नवीन होता.
मुलांची हस्तलिखित मासिके :
छात्रसमितीच्या वतीने पहिल्या “आत्मस्वरूप” नावाच्या द्वैमासिकाचा अंक फेब्रुवारी १९२९ मध्ये प्रसिद्ध झाला. विद्यालयाचा हा वाङ्मयीन प्रयत्न विशेष होता, यातील लेखात विविधता आणि नावीन्य होते व त्याचा दर्जाही वरच्या प्रतीचा होता. पण एका वर्षातच हे द्वैमासिक बंद झाले. त्याची जागा इतर हस्तलिखितांनी घेतली. उदा. अरुण,प्रकाश ज्योती, किरण, विकास, प्रदीप, उदय. पण एकही मासिकाला “आत्मस्वरूप” ची आठवण मिटवता आली नाही.
सृष्टीनिरीक्षणगृह :
शरीरशास्त्रास आवश्यक त्या अवयवाचे नमुने व खनिज वस्तूंचा संग्रह इथे ठेवले होते. शिवाय डास, बेडूक, किडे इत्यादी प्राण्यांची प्रत्यक्ष वाढ विद्यार्थ्यांना पाहता येते व तारीखवार नमूद करता येते. झाडांची वाढ कशी होते ते सुद्धा विद्यार्थी इथे शिकत होते. या निरीक्षणाकरिता गोवारी भेंडी इत्यादी भाज्या लावण्यात आल्या होत्या.
शालेय उत्सव :
विद्यालयात विविध उत्सव साजरे केले जायचे. त्या उत्सवांमधील विशेष उपक्रम फक्त नमूद करणार आहे.
टिळक पुण्यतिथी :
कोणातरी प्रथितयश पुढाऱ्याचे व्याख्यान होऊन टिळक पुण्यतिथी साजरी करण्याची परंपरा २५ वर्षे चालू होती. लोकमान्य टिळकांच्या चरित्राचे परिशीलन निबंध व व्याख्यानाद्वारा करण्याची प्रथा होती.
ज्ञानेश्वर पुण्यतिथी :
प्राचीन मराठी भाषा , ज्ञानेश्वरांचे भाषाप्रभुत्व, संतवाङ्मयाची महती व गोडी याचे ज्ञान आणि ज्ञानेश्वरी वाचनाची गोडी लागावी या हेतूने आदरणीय सोनोपंत दांडेकर यांच्यासारख्या वारकरी संप्रदायातील वक्त्यांची प्रवचने होत.
गीताजयंती:
भगवद्गीतेतील नेमून दिलेल्या अध्यायाचे पाठांतर व एखादे व्याख्यान ठेवले जाई.
दासनवमी :
रामदासचरित्र व महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास व्हावा म्हणून व्याख्याने ठेवली जात.
शिवराज्याभिषेक:
पोवाडे व चरित्रकथन या स्वरूपात हा दिन साजरा व्हायचा.
विजयादशमी:
प्रत्येक महाराष्ट्रीय विद्यार्थ्याने स्वकर्तव्य म्हणून मराठ्यांच्या इतिहासाचे अध्ययन केले पाहिजे. या हेतूने दसऱ्याच्या वेळेस मराठयांच्या इतिहासासंबंधी विषय निबंधाकरिता ठेवले जात. सांघिक कवायत घेतली जाई.
गणेशोत्सव शारदोत्सव हे उत्सवही निबंध , वक्तृत्व , हस्ताक्षर, नाटक, पाठांतर, नकला , काव्यगायन इत्यादी विविध स्पर्धा घेऊन साजरे व्हायचे
वक्तृत्व कला :
१९३६ मध्ये छात्रसमिती स्थापन झाल्यावर वक्तृत्व प्रधान कार्यक्रम आखून दर बुधवारी सभा घेण्याचे ठरले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विदयार्थ्यांनी अनेक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रशंसनीय कामगिरी केली, त्याचे सर्व पातळीवर कौतुक झाले.
सहली :
त्याकाळीही लांब पल्ल्याच्या सहली काढल्या जात होत्या. १९३२ व १९३३ साली सहलीची ठिकाणे होती गोवा, हंपी, विजयनगर, सोलापूर , दिल्ली, ग्वाह्लेर आग्रा, मथुरा इत्यादी,
शारीरिक शिक्षण:
१९२७ साली विद्यालयाचे संघांनी बडोदा येथील ‘ हिंदविजय जीमखान्यातर्फे घेण्यात आलेल्या हिंदी खेळांच्या सामन्यात उतरुन उपांत्य सामन्यात यशस्वीहोऊन प्रशस्तिपत्रे मिळवून विद्यालयाचे नावलौकिकात भर टाकली. याकाळात (१९२७-१९३०) विद्यालयात श्री. धोंडोपंत कोपर्डेकर (गु. अण्णासाहेब कोपर्डेकर) हे व्यायामशिक्षक असून त्यांनी विद्यार्थ्यांत व्यायाम विषयक आवड उत्पन्न केली होती. हरएक खेळात श्री. कोपर्डेकर हे मुलांचे बरोबरीने खेळत व मुलांना खेळवीत. शिक्षक स्वत: मुलांबरोबर मिळूनमिसळून व्यायामक्षेत्रात काम करू लागताच त्याचा इष्ट तो परिणाम मुलांवर होतो व मुलांचा त्या शिक्षकाबद्दलचा आदरही दुणावतो.
बालवीर चळवळ :
पहिल्या जागतिक महायुद्धानंतर लॉर्ड बेडन पॉवेल यांनी जागतिक स्वरूपाची बालवीर चळवळ सुरु केली. ब्रिटिश वसाहतीत सर्वत्र त्या चळवळीचा प्रसार झाला. हिंदुस्थानात ही चळवळ सुरु झाली. विद्यालयातील बौद्धिक शिक्षणास बालवीर चळवळीची जोड मिळाल्यास शीलवर्धक नागरिक शिक्षण मिळेल ह्या हेतूने १९२६ च्या सुरुवातीस विद्यालयात बालवीर शिक्षणाचा श्रीगणेशा सुरु करण्यात आला. विद्यालयाच्या बालवीर पथकात ६०-६५ बालवीर होते. ते सार्वजनिक समारंभात स्वयंसेवकांचे काम करीत असत. याशिवाय सहली, प्रवास वगैरे कार्यक्रमही उत्साहाने पार पाडीत. या चळवळीस श्री. दादासाहेब पारधी यांची मदत होती. शैक्षणिक बाब इतक्याच दृष्टीने चालकांचे या चळवळीकडे लक्ष होते. मुलांप्रमाणे मुलीनाही नागरिकत्वाचे शिक्षण हवे होते म्हणून व ते देणे इष्ट वाटल्यावरून सौ.चंद्राबाई पारधी यांचे पुढाकाराने मुलींचे ‘ गर्ल्स गाईड’ पथक सुरु करण्यात आले.पथकाचे चालकत्व सर्वस्वी सौ.पारधी यांचेकडे होते. या मुलींच्या पथकात सुमारे २०-२५ मुली असत. सन १९२८ मध्ये विद्यालयात मुलांचे पार्लमेंट स्थापन झाले व त्यामुळे बालवीर चळवळीतील पुष्कळशी कामे पार्लमेंट मार्फत होऊ लागली व बालवीर चळवळ बंद पडली. १९३६ मध्ये छात्रसमितीचे कार्य जोमाने सुरु झाले. त्यावेळी शिस्तमंडळ व परिषद मंडळया दोन मंडळांकडे जवळ जवळ बालवीर मंडळांचे सर्वच्या सर्व काम आले. विद्यालयीन जगात स्वयंसेवकांची आवश्यकता आहे व विद्यालयापुरतेच क्षेत्र छात्रसमितीने आखून घेतल्यामुळे सर्व प्रकारचे उपयुकत शिक्षण मुलांना मिळणे व त्यांनी मिळवणे शक्य आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट स्वंसेवक म्हणून कार्यक्षम करणे छात्रसमितीच्या कर्तव्यक्षेत्रात येऊ शकत असल्याने निराळे स्वयंसेवक दल उभारण्याची विद्यालयास आता गरज भासत नाही.
