अविरत विद्यादानाचे शतक

अविरत विद्यादानाचे शतक

९ जून १९२१

“हे जगज्जीवना परमेश्वरा ! सर्वांचे कल्याण असो. आमच्या हिंदमातेचे रोग, दुष्काळ, दैन्य सर्व दूर कर. तिच्या मुलांना सद्बुद्धी दे. तिला पूर्वीसारखे वैभव प्राप्त होवो”.

श्री. भिडे ह्यांच्या माडीवरील एका खोलीत ही प्रार्थना म्हणायला फक्त पाच व्यक्ती उपस्थित होत्या. चार विद्यार्थी आणि एक शिक्षक! म.गो. पिंगळे – शिक्षक आणि कृ.शं. पटवर्धन, प्र.गो. फाटक, कृ.ज. दामले आणि मो.के. गानू – हे त्यांचे शिष्य.

एका लहानशी खोली, त्यात एक लांब बाक, एक खुर्ची, एक फळा आणि एक लाकडी पेटी! अश्या स्थितीत पेरलेल्या पार्ले टिळक विद्यालयाच्या ह्या बीजाचा पुढच्या शंभर वर्षात एक भव्य वटवृक्ष कसा झाला त्याचा हा नेत्रदीपक इतिहास.

पारतंत्र्याच्या सावटाखाली गुदमरताना सुद्धा “आमच्या हिंदमातेला पूर्वीसारखे वैभव प्राप्त होवो” अशा ध्येयाने भारलेल्या ह्या प्रवासाची सुरवात झाली १ ऑगस्ट १९२० रोजी. लोकमान्य टिळकांचे अंत्यदर्शन घेवून जड अंत:करणाने चौपाटीवरून परतताना लोकमान्यांची ध्येयासक्ती ही पार्ल्याची मंडळी हृदयातून घेवून आली तेंव्हापासून. १७ ऑक्टोबर १९२० रोजी विलेपार्ल्याच्या नागरिकांनी जाहीर सभा भरवून लोकमान्यांचे जिवंत स्मारक पार्ल्यात स्थापन करण्यासाठी टिळक स्मारक फंड समिती उभारली. सुरुवातीला समितीचे बहुधा १५०/१७५ तरी सभासद असावेत. समितीच्या सभासदांनी फंड जमविण्यास जोमाने सुरुवात केली. ह्याच काळात पार्ल्यामध्ये सार्वजनिक मंडळ ह्या नावाची संस्था समाजोपयोगी कार्य करत होती. टिळक स्मारकाच्या कल्पनेने झपाटून जावून ही मंडळी सुद्धा टिळक स्मारक फंडाला सहकार्य करण्यास पुढे सरसावली.

फंड जरी जमा व्हायला लागला असला तरी “जिवंत” स्मारक म्हणजे नक्की काय करावे, ह्या चर्चेची भेंडोळी मात्र अधिकाधिक गुंतागुंतीत अडकली होती. ह्या चर्चेत फारसं अडकवून न घेता पाहिलं पाउल टाकण्याची धडाडी मात्र दाखविली पार्ल्यातल्या भगिनीवर्गाने. सौ. चंद्राबाई पारधी, कमलाबाई भिडे, गंगुबाई कुंटे अशा भगिनींनी पुढाकार घेवून १४ जानेवारी १९२१ रोजी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर श्री दादासाहेब पारध्यांच्या राहत्या घरी मुलींची प्राथमिक शाळा सुरु देखील केली.

कदाचित ह्या धडाडीने चालना मिळून असेल, पण लवकरच २४ एप्रिल १९२१ रोजी, श्री. दादासाहेब पारध्यांच्या बंगल्यात टिळक स्मारक फंड समितीने सर्व पार्लेकरांची जाहीर सभा बोलावली आणि लोकमान्यांचे लोकशिक्षणाचे कार्य पुढे नेणे हेच त्यांचे सर्वोत्तम स्मारक होईल अशा विचाराने पार्ल्यामध्ये एक उल्लेखनीय शिक्षण संस्था स्थापन करावी ह्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ह्यानंतर मात्र फंड गोळा करण्याबरोबरच शाळेचं व्यवस्थापक मंडळ स्थापन करणे, शाळा सुरु करण्यापुरती जागा निश्चित करणे इत्यादी कामाला धडाक्याने सुरुवात होऊन दिनांक ९ जून १९२१ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर ह्यांच्या हस्ते दादासाहेब पारध्यांच्या बंगल्यामध्ये पार्ले टिळक विद्यालयाचे उद्घाटन झाले. लोकमान्य टिळकांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून समारंभाचे अध्यक्ष श्री. तात्यासाहेब परांजपे यांनी विद्यालयाचे उद्घाटन केले.

