पार्ले टिळक विद्यालयात किल्ला आणि आकाश कंदील प्रदर्शन

पार्ले टिळक विद्यालयात किल्ला आणि आकाश कंदील प्रदर्शन

आधुनिकतेच्या वाटेवर चालताना आपल्या देदिप्यमान परंपरेचा विसर पडू द्यायचा नाही यासाठी पार्ले टिळक विद्यालय परिवार नेहमीच प्रयत्नशील असतो.
पूर्वी दिवाळी जवळ आली की घराच्या अंगणात बालगोपाळ किल्ला बनवत असत. आणि मोठी माणसेही त्यात सामील होत.
तसेच दिवाळी म्हटलं की आकाश कंदीलही घरातील हौशी कलाकार मंडळी स्वतः बनवत.
पाटिविअच्या शाळांमधल्या मुलांना आपल्या या गौरवशाली प्रथा परंपरा माहिती व्हाव्यात, त्यांनाही यातील मौज समजावी आणि पुढे जाऊन त्यांनीही यातून आनंद मिळवत राहावा यासाठी यावर्षी दिवाळी किल्ला आणि आकाश कंदील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व आठ शाळा आणि तीनही महाविद्यालयांनी प्रत्येकी एक याप्रमाणे ११ किल्ले आणि ११ आकाशकंदील बनविले आहेत. त्यासाठी शाळेतील शिक्षक, पालक आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेले काही दिवस अतिशय परिश्रम घेतले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता, महाराष्ट्रातील गडकोट पायाखाली घातलेले धाडसी गिर्यारोहक आणि पर्यटन विषयक विपुल लेखन केलेले चतुरस्त्र व्यक्तिमत्व श्री. मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात ११ किल्ल्यांच्या देखण्या प्रतिकृती आहेत आणि त्यांची समग्र माहिती देणारे अनेक फलकही इथे लावले आहेत. साठ्ये महाविद्यालयाच्या आर्कियालॅाजी विभागाने विशेष पुरातन वस्तूही इथे प्रदर्शित केल्या आहेत. दिवाळी किल्ल्यांप्रमाणेच आकाश कंदील हे दिवाळीचे वेगळे वैशिष्टय. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन च्या शाळांमधील कला शिक्षकांनी आणि महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय भव्य असे पारंपारिक आकाश कंदील बनवले आहेत. विले पार्ले पूर्व यथील पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी शाळेच्या पटांगणात हे प्रदर्शन भरले असून दोन दिवस २४आणि २५ॲाक्टो २४ रोजी संध्याकाळी ४ ते ८ यावेळात ते नागरिकांसाठी खुले आहे. पाटिविअच्या सर्व शाळांच्या दर्पण या एकत्रित वार्तापत्राच्या दिवाळीअंकाचे प्रकाशनही यावेळी श्री मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते करण्यात आले.