विदेशी खेळ :
क्रिकेट, फुटबॉल बॅडमिंटन व व्हॉलीबॉल या चार खेळांकरता साहित्य दिले जाई. पण त्यावेळी देशी खेळांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष जास्त होते त्यामुळे हे खेळ मागे पडले.
विद्यार्थ्याचे देशी खेळातील क्रीडानैपुण्य: –
१९३७-३८ मध्ये मुंबई नॉर्थ व उपनगर शिक्षक संघामार्फत वैयक्तिक व सांघिक खेळांचे सामने सुरु झाले. त्यात विद्यार्थी संघांनी सतत तीन वर्ष ‘खो खो या खेळाची ढाल मिळवली. मुलींच्या संघांनी ‘लंगडी’ या खेळाची ढाल सतत दोन वर्ष मिळवली. प्रशस्तिपत्रके मुलांनी वैयक्तिकरीत्या मिळवली ती वेगळीच. १९३८ मध्ये मुंबई शारीरिक शिक्षण मंडळातर्फे झालेल्या सामन्यात मुलामुलींच्या संघांनी चषक व ढाली मिळवल्या.
याशिवाय १९४३ पासून मुंबई शारीरिक शिक्षण मंडळातर्फे आंतरशालेय हिंदी खेळांच्या सामन्यातील मुलांच्या संघांकरीता ‘ टोपीवाला हिंद ट्रॉफी’ व मुलींच्या संघांकरिता ‘राणी लक्ष्मीबाई हिंद ट्रॉफी’ ठेवण्यात आल्या. या दोन्ही ट्रॉफीज् विद्यालयाच्या मुलांच्या संघानी पहिल्याच वर्षी व मुलींच्या संघांनी सतत तीन वर्ष विद्यालयास मिळवून दिल्या. मुलींच्या संघाने सतत आठ वर्ष स्त्रियांच्या गटासाठी ठेवलेल्या हिंदी खेळांच्या खुल्या सामन्यात दरवर्षी यशस्वी होऊन आठही वर्ष चषक मिळविले.
विद्यार्थी सहाय्यक योजना :
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व उपकरणे मिळावीत यासाठी छात्रसमितीचे विद्यार्थी सहाय्यक मंडळ निधी जमवते.जुनी पुस्तके एक वर्षासाठी वापरायला देतात. तसेच स्वावलंबी, गरीब व होतकरू विद्याथ्यांना नादारी अथवा अर्धनादारी मंजूर करण्याचे काम शिक्षक सल्लागार समिती करते, त्यावेळी नादारीचे प्रमाण शेकडा ८ असे होते.
पहिला गणवेश :
प्रत्येक संस्थेला आपल्या शाळेतील मुलांसाठी गणवेशाची आवश्यकता असते. या गणवेशामुळे एक वेगळी ओळख त्या मुलांना आणि पर्यायाने शाळेला मिळते. १५ ऑगस्ट १९३६ या दिवशी पालकांच्या संमतीने शाळेतील प्रत्येकाला गणवेश असावा असे ठरले. गडद निळी अर्धी विजार, पांढऱ्या अर्ध्या अस्तन्याचा सदरा व काळी टोपी असा गणवेश निश्चित केला. आज ८४ वर्षांनंतरही थोडा बदल सोडला तर हाच गणवेश चालू आहे. मोठ्या विद्यार्थ्यांना पूर्ण विजार पण निळ्या रंगाचीच व काळी टोपी बंद करण्यात आली. मुलींचे कपडे त्याच रंगाचे ठेवण्यात आले.
सांघिक कवायत :
शिस्तीस अत्यंत उपयुक्त म्हणून सांघिक कवायत १९३६ पासून सुरु झाली.सुरवातीस आठवड्यातून एक वेळा घेतली जाणारी हि कवायत आठवड्यातून पाच दिवस दररोज २० मिनिटे पर्यंत घेतली जाऊ लागली. दार शनिवारी बँड वर घेतली जायची.
स्टेशनरी स्टोर :
मुलांना लेखन साहित्य , वह्या वगैरे विद्यालयातच विकत मिळावे म्हणून विद्यालयाच्या देखरेखीखालींएक छोटेसे स्टेशनरीचे दुकान गेली २० वर्षे चालवले जात आहे.नफा हि बाब न ठेवता मुलांची सोय हे धोरण त्यामागे होते. दुकानात झालेल्या नफ्यातून तेथे काम करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना काही मदत दिली जावी अशी योजना आहे.
पालकांना विनंती (१९३० ते १९३९)
शारीरिक व बौद्धिक शिक्षणाच्या योजना पार पाडण्यास पालकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी नेमून दिलेला अभ्यास करतो कि नाही याकडे पालकांनी नियमित लक्ष पुरवल्यास शाळेला मदत होईल. क्रमिकेतर कार्यक्रमात बरेचसे विद्यार्थी लक्ष घालत नाहीत. त्यांना भाग घायला लावण्यास पालकांना शक्य आहे. शाळेत होणाऱ्या वैद्यकीय तपासणीच्या परिणामांकडे व वैद्यकीय सल्ल्याकडे लक्ष दिल्यास डॉक्टरांच्या परिश्रमाचे सार्थक होईल. शाळेच्या अभिवृद्धीबद्दल पालकांच्या विधायक सूचना शाळेच्या वाढीस पोषक होतील.
वरील अभ्यासेतर उपक्रमातल्या अनेक गोष्टी अजून चालू आहेत. वेगळेपण दिसते ते निबंध , वक्तृत्व यासाठी निवडलेल्या विषयात. मुलांमध्ये शिस्त लागावी, स्वावलंबनाचे धडे मिळावेत, नेतृत्व गूण अंगी यावेत यासाठी छात्रसमिती, बालवीर , स्काऊट असे उपक्रम सातत्याने चालू ठेवायला हवेत.
पालकांना केलेली विनंती बघितली तर ती सध्याचीच वाटते.
सुरवातीलाच शिक्षणाचा व त्याचबरोबर इतर उपक्रमांचा भक्कम पाया घातला गेला. त्यामुळेच आज संस्थेच्या सर्व शाळांची वाटचाल योग्य दिशेने व सुरळीतपणे चालू आहे.
शतकमहोत्सव सदर क्र. ७ : मुख्याध्यापक व शिक्षक /शिक्षिका सक्षमता
विद्यार्थ्यांच्या /विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये चालणारे विविध उपक्रम तसेच त्यांना शिस्त लागावी म्हणून आखलेल्या योजना आपण सदर ६ मध्ये बघितल्या. ते उपक्रम राबवण्यात व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा कोणाचा असेल तर तो मुख्याध्यापक व शिक्षकांचा /शिक्षिकांचा . संस्कारक्षम अशा वयात मुले शाळेमध्ये घरच्यापेक्षा जास्त वेळ असतात. याचमुळे शाळेमध्ये झालेले संस्कार दीर्घ काळ टिकून राहतात. पार्ले टिळक शाळेच्या स्थापनेनंतर पहिल्या २५ वर्षातील मुख्याध्यापक, शिक्षकांची सक्षमता पाहण्यासाठी केलेली योजना व काही आठवणी दिल्या आहेत.
