भारतीय डाक विभागातर्फे पार्ले टिळकचा गौरव !
१०० व्या वर्धापनदिनी होणार विशेष टपाल पाकिटाचे अनावरण !
शतक महोत्सवी वर्षात पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शैक्षणिक कार्याची नोंद भारतीय डाक विभागाने घेतली आहे. संस्थेच्या सन्मानार्थ भारतीय डाक विभागा मार्फत एक विशेष टपाल पाकिट प्रसिद्ध करण्यात येत आहे .
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर पार्ल्यातील काही देशभक्त नागरिकांनी लोकमान्यांचे कायमस्वरूपी स्मारक निर्माण व्हावे या विचारातून ९ जून १९२१ रोजी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन ह्या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या १०० व्या वर्धापनदिनी म्हणजे ९ जून २०२१ रोजी एका विशेष ऑनलाईन कार्यक्रमात पोस्ट मास्टर जनरल मुंबई विभाग श्रीमती स्वाती पांडे यांच्या हस्ते या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण होईल.
कोविडच्या पार्श्वभूमीवर वर्धापनदिनाचा कार्यक्रम साधेपणाने होत आहे. कोविड काळात ज्या माजी विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली अश्या काही कोविड योद्ध्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात येत आहे. यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी डॉ अविनाश सुपे यांच्यासह इतर काही सेवाव्रतींचा समावेश आहे .
तसेच पार्ले टिळक विद्यालय या मराठी शाळेनेही शतकी वाटचाल पूर्ण केली आहे. त्यानिमित्त पाटिविच्या माजी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने ‘शतकपूर्ती’ ही स्मरणिका तयार करण्यात आली आहे. ह्या स्मरणिकेचे उदघाटन शाळेचे माजी ज्येष्ठ शिक्षक श्री हर्डीकर सर यांच्या हस्ते याच कार्यक्रमात होत आहे. ९जून ला सकाळी ९वाजता संस्थेच्या यूट्यूब वाहिनीवरून आणि फेसबुक पेज वर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे.
www.youtube.com/parletilakvidyalayaassociation