पुढची पावले

विद्यालयाच्या व्यवस्थापक मंडळाचा सुरुवातीचा विचार फक्त माध्यमिक शाळा सुरु करावी एव्हढाच होता. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारची असून लोकल बोर्ड किंवा तत्सम सरकारी संस्था ती जबाबदारी पार पाडतील ही त्यामागची भूमिका तेंव्हा होती. परंतु ज्या गुणवत्तेच्या शिक्षणाचा ध्यास आपण अंगिकारला आहे त्या प्रतीचं शिक्षण अश्या संस्थांकडून मिळण्याची शक्यता नाही हे लक्ष्यात आल्यावर प्राथमिक शिक्षणाचे वर्गही सुरु करण्याचे संस्थापक मंडळाने ठरवले.

अर्थात शाळा चालविण्याचे काम नुसत्या ध्येयवादाने किंवा कार्याच्या कळकळीने चालत नाही हे जाणून फंड गोळा करणे जोराने चालूच होते. शाळेच्या उद्घाटनाच्या समारंभातच विद्यालयाला आर्थिक मदत करण्यासाठी अनेक पार्लेकर पुढे सरसावले होते. तरीसुद्धा पुरेश्या भांडवलाभावी शाळेची सुरुवात श्री. भिडे (माध्यमिक वर्ग) आणि श्री पारधी (प्राथमिक वर्ग) ह्यांच्या राहत्या घरातच झाली होती. हा प्रश्न सोडविण्याकरिता पार्ल्यातल्याच सधन गुजराती मंडळींनी चालू केलेल्या केळवणी मंडळाबरोबर हातमिळवणी करण्याचाही प्रयत्न झाला. परंतु आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे हे लक्षात घेऊन स्वबळावरच शाळेच्या इमारतीची उभारणी करण्याचे प्रयत्न सुरु झाले. आणि तात्यासाहेब परांजपे ह्यांनी दिलेली जमीन, टिळक स्मारक समितीने गोळा केलेला फंड, तसेच पार्ल्यातल्या अनेक नागरिकांनी उत्स्फुर्तपणे देऊ केलेल्या देणग्या, इमारत उभारणीसाठी दादासाहेब पारध्यांनी सढळ हाताने खर्च केलेली धनराशी, “आपली शाळा” ह्या ध्येयाने झपाटलेल्या कार्यकर्त्यांचे श्रमदान ह्यांच्या मदतीने विद्यालयाची पहिली एकमजली इमारत डिसेंबर १९२२ मध्ये तयार झाली आणि १९२३ च्या मार्च महिन्यात शाळेचे वर्ग स्वतःच्या इमारतीत भरू लागले.

उत्तम नागरिक होण्यासाठी केवळ पुस्तकी शिक्षणच नव्हे तर त्या बरोबरच विद्यार्थ्यांना औद्योगिक शिक्षण देण्याची आणि त्यांचा शारीरिक विकास होण्याची गरज असते हे लक्ष्यात घेऊन सुरुवातीपासूनच शाळेचं उद्दिष्ट सर्वव्यापी असावं असं ठरवण्यात आलं.

ह्याच म्हणजे १९२३ सुमारास पार्ल्याची लोकवस्ती झपाट्याने वाढू लागली आणि त्याच बरोबर शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा. त्यामुळे १९२८ मध्ये आणि १९३३ मध्ये शाळेच्या मूळ इमारतीला पूरक नवीन कक्ष बांधण्यात आले.