विदयालयाचे माजी मुख्याध्यापक
- श्री. महादेव गोविंद पिंगळे,B.A.,
हे ९ जून १९२१ पासून मुख्याध्यापक होते. ते शिस्तप्रिय असूनही विद्यार्थ्याना हसतखेळत शिकवणारे शिक्षक असा त्यांचा लौकिक होता. १९२३ च्या मार्च अखेरीस ते विद्यालय सोडून गेले.
- श्री. श्रीपाद सदाशिव मराठे, M.A., (Physics).
हे मुख्याध्यापक म्हणून मार्च १९२३ पासून काम पाहू लागले. श्री. मराठे हे अगदी आरंभापासूनच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे चिटणीस होते. ते विद्यालयात येण्यापूर्वी टाटा कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीस होते. सार्वजनिक कामाची हौस, राष्ट्रीय वृत्ति, तरुणपणची धडाडी यामुळे मराठे यांनी आपल्या कारकीर्दीत विद्यालयाला नावारूपास आणण्याचे आटोकाट यत्न केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व चालक मंडळाचे चिटणीस या दोन्ही हुद्यांवर श्री.मराठे असल्यामुळे त्यांचा शिक्षक वर्ग व विद्यार्थी या उभय घटकांवर सारखाच वचक असे. श्री. मराठे यांनी विद्यालयाच्या हरएक कार्यक्रमात एकसूत्रीपणा व शिस्त यांचे उत्कृष्ट बीजारोपण केले.यांचेच कारकीर्दीत औद्योगिक शाखा सुरु होऊन तीत विणकाम, मातकाम,कागदकाम वगैरे विषयाचे शिक्षण सुरु झाले.विद्यार्थ्यांचे पार्लमेंट व शिक्षकसंघ यांनीच काढले. हे १९२६ पासून विद्यालयाचे लाईफ मेंबर होते. काही तात्विक मतभेदांमुळे श्री. मराठे हे जुलै १९३२ मध्ये विद्यालयातून स्वखुशीने सेवानिवृत्त झाले.
- कै. श्री. गणेश सखाराम आगाशे, B.A.,S,T.C.D.
श्री. आगाशे हे नोव्हेंबर १९३२ ते ३१ मार्च १९३४ पर्यंत मुख्याध्यापक होते. उत्तम शिक्षक व मनमिळावू अशी त्यांची ख्याती होती. यांचे कारकीर्दीत विद्यालयाचे शिक्षक वर्गाचे पगाराचे स्केल कायम करण्यात आले. तसेच शैक्षणिक लायकीनुसार जास्तीत जास्त शिक्षकांना कायम करण्याचे धोरणही विद्यालयात अनुसरले जाऊ लागले. श्री. आगाशे यांनी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मुख्याध्यापक पद १९३४ च्या मार्च अखेर सोडले.
- श्री. रामचंद्र महादेव मराठे MA., LLB, B.T.
हे जून १९३४ ते मे १९३७ अखेर विद्याल्याचे मुख्याध्यापक म्हणून काम पहात असत. ते उत्तम व्यासंगी शिक्षक असून मॅट्रिकच्या वर्गात इंग्रजी, मराठी, संस्कृत व गणित यापैकी कोणताही विषय उत्तम रीतीने शिकवीत. त्यांचे कारकीर्दीत विद्यार्थ्यांच्या पार्लमेंटचे पुनरुज्जीवन होऊंन छात्रसमिति नावाचा विभाग सुरु झाला . श्री. मराठे हे १९३७ मध्ये विद्यालयातून सेवानिवृत्त झाले.
- श्री.मा. सी. पेंढारकर MA., B.T., M.ED.
हे जून १९३७ ते में १९४५ अखेरपर्यंत श्री. पेंढारकर मुख्याध्यापक म्हणून काम पाहात होते. शिक्षणपद्धति निर्दोष करण्याकरिता अनेक अभिनव उपक्रम ते करीत. विद्यालयाची सांस्कृतिक परंपरा कायम ठेवण्याचा व शैक्षणिक कार्यक्रमातील दोषस्थळे घालविण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांनी अनेक आकडेवारीचे तक्ते जमा करुन विद्यार्थ्यांचे मानसिक उन्नतीचा सशास्त्र अभ्यास करणे सोपे जावे म्हणून बरीच माहिती जमविली होती. ते स्वत: अभ्यासू होते .विद्यालयास चांगले रूप द्यावे असे त्यांना वाटे. विद्यार्थीवर्गात श्री. पेंढारकरांबद्दल फार आदर असे. पालकवर्ग व इतर स्थानिक मंडळींतही त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदर वसत होता. ते जून १९४५ साली विद्यालय सोडून गेले.
शिक्षक सल्लागार समिती : (Teachers Advisory Committee)—
सन १९२६ मध्ये विद्यालयात ‘शिक्षकसंघ’ स्थापन झाला. त्यास बोर्ड ऑफ डायरेकटर्सनी मान्यता दिली होती. शिक्षकसंघाचे श्री. मराठे व श्री. म.द. बाक्रे या दोघांना आपले प्रतिनिधी नेमून दिले होते. हे दोन प्रतिनिधी व बोर्डाचे दोन सभासद मिळून चौघांचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट् त्या वेळी असून सर्व अंतर्गत कारभार बोर्ड ऑफ मॅनेजमेंट्च्या हातात होता. तथापि सन १९३० च्या सुमारास शिक्षक संघ मोडला व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट्ही बंद झाली. यानंतर १९३० ते १९४३ पर्यंत विद्यालयाचे मुख्याध्यापक जुन्या शिक्षकांच्या अनौपचारिक सल्ल्यानेच कारभार पाहत. असा सल्ला मिळवण्यासाठी मुख्याध्यापक ‘ कायम शिक्षक समिती’ स्वत:च्या अधिकारात स्थापित असत. या समितीस बोर्डाची अधिकृत संमती नसे. मुख्याध्यापक त्यांना वाटतील त्या बाबतीत या समितीचा सल्ला घेत. एप्रिल १९४३ मध्ये विद्यालयाच्या चिटणीसांनी ‘ शिक्षक सल्लागार समिती’ शिक्षक वर्गातील दोन प्रतिनिधी, सुपरिटेंडेंट व ऍ. सुपरिटेंडेंट व स्वत: आपण अशी पाच जणांची समिती स्थापिली. या समितीचे अध्यक्ष बोर्डाचे सेक्रेटरी असतात व कार्यवाह मुख्याध्यापक असतात. या सल्लागार समितीने कोणाही शिक्षकाच्या वैयक्तिक हिताहिताचा विचार करावयाचा नसून अंतर्गतकारभाराच्या नित्यनैमित्तिक बाबींचा विचार करून सुसंमत तत्वावर विद्यालयाचा कारभार चालविण्यास मदत करावयाची असे ठरले.
पहिल्या शिक्षक सल्लागार समितीचे सभासद :- (१) श्री. वा.दा. जोग, अध्यक्ष, (२) श्री. मा.सी. पेंढारकर, कार्यवाह, (३) श्री. शं. ग. भागवत, ऍ.सुपरिटेंडेंट. (4) श्री. दि. ल. देवधर, व श्री. ज. वि. जोशी (शिक्षक वर्गाचे दोन नियुक्त प्रतिनिधि.) या समितीने एप्रिल १९४३ ते ३१ मार्च १९४५ अखेरपर्यंत काम केले.
१ एप्रिल १९४५ पासून द्वितीयशिक्षक सल्लागार समिती स्थापन झाली.
