Home » PTV Marathi Medium Primary Section – About School

PTV Marathi Medium Primary Section – About School

WELCOME TO PTV Marathi Medium Primary Section

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळा 

शाळेची माहिती –

लोकमान्य टिळक यांच्या कर्तृत्वाने व राष्ट्रवादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या काही ध्येयवादी पार्लेकरांनी लोकमान्यांचे एक सचेतन स्मारक पार्ल्यात उभारण्याचे ठरविले. दि. ९ जून १९२१ रोजी हे ध्येय “ पार्ले टिळक विद्यालय  ” या शाळेच्या स्थापनेने या ध्येयास मूर्त स्वरूप आले.  केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विद्यालयाचा श्रीगणेशा झाला.चार विदयार्थ्यांसह ९८ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विद्यालयात आज दीड हजाराहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत.

‘पार्ले टिळक विद्यालय’ संस्थेचा जन्म राष्ट्रीय अस्मितेतून, त्याग भावनेतून व उच्च महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. उत्तमोत्तम मुख्याध्यापक, शिक्षक यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. विद्यालयाच्या परंपरेचा वसा आताच्या मुख्याध्यापिका श्रीमती लतिका ठाकूर या चालवत आहेत. विद्यालयातील अनेक गुणवंत शिक्षकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आधुनिक प्रसार माध्यमातूनही आमच्या विद्यालयातील शिक्षक विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. अनेक नामवंत माजी विदयार्थ्यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. विविध क्षेत्रांत या मान्यवरांनी विद्यालयाचेच नव्हे तर आपल्या देशाचेही नाव उज्ज्वल केले आहे.

विज्ञान मंडळ, निसर्ग मंडळ, विदयार्थी मंडळ, सहली, विदयार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, व्यवसाय मार्गदर्शन, नकाशा मार्गदर्शन, पाठांतर स्पर्धा, हस्तलिखिते, शैक्षणिक प्रकल्प, विज्ञान प्रदर्शन, शिक्षक प्रशिक्षणाद्वारे विदयार्थी व शिक्षकांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

शाळा म्हणजे केवळ दगड-विटांच्या भिंती नव्हेत तर शाळा म्हणजे विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास. यासाठी आमच्या शाळेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. विस्तृत क्रीडांगण, क्रीडासाहित्य, शैक्षणिक साधने, अद्ययावत संगणक कक्षा, सुसज्ज प्रयोगशाळा, भूगोल दालन, समृद्ध ग्रंथालय ,संगीत कक्षा , समुपदेशक कक्षा, गणित कक्षा , अत्याधुनिक चित्रकला कक्षा या सर्व सोयींचा लाभ विदयार्थ्यांना घेता येतो.

बदलत्या काळानुरूप विदयालयाच्या जुन्या वास्तुची जागा आज नव्या भव्य वास्तुने घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शाळेतही नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग अध्यापनासाठी केला जात आहे. मराठी अस्मिता, संस्कृती व परंपरा यांची जपणूक करून शतक महोत्सवी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या आमच्या विदयालयासाठी म्हणावेसे वाटते…

दश-दिशांतून तुझ्या कीर्तीचे पडघम दुमदुमती |

विदयार्थी आमचे नवयुगाचे स्वागत जणू करती ||

उज्ज्वल भविष्य या मातेचे सांगत कृती उक्ती |

पार्ले टिळकची यशोकीर्ती दिगंत या जगती ||

मुख्याध्यापिका - श्रीमती सुनीता मोहन धिवार
पार्ले टिळक विद्यालय हि संस्था ९ जून १९२१ साली स्थापन झाली. आणि बी रुजून त्याला अंकुर फुटले. पुढे त्याची प्राथमिक शाळा एक फांदी तयार झाली. गेल्या ९८ वर्षात या रोपट्याचा महावृक्षाप्रमाणे विस्तार झाला. 
विद्यालयाच्या सुरुवातीपासून श्रीमती नाईक , श्रीमती भट , श्रीमती ताटके, श्रीमती रामा जोशी, श्रीमती गाडे अशा दिग्गज शिक्षकांनी मुख्याध्यापक पद  भूषवले आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाय तयार केला. 
शिक्षणाबरोबर कला , क्रीडा विविध अभ्यासपूरक उपक्रम याना प्राधान्य देऊन रोपट्याचा महावृक्ष तयार केला. बदलत्या धोरणानुसार प्राथमिक शाळेत विविध सुधारणात्मक बदल झाले आहेत. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, निरीक्षण क्षमता, स्नायूंचा विकास स्वावलंबन आत्मविश्वास, क्रियाशीलता वाढवण्यासाठी अनेक उपक्रमांनी शाळा समृद्ध होत आहे. 
प्राथमिक विद्यालयात काळाच्या गरजेनुसार इंग्रजी , संभाषण वर्ग , संगणक वर्ग, समुपदेशन व वाचनालय , कराटे, व्यायामशाळा , दृक्श्राव्य कक्ष, अधिक अध्यापन वर्ग , वैज्ञानिक खेळणी, सुट्टीतील शिबिरे , स्पर्धात्मक परीक्षा या गोष्टीचा अवलंब केलेला आहे. डिजिटल माध्यमांतून विविध प्रोजेक्ट्स तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन करून प्रगतीपथावर पोहोचवण्याचे काम आमचे शिक्षक करत आहेत. 
शाळा म्हणजे संस्कार मंदिर होय. शिक्षणाचे अंतिम ध्येय आदर्श नागरिक घडवणे, माणुसकी जपणे, समाजात टिकून राहणे, समाजावर प्रेम करणे आणि समाजाला अमूल्य योगदान देणे या सर्व गुणांचे संवर्धन करणारी मुंबईतील नावाजलेली एकमेव शाळा म्हणजे 'पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळा'
शेवटी मराठीत नवप्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाला सांगावेसे वाटते,
आकाशाकडे पाहताना आकाश होऊन पहावे लागते |
सर्वांगीण विकासकरिता पार्ले टिळक प्राथमिक शाळेत यावे लागते.||