चौफेर भरारी

एका लहानश्या माडीवर केवळ चार विध्यार्थी, एक शिक्षक, तुटपुंजे द्रव्यबळ अशा तर्‍हेने सुरु झालेला हा उपक्रम अमर्याद उत्साह, सामाजिक बांधिलकीची जाणीव, त्यासाठी पडतील ते कष्ट करण्याची आणि स्वतःचे पैसे खर्च करण्याची कळकळ आणि संस्थापकांची दूरदृष्टी ह्या भांडवलावर कशी चौफेर प्रगती होवू शकते हे पाहून थक्क व्हायला होतं.

बौद्धिक शिक्षण उत्तम प्रकारे द्यायला सुरुवात तर झाली होतीच पण त्यातच समाधान न मानता अनेक वेगवेगळ्या दिशांनी शाळेची वाटचाल सुरु झाली. हे सर्वच प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाले असं नव्हे. काही उपक्रम पैशाअभावी किंवा मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे सोडूनही द्यावे लागले. परंतु “आधी केलेच पाहिजे” ह्या ध्यासाने केलेली ही धडपड वाखाणण्याजोगीच होती. उदाहरणार्थ –

दर्जेदार शिक्षणाची गरज आणि त्याची उपलब्धता ह्यातील तफावत सतत वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे वृद्धिंगतच होणार आहे, हे लक्ष्यात घेऊन १९२५ मधेच भायंदर येथील ग्रामस्थांच्या विनंतीवरून विद्यालयाची शाखा चालू करण्यात आली. परंतु द्रव्याबलाच्या अभावी हा उपक्रम २ वर्ष यशस्वीपणे चालवूनही बंद करावा लागला.

ह्याच काळात शाळेच्या सर्वांगी परिपूर्ण शिक्षण देण्याच्या धोरणाला अनुसरून औद्योगिक शिक्षण शाखा चालू झाली. औद्योगिक शिक्षणांतर्गत विणकाम, सुतारकाम, बागायत, शिवणकाम, हस्तकौशल्य इत्यादी अनेक क्षेत्रातील कसब विकसित करण्यासाठी वर्ग सुरु करण्यात आले. ह्यातील शिवणकाम आणि हस्तकौशल्याचे वर्ग पुढेही होतेच आणि औद्योगिक शिक्षण ही थोड्या वेगळ्या प्रकारे चालू राहिले. स्वतःच्या इमारतीत औद्योगिक शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी ज्या संस्थांमध्ये अशा सुविधा उपलबद्ध आहेत त्यांच्याशी सहकार्य करून असे शिक्षण देण्याची सोय करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक इयत्तेमध्ये एक “Technical” वर्ग करण्यात आला. काही विणकाम, बागायत अशा इतर शाखा मात्र त्यांची गरजच कालबाह्य झाल्यामुळे बंद झाल्या.

“शरीरमाद्यं खलु धर्मसाधानमं” हे सुरुवातीपासूनच विद्यालयाच्या व्यापक ध्येयांपैकी एक होतंच. त्यानुसार शाळेत व्यायामशाळा, शारीरिक शिक्षणाचे वर्ग इत्यादी सुरु झालेलंच होतं. परंतु शिमगा स्पोर्ट्स ह्या नावाने एक मैदानी खेळांचा मेळावा दर वर्षी भरवण्याचा लक्षणीय उपक्रम १९२५ च्या सुमारास शाळेच्या क्रीडांगणावर सुरु झाला. त्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त मुंबई, ठाणे, वसई अशा दूर दूरच्या शाळांचे संघ सहभागी होत. ह्या क्रीडा महोत्सवामध्ये आपले प्राविण्य दाखविण्याची संधी तर शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळेच पण अशाप्रकारच्या सार्वजनिक उपक्रमांचं संयोजन करण्याचा प्रत्यक्ष अनुभवही त्यांच्या गाठीला जमा होत असे.

अशा अनुभवांच्या शिदोरीचाच उपयोग शाळेच्या विद्यार्थ्यांना हिंदविजय जिमखाना – बडोदा, महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषद – जळगाव अशा दूर दूरच्या अथवा मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या राणी लक्ष्मीबाई ट्रॉफी, हिंद ट्रॉफी इत्यादी मुंबईतल्या अनेक आंतर-शालेय स्पर्धांमध्ये विविध पारितोषिके मिळविण्यास झाला.