शिक्षक सल्लागार समितीमुळे पुढील फायदे झाल्याचे निदर्शनास आले आहे:- (१) अंतर्गत व्यवस्था निर्दोष करण्यात आली. (२) शिक्षकवर्गाचे अधिक सहकार्य मिळू लागले. (३) शिक्षकवर्गाच्या सामुदायिक अडचणी दूर करणे सोपे झाले. (४) शैक्षणिक बाबींचा सांगोपांग विचार होऊन नव्या योजना आखणे सोपे झाले. (५) होतकरू व लायक शिक्षकांची ओळख होऊन त्यांच्या कर्तुत्वास वाव मिळू लागला. (६) पूर्वीच्या एकतंत्री कारभारास मुरड घालून सुसंबद्ध कारभार सुरु झाला. (७) बोर्डाच्या सेक्रेटरींचा शिक्षकांशी वेळोवेळी परिचय झाल्याने मगदुराची माणसे कोण आहेत हे कळू लागले. (८) चालकवर्गांपैकी जबाबदार अधिकारी शिक्षकांत मिसळू लागल्याने त्यांना शिक्षिकवर्गाच्या खऱ्या अडचणी कळू लागल्या व त्या दूर करणे शक्य झाले.
शिक्षक सल्लागार समिती स्थापन करून शिक्षक वर्गाच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला गेला.त्यातून शिक्षकांमध्ये सौदार्हाचे वातावरण निर्माण करण्यात यश मिळाले. हा व्यवस्थापनाचा आदर्श असून ते नेहमीच अनुकरणीय राहील.
नि:स्पृहतेचे उदाहरण:
विद्यालयातील एक नामवंत व विद्यार्थीप्रिय असे गणित विषयाचे शिक्षक श्री. वासुदेव सदाशिव फडके हे १९३५ मध्ये दिवंगत झाले. श्री, फडके हे हसतमुख, तडफदार, निरलस काम करणारे, खेळीमेळीने वागणारे, स्पष्टवक्ते असे उत्तम गणित शिक्षक होते. 1930 मध्ये जे दोन कायम शिक्षक विद्यालयात नेमले गेले त्यात श्री. फडके यांचा दुसरा नंबर होता व ते नेमणुकीपासून कायम शिक्षक म्हणून घेतले गेले होते. ही निवड श्री. पारधी यांनी केली होती. श्री. फडके दिवंगत होताच विद्यार्थी आणि शिक्षकवर्गातून त्यांच्या स्मृत्यर्थ काहीतरी फंड जमा केला जावा, त्यातील काही भाग श्री. फडके यांच्या पत्नीस मदत म्हणून पाठवावा व एखादे लहानसे पारितोषिक फडके यांच्या स्मृत्यर्थ १/३ वर्षे तरी ठेवता आले तर पाहावे अशा सुचना येऊ लागल्या. श्री. फडके यांच्याबद्दल शिक्षक वर्गालाही हळहळ वाटली. मग विद्यार्थी आणि शिक्षकांची संयुक्त सभा भरून फडके स्मारक निधि जमवावा व तो जमेल त्याप्रमाणे पुढील तजवीज कराव्या असे ठरून २/३ महिन्यात २००रु. निधी जमला. त्यातील १५० रु श्रीमती फडके यांना मदत देण्याचे ठरुन त्यादृष्टीने त्यांच्याशी स्मारकनिधीचे कार्यवाह श्री. ज. वि. जोशी यांनी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारास श्रीमती फडके यांनी पुढील उत्तर पाठविले,
“आपण कै. फडके यांचे स्मृत्यर्थ जमविलेल्या निधीतून रु १५० मदत मला देण्याचे ठरविल्याबद्दल मी स्मारक निधि मंडळाची आभारी आहे. तथापि श्री. फडके यांची चिरस्मृति विद्यालयात रहावी या हेतूने मी १५० रु. ची तुम्ही देऊ केलेली साभार परत करते व ती मंडळाने योग्य त्या मार्गाने खर्चून माझ्या पतीचे चिरस्मारक राहील अशी तजवीज केल्यास मला समाधान होईल.”
तदनंतर फडके स्मारक निधि मंडळाने सदर निधि विद्यालयास पुढील अटींवर देण्याचे ठरविले व त्या अटी विद्यालयाने मान्य केल्या. त्या अटी अशा:- कै.वासुदेव सदाशिव फडके बी.ए. यांचा फोटो विद्यालयात ठेवला जावा. फडके स्मारक निधीच्या २०० रु. रकमेच्या कायम निधीचे सर्व व्याजाची रक्कम प्रतिवर्षी विद्यालयातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलास अगर मुलीस गणित (Mathematics) या विषयात जास्त मार्क मिळतील त्यास अगर तीस फडके यांचे स्मृत्यर्थ पारितोषिक रुपाने दिली जावी.
सन १९४६ चे छायाचित्र
शिक्षकांची सक्षमता
शिक्षकांच्या व शिक्षिकांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दुहेरी योजना पुढीलप्रमाणे होती.
अ सुपेरिटेन्डन्ट यांनी दर सहामाहीत प्रत्येक शिक्षकाचे काम निदान तीन तास काळजीपूर्वक पहावे.
ब शिक्षकाचा नियमितपणा ,कामाची आवड , शिक्षणाची कळकळ, मुलांबरोबर वागणूक या गोष्टी विचारात घेऊन शिक्षकांविषयी मत बनवावे,
क शिक्षकाचे स्वतंत्र पुस्तक,या पुस्तकावरून शिक्षकाने किती विचारपूर्वक व पद्धतशीर काम केले आहे ते समजून घेण्यास मदत होईल. पुस्तकात पुढीलप्रमाणे माहिती लिहावी.
१.ठराविक अभ्यासक्रम करून घेण्याकरता शिक्षकाने आखलेली सहामाही कामाची प्रत्यक्ष योजना.
२.विद्यार्थ्यांचे त्या त्या विषयातील प्रगतीप्रमाणे केलेले वर्गीकरण. ज्या विद्यार्थ्यांमध्ये फरक दिसून आला त्या विषयी नोंद
३. वर्गातील शिक्षणाला मदत म्हणून शिक्षकाने जमवलेली माहिती व तयार केलेले तक्ते
४. परीक्षेच्या पेपर तपासण्यावरून आत्मनिरीक्षणाच्या हेतूने काढलेलं निष्कर्ष
५, मुलांच्या वह्या तपासताना त्यातील गुण दोष व चुका सुधारण्यासाठी काही विशेष पद्धत असल्यास त्याचा उल्लेख
६. रोजच्या वह्या लिहिण्याबद्दल घालून दिलेली सामान्य पद्धत
७. घरचा अभ्यास देण्याविषयीचे धोरण
८. मुलांच्या वागणुकीत विशेषप्रमाणे दिसणारे स्वभाव विशेष
९. पालकांबरोबर संवाद, पत्रव्यवहार
१०. शिक्षकाला आपल्या कामात आलेल्या अडचणी व गरजा
११. शिक्षण विषयक पुस्तके अगर लेख यातून काढलेले मुद्दे , विशिष्ट पद्धती
शिक्षकांनी वरिलप्रमाणे ठेवलेल्या पुस्तकातून ते किती परिश्रम घेतात , किती विचार करतात. याची काहीशी कल्पना करता येईल, तसेच त्यानी केलेल्या नोंदी अध्यापनाच्या प्रगतीला पूरक ठरतील. शिक्षक पुस्तकात लिहिल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करतो कि नाही हे शिक्षकाच्या निरीक्षणाच्या वेळी ताडून पाहता येईल.
अतिशय मोजक्या शब्दात शिक्षकांशी संबंधित सर्व बाबी अंतर्भूत करून त्यांची सक्षमता वाढवण्याची व तपासण्याची एक चांगली योजना तयार केली आहे.आजही त्याचा तेवढाच फायदा होईल.