ह्या व्यतिरिक्त बालवीर पथक, आंतर-शालेय वक्तृत्व स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांचे सुप्त साहित्यगुण विकसित करण्यासाठी हस्तलिखित मासिके अशा अनेक नवनवीन उपक्रमांची सुरुवातही ह्याच काळात झाली. “केल्याने देशाटन….” ह्या उक्तीला अनुसरून विद्यार्थ्यांना आपला, देश, आपला इतिहास आणि सांस्कृतिक वारसा ह्यांची ओळख व्हावी ह्या उद्देशाने मुंबई परिसर तसेच हम्पी, सांची, भोपाल, जयपूर, हरिद्वार इत्यादी दूरच्या ऐतिहासिक महत्वाची तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी सहलींचे आयोजनही शाळेच्या सुरुवातीच्या कालपासूनच चालू झाले.

पण ह्या सर्वात उल्लेखनीय आणि विद्यालयाच्या चालक आणि शिक्षकांच्या दूरदृष्टी आणि प्रगमनशील विचारांचे प्रतीक म्हणजे शाळेत सुरु झालेलं Pupil’s Parliament (छात्र समिती). पुढे जाऊन केवळ स्वतःच्याच नाही तर सर्व समाजाच्या विकासाची कामे करण्यासाठी, त्यासाठी लागणाऱ्या सेवाभावी वृत्तीची, लोकसंग्रह करुन अशा कामांचे नेतृत्व करण्यासाठी लागणाऱ्या गुण आणि कौशल्याची जोपासना करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला.

शाळेतील मुला-मुलींमधून ३५ विद्यार्थी प्रतिनिधींची निवड केली जाई. छात्र समितीचा अध्यक्षही ह्या प्रतिनिधींमधून निवडला जाई. क्रीडामंडळ, उत्सव मंडळ, कन्या मंडळ, स्टेशनरी स्टोअर अशी चार मंडळे स्थापून ३ छात्र समितीचे प्रतिनिधी आणि २ सल्लागार शिक्षक प्रत्येक मंडळाचे काम पाहत. ह्या मंडळांच्या तर्फे राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना लागणाऱ्या खर्चासाठी छात्र समितीला दरमहा ५० रुपयांचे अनुदानही दिले जात असे. आणि नेमलेल्या शिक्षकांच्या देखरेखीखाली ह्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून योग्य विनिमय कसा करावा याचा वस्तुपाठच विद्यार्थ्यांना मिळत असे. शाळेत होणारे अनेक उत्सव, क्रीडा स्पर्धा, शास्त्रविषयक प्रदर्शने इत्यादी अनेक कार्यक्रम छात्र समितीतर्फे राबवविले जात. एखादी संस्था निर्माण करून ती चालविणे, संस्थेच्या कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन, खर्च-वेचावर योग्य देखरेख अशा जबाबदाऱ्या घेण्याचे प्रत्यक्ष शिक्षण देणारी प्रयोगशाळाच विद्यालयाने ह्या Pupil’s Parliament च्या रूपाने उभारली होती.

अर्धशतकाची वाटचाल

पार्ले टिळक विद्यालयाचा रौप्यमहोत्सव आणि भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन एकाच वर्षी फक्त काही महिन्यांच्या अंतराने साजरे केले जावे, हा योगायोग अतिशय अनुरूपच म्हणायला हवा. कारण शाळेची स्थापनाच मुळी “आमच्या हिंदमातेला पूर्वीसारखे वैभव प्राप्त होवो” अश्या प्रार्थनेपासून झाली होती.

“आरंभशूरा: खलु दाक्षिणात्या:” ही म्हण किती पोकळ आहे हेच विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवापर्यन्तच्या प्रवासावरून दिसून आलं होतं. आणि ह्या खोडसाळ वक्तव्याला पूर्णपणे निरर्थक सिद्ध करून दाखविण्यासाठी, नव्या धडाडीच्या तरुण कार्यकर्त्यांची फळी सुद्धा ह्याच सुमारास तयार झाली. श्री. मो. वि. परांजपे, श्री. भास्करराव गानू, श्री शंकरराव पेठे, श्री. द. वि. परांजपे असे शाळेचेच माजी विद्यार्थी नव्या हिरीरीने विद्यालयाच्या पुढील प्रवासाचं सुकाणू हातात घ्यायला पुढे सरसावले.

आपल्या शाळेत कश्या प्रकारचे संपूर्ण शिक्षण द्यायचे आहे ह्याचा पाया पहिल्या दोन दशकात घातला गेला होता. त्यानुसार क्रमिक शिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरुही झाले होते. परंतु ह्यापुढे जाऊन जास्तीत जास्त होतकरू विद्यार्थ्यांना ह्या सर्वांचा लाभ कसा घेता येईल ह्या साठी विद्यालयाचा आवाका अनेक पटींनी वाढविण्याची गरज होती.

विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शाळेची इमारत अपुरी पडतच होती. नवीन जागेचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी १९४८ साली शाळेची साठलेली गंगाजळी खर्चून एक बैठी इमारतही बांधली गेली. ती फार काळ पुरेशी पडणार नाही हे तेंव्हाच दिसत होतं. परंतु प्रश्न होता भांडवलाचा. हातात येणाऱ्या मर्यादित उत्पन्नावर विसंबून न राहता दीर्घ मुदतीच्या सव्याज ठेवी घेऊन पैसे उभे करायचा निर्णय घेऊन १९५३ साली शाळेची इमारत क्रमांक ४ ही तिमजली इमारत उभी राहिली. पुढची ६-७ दशकं म्हणजे सध्याची शाळेची नवीन भव्य इमारत बांधली जाई पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या किमान ६ पिढ्यांच्या मनात “आपल्या शाळेची प्रतिमा” म्हणजे हीच इमारत आहे.

इतक्या मोठ्या कर्जाची जबाबदारी घेणे ही चाल तशी धोक्याचीच होती. पण “अंथरूण पाहून पाय पसरावे” अश्या भित्र्या पारंपारिक मराठी बाण्याखाली दबणारी ही चालकांची नवीन पिढी नव्हती. ह्या पुढील कालखंडात विद्यालयाची चौफेर वाढ, कमीत कमी कालावधीत सातत्याने होत राहिली ती अशाच धडाडीमुळे. इमारत क्र. ४ पूर्व झाल्या झाल्या त्या पुढच्या विस्ताराच्या योजना कार्यान्वित झाल्या. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र इमारती असाव्यात अश्या विचाराने १९५७ साली शाळेची पाचवी इमारत, शाळेच्या आद्य संस्थापकांपैकी श्री. दादासाहेब पारधी ह्यांची जागा विकत घेऊन तेथे बांधली गेली. पण एखादी महत्वाकांक्षी योजना पूर्णत्वाला नेऊन स्वस्थ बसणे हे विद्यालयाच्या चालकांच्या स्वभावात बसणारं नव्हतं. प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळांची व्यवस्था नीटपणे लागल्या बरोबर पुढची उडी मारायची तयारी झाली आणि १९५९ साली विलेपार्ल्यातील पहिलच कॉलेज सुरु झालं सुद्धा. सुरुवातीला कॉलेजचे वर्ग शाळेच्या नव्या ५ क्रमांकाच्या इमारतीतच भरत असत. अर्थात कॉलेजसाठी पुन्हा पूर्वीचे प्रश्न सोडवायची गरज होती – पैसे, जागा, उपकरणे, प्राध्यापक वर्ग – सर्वच अक्षरशः शून्यातून उभं करायचं होतं. पण एखद्या सेवाभावी संस्थेचा आणि तिच्या कार्यक्षेत्राचा झपाट्याने विस्तार कसा करायचा ह्याचा नवीन वस्तुपाठच ह्या काळात पार्ले टिळक विद्यालय संस्थेने निर्माण केला. कला आणि शास्त्र शाखांमध्ये महाविद्यालयीन शिक्षण देणारं पार्ले कॉलेज १९६० साली स्वतःच्या इमारतीत सुरु झालं. त्यानंतर एकाच वर्षात संस्थेचं कॉमर्स कॉलेजही सुरु झालं. विद्यालयाच्या ह्या धडाडीने प्रभावित होऊन उद्योगपती श्री बाबासाहेब डहाणूकर ह्यांनी उत्स्फूर्ततेने कॉमर्स कॉलेजच्या पुढील विकासासाठी मोद्ठी देणगी देऊ केली. आणि १९६२ साली पार्ले कॉमर्स कॉलेज हे एम. एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स झालं.