शतकमहोत्सव सदर क्र. ८ : २५ वर्षातील चालक मंडळातील सदस्य
कुठल्याही संस्थेच्या दृष्टीने पहिली २५ वर्षे अतिशय महत्वाची असतात. या काळात संस्थेचा पाया घातला जातो. तो जेवढा मजबूत तेवढी संस्थेची इमारत स्थिर आणि चिरकाल टिकणारी असते.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन खरोखरच भाग्यवान कि संस्थेचे हीत पाहणारी नि:स्वार्थी, कर्तव्यदक्ष व धडाडीची अशी माणसे त्या पंचवीस वर्षाच्या काळात संचालक मंडळावर होती. त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
त्रिंबक मोरेश्वर पारधी (दादासाहेब):
आदरणीय दादासाहेब पारधी हे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या आद्य संस्थापकांपैकी एक प्रमुख संस्थपाक होते. विद्यालयाच्या मूळ कल्पनेपासून, स्थापनेपासून, इमारत बांधण्यापासून, व विद्यालय या संस्थेस मूर्त स्वरूप देईतो पर्यंत दादासाहेब यांनी अविश्रांत श्रम घेतले.
विद्यालयाचे ध्येय ठरवण्यात दादासाहेबांचा शब्द फार महत्वाचा होता. विद्यालयाचे ध्येय ” To impart sound and rational education in arts, industries and physical culture ” असे असावे हे दादासाहेब यांचेच म्हणणे स्वीकारले गेले. कै. लोकमान्यांचे स्मृत्यर्थ वरील ध्येयानुसार सुरु केलेल्या विद्यालयातून अर्थातच स्वावलंबी, बुद्धीमान, सुदृढ तरुण बाहेर पडावेत व ते स्वत:च्या पायावर उभे रहावेत अशी दादासाहेबांची इच्छा होती. शाळा सुरु झाल्यावर विद्यालयास जागेची व मालकीच्या इमारतीची अडचण भासु लागताच श्री. पारधी यांनी जसजशी पैशाची गरज लागली तसतशी मदत देऊन पस्तीस हजार रुपये खर्च केले . तसेच श्री.वि.वा.परांजपे यांचेकडून ए स्कीम मधील विकत घेतलेल्या एका प्लॉटवर विलेपार्ले नगरीच्या शिक्षणाबाबतच्या सर्व गरजा भागविता येतील अशी त्या काळी प्रशस्त वाटणारी इमारत १९२३ मध्ये बांधून पुरी केली व त्या विद्यालयास स्वगृही आणले.
श्री. दादासाहेब पारधी यांची कार्यपद्धति अशी होती कि कार्य हाती घेतले की ते मानासाठी नव्हे तर कर्तव्यबुद्धीने करावयाचे व त्या कार्याशी समरस व्हायचे. निरलसता, दीर्घ कष्ट करण्याची सवय, मनाची खंबीरता , शिस्तप्रियता , हे दादासाहेबांचे गुण खरोखरच अनुकरणीय आहेत. “कर्तव्यबुद्धीने केलेले कार्य मनुष्यास अमरत्व देते” या सिद्धांतावर दादांचा दृढ विश्वास होता. विद्यालयाखेरीज पार्ल्यातील सार्वजनिक हितसंबंधांची प्रत्येक बाब घेतली तरी तीत असे दिसेल की दादासाहेबांनी त्या बाबतीतला मोठ्यात मोठा भाग ‘ तनंमन धनाने’ उचललेला होता. पार्ल्यातील सर्व कार्यकर्त्यास ही जाणीव होती व त्यामुळेच पुष्कळसे होतकरू कार्यकर्ते श्री. दादासाहेब यांचेकडे आदरयुक्त भावनेने पाहात. विलेपार्ल्याच्या नागरिक जीवनात क्रांती घडविणाऱ्या कार्यकर्त्याचे श्रेणीत दादासाहेबांना अग्रस्थान द्यावे लागेल यात शंका नाही. अशा थोर पुरुषाचा आशीर्वाद टिळक विद्यालयास आरंभापासून आहे. विद्यालयाची कायम घटना मुकर करण्याचे वेळी श्री.दादासाहेबांची स्पष्टोक्ति व करारी वृत्ती अनुभवास आली.
विद्यालयास दिलेल्या देणगीचे दादासाहेब यांनी ट्रस्टडीड मधील विद्यालयावर घातलेली बंधने राहणार नाहीत असे त्यात स्पष्ट केले आहे. ट्रस्ट डीड करुन देताना दादासाहेबांनी मनाचा जो दिलदारपणा दाखविला तो त्यांच्या थोर मनाची जणू कांही साक्षच देत आहे. विद्यालयाने ट्रस्टडीडची अट पूर्ण केली.
विष्णु बाळकृष्ण परांजपे (तात्यासाहेब) :
पार्ल्यातील जुने व दानशूर नागरिक अशी यांची ख्याती आहे. श्री. दादासाहेब पारधी यांचे खांद्यास खांदा लावून विद्यालयाचे कामी स्वार्थत्याग पूर्वक काम करण्यात तात्यासाहेब नेहमीच अग्रभागी होते.सुमारे सव्वाचार हजार वारांचे विस्तीर्ण क्रीडांगण विद्यालयास देणगीरूपाने देऊन तात्यासाहेब यांनी विद्यार्थ्यांच्या खेळण्याची कायम स्वरूपी सोय करून ठेवली.आरंभापासून विद्यालयाचे खर्चात येणारी तूट भरून काढण्यात तात्यासाहेब यांनी पुष्कळ वर्षे द्रव्यदानाने विद्यालयास उपकृत केले. दरसाल बक्षीस समारंभाप्रित्यर्थ ३५ रु. रोख देणगी देण्याचा नवीन उपक्रम त्यांनी सुरु केला.तात्यासाहेब हे आरंभापासून विद्यालयाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सभासद व विद्यालयाच्या आद्य संस्थापकांपैकी एक असून अध्यक्ष व उपाध्यक्षपदांवरही त्यांनी कामे केली;
श्री तात्यासाहेब हे जुन्या चालीचे खानदानी गृहस्थ असून ‘ साधी रहाणी व उच्च विचारसरणी’ हा त्यांचा स्वभाव विशेष आहे. ‘पार्ले टिळक विद्यालय ‘व ‘पार्लेश्वर मंदिर’ ही दोन तात्यासाहेबांची पार्ल्यातील जागती स्मारके त्यांनी आपल्या हयातीतच निर्माण केली. विद्यालयाच्या विशिष्ट कार्यक्रमप्रसंगी तात्यासाहेब उपस्थित राहत असत.
भास्कर गणेश भिडे :
हे पार्ले येथील भिडे कंपनीचे मालक व विद्यालयाच्या आद्य संस्थापकांपैकी एक. ते विद्यालयाच्या अग्रेसर चालकांपैकी एक कष्टाळू व स्वार्थत्यागी गृहस्थ होते. इंग्रजी शाळेचे वर्ग सुरुवातीस त्यांचे घरी उणीपुरी दोन वर्ष भरत होते. भास्कररावांची आर्थिक परिस्थिती तेव्हा फारशी समाधानकारक नसतांही सुरुवातीस पाच हजार रुपयांच्या देणगीचे आश्वासन त्यांनी विद्यालयाला दिले.विद्यालयाबाबतचे कोणतेही बाजारहाटीसंबंधीचे कामकाज रा. भास्करराव घरगुती नात्याने विद्यालयावरील प्रेमामुळे फारच आपुलकीने करीत असत.
गोपाळ रामचंद्र फाटक :
विद्यालयाच्या सुरुवातीपासून १९४२ जून अखेरपर्यंत सतत २१ वर्ष गोपाळ राव हे विद्यालयाचे खजिनदार होते. निरलस, नि:स्पृह, हिशेबी व कष्टाळू स्वयंसेवक असे त्यांचे वर्णन केल्यास अतिशयोक्ति होणार नाही. सुवर्णमध्य साधण्याची कला गोपाळराव यांना साध्य झाली होती. ते विद्यालयाचे तहहयात खजिनदार व लोकमान्य सेवा संघाचे तहहयात अध्यक्ष अशा दोन जबाबदार अधिकारांवर होते व दोन्ही संस्थांमध्ये गोपाळरावांचा शब्द मोलाचा मानला जाई. गोपाळरावांनी विद्यालयाचे हिशेब अत्यंत चोख ठेवण्यात दक्षता बाळगली होती.
गणेश हरी पेठे (भाऊसाहेब) :
भाऊसाहेब पेठे हे विद्यालयाच्या १९२३ पासून बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये होते. १९३० ते १९३८ पर्यंत ते बोर्डाचे चिटणीस होते. या काळात त्यांनी विद्यालयाच्या स्थैर्यासाठी जे कष्ट, सायास व उलाढाली केवळ विद्यालयाविषयीच्या हितैष भावनेने केल्या त्या अवर्णनीय होत. श्री. पेठे यांनी विद्यालयाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे यत्न केले. विद्यालयात शिक्षकांकरीता पगाराच्या ग्रेडस् सुरु करुन त्यांनी शिक्षकवर्गात कायमपणा आणला. खाजगीरीत्याही श्री पेठे हे शिक्षकांना मदत देण्यासाठी तयार असत, यामुळे शिक्षकांना त्यांचेबद्दल आदर होता. बरेच लायक शिक्षक मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या सर्व गोष्टी करताना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या कलानेच त्या करवून घ्याव्या लागत. श्री दादासाहेब पारधी यांनी वृद्धत्वामुळे अध्यक्षीय जबाबदारी सोडली तेव्हा श्री. भाऊसाहेब यांना अध्यक्ष निवडण्यात आले.श्री.पारधी इंग्लंडमध्ये असताना काही काळ श्री. भाऊसाहेब हे विद्यालयाचे हंगामी सर्वाधिकारी होते. यावरून भाऊसाहेबांच्या विद्यालयातील कामगिरीची बहुविधता स्पष्ट कळेल.
जगन्नाथ बाबाजी गोसावी :
यांनी विद्यालयास १००१ रु. देणगी दिली होती. हे बोर्डाचे सभासद होते. ते सन १९२५ मध्ये दिवंगत झाले.त्यांच्या पुत्राने व पत्नीनीं कै. वा. गोसावी यांची स्वत: ची खाजगी लायब्ररी होती ती जशीच्या तशी विद्यालयास देणगी म्हणून दिली.
कृष्णाजी महादेव आगाशे :
विलेपार्ल्यातील पहिले दक्षिणी घरंदाज. गृहस्थ असे कै. अण्णासाहेब आगाशे यांचे वर्णनकरता येईल. दक्षिणी वस्ती पार्ल्यास वाढावी अशी त्यांची फार इच्छा असे व म्हणूनचं ते पार्ले टिळक विद्यालयाचे बाबत अगदी आरंभापासूनचे खटपटीत असत. पहिल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे ते सभासद होते. अण्णासाहेब १९२६ मध्ये निवर्तले. ते सढळ हाताने पुष्कळ संस्थांस मदत करीत असत असा त्यांचा लौकिक होता.
त्रिंबक महादेव लिमये (बाबुराव लिमये) :
बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सभासद असून विद्यालयाच्या सुरुवातीपासून विद्यालयास आर्थिक मदत करीत असत. हे सन १९४१ मध्ये स्वर्गवासी झाले.
गणेश विष्णू गानू (भाऊसाहेब गानू) :
विद्यालयाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे उणीपुरी १२ वर्षे सभासद होते. सडेतोड स्वभाव, प्रेमळ हद्य, साधी वागणूक हे भाऊसाहेब गानू यांचे स्वभाव विशेष सांगता येतील.हे विद्यालयाचे काही काळ उपाध्यक्ष होते.
कान्होबा मोरोबा पडते :
हे विलेपार्ले येथे बिल्डिंग काँट्रॅक्टर म्हणून प्रसिद्ध होते. श्री. पडते यांनी विद्यालयाचे दक्षिणेकडील वाढविलेल्या इमारतींचे बांधकाम स्वत: करवून घेतले आहे. श्री. पडते यांचा विद्यालयाशी फार जुना ऋणानुबंध होता.
कृष्णाजी बलवंत सामंत:
हे व्यापारी होते. त्यांनी विद्यालयास ५०१ रु ची देणगी दिली होती. ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये निवडून आले. ते एक आस्थेवाईक गृहस्थ होते.
दिनकर गणेश भिडे (भाऊसाहेब):
विद्यालयाच्या बोर्ड ऑफ डाइरेक्टर्सचे अध्यक्ष होते . यांचा उणीपुरी १५ वर्ष विद्यालयाशी बोर्डाचे सभासद या नात्याने संबंध होते. १९३८ ते १९४२ पर्यंत त्यांनी चिटणीस म्हणून काम पाहिले ‘ बारकाईने व चौकस काम करण्याची त्यांची हातोटी होती.
वासुदेव दामोदर जोग (नानासाहेब):
बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे चिटणीस होते. यांचा डायरेक्टर या नात्याने विद्यालयाशी ८/९ वर्ष निकटचा संबंध होता .१९३८ चे प्रारंभी ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सभासद झाले.ते विद्यालयाचे काम फार कसोशीने व नि:स्वार्थ बुद्धीने करीत. विद्यालयाची आर्थिक बाब सुधारण्याकरीता त्यांनी फारच मेहनत घेतली.आर्थिक अडचण, पुरेशा शिक्षकांची वाण, जागेची उणीव, विद्यालयाच्या वाढत्या गरजा व महर्गता या सर्वास तोंड देण्यातच त्यांचा बराच वेळ व मेहनतही खर्च होत. निष्ठेने व चोखपणाने काम करणे हे त्यांचे ध्येय. हे स्वत: अकौंटंट असल्याने विद्यालयाचे अंदाजपत्रक आवाक्याबाहेर जाऊ न देता शक्य तो जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याचा ते कसून यत्न करत.
पुरुषोत्तम विश्वनाथ जोशी : (बापूसाहेब) :
विद्यालयाचे खजिनदार होते. मनमिळाऊपणा व विनोदी स्वभाव हे त्यांचे स्वभावविशेष होते. हे पार्ल्यातील जुन्या पिढीपैकी असून विद्यालयास त्यांनी कायम स्वरूपाची देणगी दिली होती.
चिंतामण जयराम पेठे (तात्यासाहेब):
श्री. पेठे हे बोर्डाचे सभासद असून अंतर्व्यवस्थेकडे आस्थेवाईकपणे पाहत विद्यालयाची कीर्ति व दर्जा वाढावा, शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात, चांगले शिक्षक लाभावेत व मुलांचा फायदा व्हावा अशी त्यांना कळकळ होती. विद्यालयाची जागेची अडचण दूर व्हावी व नव्या इमारतीची योजना शक्य तितक्या ताबडतोब मूर्त स्वरूपात आणली जावी अशी त्यांची इच्छा होती. विद्यालयाचा बाह्य डामडौल वाढविण्यापेक्षा शिक्षणाची बाजू चांगली उठावदार व्हावी व छोटेसे कार्य पण ते नमुनेदार व्हावे असा तात्याचे बोलण्याचा नेहमी रोख होता. बोर्डाच्या सिलेक्शन कमिटीचे श्री. तात्यासाहेब एक सभासद होते .
बी. बी. केसकर (भीमराव केसकर) :
बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे एक जुने सभासद. श्री.केसकर यांचे मुंबईच्या प्रार्थना समाजातील कार्यही मोठे आहे. पदवीधर नसतानाही त्यांचे लेखन विशाल आहे. सुबोधपत्रिकेचे ते संपादक होते.स्पष्टोक्ति व समतोल न्यायवृत्ती हे त्यांचे स्वभाव विशेष होत. साधी राहाणी व उच्च विचारसरणी, सरळ वागणे व बोलणे या गुणांमुळे त्यांचेबद्दल आदरभाव वाढतो.