ह्याकाळात अर्थातच शाळेची प्रगती जोमाने चालूच होती. ”उत्तम शिक्षण देणारी शाळा” असा सार्थ लौकिक असलेली दुसरी मराठी माध्यमाची शाळा मुंबईच्या उपनगरात तरी तेंव्हा नव्हती. त्यामुळे केवळ पार्ल्यातीलाच नव्हे तर अंधेरी, कांदिवली अशा लांबच्या उपनगरातूनही शाळेत मुलं येत असत. तेंव्हा आपले कार्यक्षेत्र आता पार्ल्याच्या बाहेरही पसरावे अश्या विचाराने विद्यालयाने अंधेरी पूर्व विभागातील विजयनगर सोसायटी ह्या मुख्यत्वे मराठी वसाहतीच्या जागेमध्ये परांजपे विद्यालय ह्या नावाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा १९७० साली सुरु झाल्या. शाळेच्या पहिल्या मॅट्रीकच्या वर्गातले विद्यार्थी आणि चालक मंडळाचे सदस्य श्री बाबुराव परांजपे ह्यांचा शाळेची ही अंधेरीची शाखा सुरु करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता.

१९५९ ते १९६९ ह्या केवळ एका दशकाच्या काळात विद्यालयाची जी झपाट्याने वाढ झाली, त्यामुळे प्रभावित होऊन, मुलुंड येथील स्थानिक आदर्श शिक्षणप्रसारक मंडळाने विद्यालयाच्या चालक मंडळाची भेट घेऊन मुलुंड येथेसुद्धा कॉलेज चालू करण्यासाठी बोलणी केली. त्यानुसार १९७० साली मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स सुरु झालं. आणि ह्याच काळात डहाणूकर कॉलेजच्याच इमारतीत व्यवस्थापन शास्त्रांच पदव्युत्तर शिक्षण देण्यासाठी मॅनेजमेंट इनस्टीट्युटही सुरु झाली.

१९४६ ते १९७१ ह्या दोन-अडीच दशकांमध्ये विद्यालयाच्या व्याप्तीत अशी नेत्रदीपक वाढ होत असताना, अध्ययन/अध्यापनाच्या क्षेत्रातही कालानुरूप नाविन्यपूर्ण बदल होतंच होते. उदाहरणार्थ “सामुदायिक जीवन” ह्या नावाने प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना, त्यांचे भविष्यातील कौटुंबिक आणि सामाजिक जीवन समृद्ध व्हावे ह्यासाठी योग्य सवइंचे शिक्षण वेगवेगळ्या मार्गांनी दिले जाऊ लागले. छात्र समिती हा पूर्वीचा एक कल्पक उपक्रम बिद्यार्थी पंचायत मंडळ ह्या नावाने कालानुरूप अश्या नव्या स्वरूपात पुनरुज्जीवित करण्यात आला. उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीमध्ये उनाडक्या करण्या ऐवजी विद्यार्थ्यांचा वेळ काही नवीन छंद, कला आत्मसात करण्यात खर्च व्हावा अश्या उद्देशाने छंद-व्यवसाय कार्यक्रम पत्रिका सर्वांना दिली जाई. ह्याखेरीज विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध गुणांचा आविष्कार आणि विकास करण्याची संधी मिळावी म्हणून विविध उपक्रम नव्याने किंवा चालू असलेले उपक्रम – निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्तलिखित नियतकालिके, क्रीडा महोत्सव, वार्षिकोत्सव इत्यादी. सुधारित आवृत्तीमध्ये आयोजिले गेले. दोन उल्लेखनीय नवीन उपक्रम म्हणजे – शारदीय कथा माला आणि व्याख्यान माला. अनेक मान्यवर लेखक, कवी, विचारवंत, शात्रज्ञ ह्यांच्या कथा, कविता, विचार, आधुनिक जगात होणाऱ्या घडामोडी ह्या मालिकांमधून विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळू लागल्या. ह्याच काळात ACC/Jr. NCC आणि बालवीर/वीरबाला (Scout/Guides) असे अभिनव उपक्रमही विद्यालयात सुरु झाले.