रावसाहेब वासुदेव सदाशिव सोहनी (रिटायरर्ड सुप्रिटेंडेंट, राममोहन इंग्लिश स्कूल, मुंबई) :
रावसाहेब हे सामान्य शिक्षकापासून सुप्रिटेडेंटपदापर्यंत चढत गेले असल्यामुळे सामान्य शिक्षकांच्या अडचणींची त्यांना पूर्ण कल्पना होती. शिक्षण संस्थांशी उणीपुरी दोन तपे त्यांचा संबंध आल्यामुळे व ते विद्यालयाचे बोर्डावर असल्यामुळे विद्यालयाच्या मोठमोठ्या अडचणी त्यांना लवकर आकलन करता येत व त्यांच्या मार्मिक सूचनांचा बोर्डास फायदा मिळे. रावसाहेब हे बोर्डाच्या ‘सिलेक्शन कमिटी’चे सभासद होते.
शेषगिरी नारायण कलबाग :
पार्ले म्युनिसिपालिटीचे ते बरीच वर्षे उपाध्यक्ष होते.त्यांच्या सरळ व न्यायी स्वभावामुळे त्यांचे मार्गदर्शन हे उत्तम प्रतीचे होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचेविषयी आदरभाव होता. कर्तव्यबुद्धीने कार्य करणे व बोलण्याचालण्यात शालीनता हे श्री. कलबाग यांचे स्वभावविशेष होत.गुंतागुंतीचे प्रश्न चर्चिल्यानंतर विचार पूर्वक निर्णायक मतप्रदर्शन करताना श्री. कलबाग यांच्यामधील बुद्धीचा प्रकर्ष दिसत असे.
शंकर अनंत लिमये :
हे बोर्डाचे सभासद होते. मार्गे ३/४ वर्षे रा. शंकरराव विद्यालयाचे हिशेब तपाशीत असत. शांत वृत्ति व मनमिळाऊ स्वभाव हे शंकररावांचे स्वभावविशेष होत. खेळीमेळीच्या वातावरणांत विद्यालयाचा गाडा पुढे ढकलला जावा अशा धोरणाने शंकरराव नेहमी वागत असत.
शेठ ब्रिजमोहन लक्ष्मीनारायण रुइया :
हे बोर्डाचे सभासद होते. ते व्यापारी असून विद्यालयास त्यांनी दोन हजार रुपयांची देणगी दिली होती. विद्यालयास केव्हाही आर्थिक मदत करण्यास शेटजी उदारपणे मदत करावयास तयार असत.
शतकमहोत्सव सदर क्र. ९: संस्थेचा रौप्यमहोत्सव
९ जून १९४६ या दिवशी पार्ले टिळक विद्यालय संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली.
ज्या दिवशी संस्थेची स्थापना झाली त्याच दिवशी पार्ले टिळक विदयालय या मराठी माध्यमाच्या शाळेची स्थापना संस्थेने केली. या शाळेची पंचवीस वर्षात झालेली प्रगती व त्यासाठी संस्थेने उचललेली पावले, यामध्ये असणारा विविध व्यक्तींचा सहभाग, त्या काळातील महत्वाच्या घटना, आठवणी इत्यादी सर्वांची माहिती संक्षिप्त रूपाने याआधीच्या ८ सदरात दिली होती.
या सदरात संस्थेने व पार्ले टिळक विद्यालय या शाळेने रौप्यमहोत्सव कशा रीतीने साजरा केला व त्यावेळची कार्य पद्धती कशी होती हे आपण पाहणार आहोत.
रौप्यमहोत्सवाचे नियोजन
हा रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी एक स्वतंत्र मध्यवर्ती मंडळ स्थापन करण्यात आले होते. या मध्यवर्ती मंडळाची पहिली सभा २० मार्च ,१९४६ या दिवशी झाली.मंडळाचे पदाधिकारी व सदस्य नियुक्त केले गेले. या सभेत रौप्यमहोत्सवी समारंभाची स्थूल रूपरेषा व पोटमंडळे कोणती असावीत याबद्दल चर्चा झाली.
समारंभाची स्थूल रूपरेषा
१. रौप्यमहोत्सव समारंभ सन १९४६ च्या डिसेंबर महिन्यात साधारणतः एक आठवडा साजरा करण्यात यावा.
२ हा समारंभ कोणतरी थोर व्यक्तीचे अध्यक्षतेखाली सभा स्वरूपात साजरा व्हावा. त्यावेळी विद्यालयाचा गत २५ वर्षाचा अहवाल वाचला जाऊन विद्यालयाची प्रगती व वाढ कसकशी होत गेली हे दाखवले जावे.
३. शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील निरनिराळया तज्ज्ञ व अधिकारी व्यक्तींची व्याख्याने ठेवावीत.
४. माजी विद्यार्थ्यांचे शारीरिक व बौद्धिक कार्यक्रम ठेवण्यात यावेत.
५. विद्यालयातील इंग्रजी व मराठी शाखांतील विद्यार्थ्यांचे शारीरिक व बौद्धिक कार्यक्रम ठेवण्यात यावेत.
६. विद्यालयातील शिक्षण पद्धतीचे प्रात्यक्षिक पालक वर्गास दाखवणे.
७. प्रदर्शन भरवणे.
८. खेळांचे सामने आयोजित करणे.
मध्यवर्ती मंडळाकडून अपेक्षिलेले कार्य पुढीलप्रमाणे होते
१. विद्यालयांसाठी निधी गोळा करणे.
२. रौप्यमहोत्सव दोन ते तीन दिवसांच्या कार्यक्रमाने साजरा करणे
३. रौप्यमहोत्सवी विशेषांक पुस्तकरूपाने प्रसिद्ध करणे.
वरील सर्व कार्यक्रम व योजना सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पोटमंडळे नियुक्त करण्यात आली
१, प्रचार व निधी मंडळ
२ ग्रन्थ व त्याचे संपादक मंडळ
३ कार्यक्रम मंडळ
४ स्वयंसेवक मंडळ.
वरील प्रत्येक मंडळाच्या नियमित सभा घेतल्या जात होत्या. त्या सभेमध्ये प्रत्येक विषयावर चर्चा होत असे.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु .ल.देशपांडे हे वरील सर्व मंडळात सक्रिय होते.
रौप्य महोत्सव निधी
रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाबद्दल व त्यासाठी निधी उभारण्याबद्दल चर्चा झाली. निधी गोळा करण्याच्या योजनेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असावे असे ठरले.
१. लोकांना व्यक्तिशः गाठून मोठ्या देणग्या मिळवणे.
२. विद्यालयास रु. १०१ व इतर देणारे देणगीदार मिळवणे.
३. मदतीसाठी लहान रकमांची तिकिटे काढून खपवणे
४. सिनेमा नाटके व इतर विविध कार्यक्रम तिकिटे ठेऊन शक्य तर करणे.
रौप्यमहोत्सवातील समारंभ
९ जून १९४६
या दिवशी विद्यालयात रौप्यमहोत्सवी मंडळाने छोटेखानी समारंभ आयोजित केला त्यात आगामी महोत्सवाची नांदी केली गेली.
२८ एप्रिल १९४६
मुंबईत रौप्यमहोत्सवी मंडळाने ” कुंकू ” हा चित्रपट सिनेमागृहात तिकिटे लावून ठेवला होता.
२९ व ३० जून १९४६
या दोन दिवशी ना. धो. ताम्हणकर कृत ” नव्या जुन्या” या नाटकाचे प्रयोग लोकमान्य सेवा संघात केले गेले. त्यातला एक दिवस प्रौढ नागरिकांसाठी तर दुसरा विद्यार्थ्यांसाठी होता. नाटकाचे हे दोन्ही प्रयोग तिकिटे लावून ठेवले होते.
या नाटकाच्या अनुषंगाने काही मार्गदर्शक सूचना केल्या गेल्या त्या अशा
१. नाटकाचे वेळी टिळक मंदिराबाहेर एखादा कॉफी स्टॉल ठेवता आल्यास मद्रासी हॉटेल मालकांना विचारून व्यवस्था करावी
२. नाट्य प्रयोगाचे आदले दिवशी मंदिरात स्टेजवर रंगीत तालीम घेतली जावी.
३, नाट्य प्रयोगाचे वेळी लागणारे सर्व सामान आगाऊ जमवणे
४, नाट्यप्रयोगाचे वेळी शक्य तो कोणासही नाटकात काम करणाऱ्या मुलींच्या पालकांस वा नातेवाईकांसहि कॉम्प्लिमेंटरी पासेस विनामूल्य प्रवेश पत्रिका देण्याची प्रथा पडली जाऊ नये.
मान्यवरांच्या भेटी
रौप्यमहोत्सवानिमित्त अनेक मान्यवर व्यक्तींनी शाळेला भेटी दिल्या. त्यातल्या काही जणांनी दिलेले संदेश आजच्या काळातही तितकेच उपयुक्त आहेत. काही महत्वाचे पुढे उद्धृत करतो
श्री गो. स. सरदेसाई, इतिहासकार २९.०८.१९४६
मिळवलेल्या यशाबद्दल संतोष प्रकट करताना पुढील कर्तव्याची जाणीव बाळगून तसा नवीन उपक्रम करणे प्रत्येक संस्थेस व व्यक्तीस आवश्यक आहे, परीक्षेसाठी विद्यार्थी तयार करण्याचा काळ गेला, आता नवीन उद्योगाचा व राष्ट्रसेवेचा काळ आला असून त्याला कार्यक्षम अशी भावी पिढी तयार झाली पाहिजे.
श्री गो.रा. परांजपे, माजी प्राचार्य , रॉयल इन्स्टिटूट ऑफ सायन्स. १६.०८.१९४६
सर्वच विद्यार्थ्यांना एका ठराविक मार्गाने नेण्यापेक्षा प्रत्येकाला त्याच्या आवडत्या विषयात प्रगती करून घेण्यास सहाय्य करणे हे निःसंशय जास्त हितावह ठरते असे आता मान्य झाले आहे.
डिसेम्बर १९४६
डिसेम्बर मध्ये रौप्यमहोत्सवी समारंभ करण्याचे ठरवले होते परंतु रौप्य महोत्सवी अंकाच्या प्रसिद्धीकरता लागणारा पुरेसा कागद सरकारकडून मिळाला नाही. या कारणास्तव डिसेंबर मध्ये अंक प्रसिद्ध करणे अवघड असल्याने त्या महिन्यातील रौप्यमहोत्सवी समारंभ पुढे ढकलण्यात आला.
दि. १३, एप्रिल १९४७ ते १६ एप्रिल १९४७
दि १३ एप्रिल १९४७ या पहिल्या दिवशी या महोत्सवाचे उदघाटन त्या वेळच्या मुंबई राज्याचे माननीय पंतप्रधान व शिक्षण मंत्री बाळ गंगाधर खेर यांच्या हस्ते झाला. व रौप्य महोत्सवी अंक ” आत्मस्वरूप” याचे प्रकाशन झाले.
१६ मार्च १९४७ रोजी लोकमान्य टिळकांचे नातू ,केसरीचे संपादक जयंतराव टिळक यांच्या अध्यक्षतेखाली रौप्य महोत्सवाचा समारोप करण्यात आला.
रौप्य महोत्सवाच्या इतर दिवशीच्या कार्यक्रमांना नामदार गो.ध.वर्तक, प्राध्यापक म.अ करंदीकर यांच्यासारखी थोर मंडळी उपस्थित होती.
वरील सर्व माननीय व्यक्तींनी संस्थेच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध करमणुकीचे कार्यक्रम केले. त्यात दोन नाटकांचाही समावेश होता.
या महोत्सवातील दोन नाटके होती मुलांचे “संगीत वीरवचन” आचार्य अत्रे कृत नाटक तर मुलींचे “ज्योती” मालतीबाई दांडेकर लिखित नाटक. या नाटकांकरिता प्रवेशपत्रिका ठेवल्या होत्या.संस्थेला अथवा शाळेला देणगी देणाऱ्यास दोन पेक्षा अधिक प्रवेशपत्रिका देऊ नयेत असे ठरवण्यात आले.
रौप्य महोत्सवी विशेषांक
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या स्थापनेचा व वाढीचा इतिहास सांगणारा व या कार्यात ज्यांनी योगदान दिले त्या सर्व व्यक्तींविषयी माहिती देणारा असा विशेषांकप्रसिद्ध करण्यात आला. त्याचे नाव होते ” आत्मस्वरूप”
विशेषांकाबाबतीत पु ल देशपांडेंच्या सूचना
१, विद्यमान शिक्षकांपैकी काही शिक्षकांनी विद्यार्थ्यासंबंधीच्या आपल्या आठवणी लिहाव्यात
२. विशेषांकाचे नाव बाळबोधी न ठेवता आकर्षक ठेवावे त्यायोगे अंकाच्या खपास मदत होईल
३. शाळेच्या आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व मुख्याध्यापकांची छायाचित्रे समाविष्ट करावीत
आजही कुठल्याही शिक्षण संस्थेचा रौप्य, सुवर्ण ,शताब्दी महोत्सव साजरा करायचा असेल तर साधारणपणे वर उल्लेखिलेल्या पद्धतीने साजरा केला जातो. या महोत्सवासाठी निधी उभारण्यासाठी कमी अधिक प्रमाणात लेखात दिल्याप्रमाणे स्रोत उपलब्ध असतात. स्वायत्तता ठेऊन निधी उभारणे अथवा सरकारी अनुदान मिळवणे अतिशय अवघड आहे.
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या पार्ले टिळक विद्यालय या संस्थेने “पार्ले टिळक विद्यालय “हि शाळा संस्था स्थापनेच्या पहिल्याच दिवशी सुरु केली. या २५ वर्षाच्या कालावधीत अनेक अडचणींचा सामना करत, कुठल्याही प्रकारे तडजोड न करता, सरकारी अनुदान न घेता, संस्थेच्या हितचिंकांकडून निधी उभारत (यात प्रामुख्याने संचालक मंडळ सदस्य होते) एक आदर्श शाळा निर्माण केली. ४ विद्यार्थ्यांपासून सुरु झालेल्या व एका संचालकांच्या घरात भरत असलेल्या शाळेची आता स्वतःची स्वतंत्र इमारत झाली होती व विद्यार्थ्यांची संख्या १२०० पर्यंत गेली होती. पुनरावृत्ती होऊन सुद्धा शाळेच्या या प्रगतीमध्ये दादासाहेब पारधी व तात्यासाहेब परांजपे यांचे अमूल्य योगदान होते हे नमूद करावे लागेल. त्याचबरोबर चालक मंडळाचे इतर सदस्य, शिक्षक आणि हितचिंतक आपापली कामे चोख केली.
आता स्वातंत्र्यानंतरचा काळ सुरु झाला. संचालक मंडळात बदल होऊन काही तरुण पिढीचे प्रतिनिधी मंडळावर नियुक्त केले गेले. पुढील कालावधीत संस्थेचा झपाटयाने विस्तार केला गेला. तो कसा ते आपण पाहू या पुढील सदरांमध्ये