अमृतमहोत्सव

कुठल्याही संस्थेचं वय हे ती संस्था किती वर्षांपूर्वी स्थापन झाली ह्यावरून ठरत नाही. ते ठरतं संस्थेच्या चालक आणि कार्यकर्त्यांच्या काळाप्रमाणे सतत बदलत आणि सतत नव्या वाट शोधत राहण्याच्या क्षमते वर. त्यामुळे रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृतमहोत्सव वगैरे टप्पे, ते साजरे करणाऱ्या संस्थेच्या वाढत्या वयाचे निदर्शक नसून, एव्हढा दीर्घ काळ उलटूनही संस्थेने आपलं तारुण्य अबाधित राखल्याचे उत्सव असत्तात.

पहिल्या पन्नास वर्षांमध्ये केवळ पार्ले पूर्व उपनगरापुरती किंवा फार तर मुंबई पुरती मर्यादित न राहता विद्यालयाची कीर्ती पूर्ण महाराष्ट्रभर एक उत्तम बहुंअंगी शिक्षणसंस्था म्हणून पसरली होती. तसंच ह्या काळात विद्यालयाचे कार्यक्षेत्रही केवळ एक मराठी शाळा एव्हढे मर्यादित न रहाता, सर्व शाखांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी कॉलेजे, मॅनेजमेंट इनस्टीट्युट इत्यादी उपक्रमांचाही त्यात समावेश झाला होता. पण याच काळात शाळेच्या बाहेरील समाजातही मोठे बदल होतंच होते आणि त्याचं प्रतिबिंब विद्यालयाने अंगिकारलेल्या नवनव्या उपक्रमात पडत होतं. उदाहरणार्थ इंग्लीश भाषेचा एकूणच समाजाच्या सर्व प्रकारच्या व्यवहारांत होणारा अधिकाधिक वापर. हे योग्य की अयोग्य हा वेगळा वादाचा मुद्दा झाला. परंतु बाह्य जगात एक सक्षम नागरिक म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करणारे विद्यार्थी आपण जर घडवायचे असतील, तर अश्या वादांच्या भोवऱ्यात न अडकता, इंग्लिश माध्यमातून शिक्षण देणे विद्यार्थ्याच्या दृष्टीने हितकर आहे अश्या विचाराने १९८२ साली संपूर्ण इंग्लिश माध्यमातून पहिल्या इयत्तेपासून शिक्षण देणारी नवी शाखा सुरु झाली.

ह्या काळातला दुसरा, समाजात अक्षरशः विद्युतवेगाने घडणारा महत्वाचा बदल म्हणजे आधुनिक इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीचा रोजच्या आयुष्यात होणारा अधिकाधिक वापर. एकेकाळी निरक्षरपणामुळे समाजात वावरताना जशी मुस्कटदाबी एखाद्याची झाली असती, तशीच कठीण परिस्थिती ह्यापुढे संगणक-साक्षरतेच्या अभावामुळे होईल हे स्पष्ट दिसू लागलं होतं. आपल्या विद्यार्थ्यांची ही नवीन तांत्रिक कौशल्ये शिकण्यासाठी पूर्वतयारी योग्य प्रकारे व्हावी ह्या हेतूने १९८४ साली, NCERT संस्थेने सुरु केलेल्या प्रकल्पाचा उपयोग करून शाळेत संगणक कक्षा तयार झाली. IIT पवई सारख्या नामवंत संस्थेमध्ये शाळेच्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊन, संगणक शिक्षणाचा पायाही घातला गेला. इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी ही सतत बदलणारी, अक्षरशः दररोज नवीन काहीतरी निर्माण करणारी गतिमान शाखा आहे. त्यानुसार विद्यालयाची संगणक शाखा सुद्धा सतत प्रगतीशील राहिली आहे. आणि नुसतेच पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांना न देता प्रत्यक्ष संगणकाचा विद्यालयाच्या रोजच्या व्यवहारात उपयोग कसा करता येईल ह्याची प्रणाली निर्माण करण्याची संधीसुद्धा विद्यार्थ्यांना दिली जाते. परीक्षांचे व्यवस्थापन, निकालपत्रके, शाळेची नित्य प्रशासकीय कामे इत्यादी विविध कामे संगणकाच्या मदतीने केली जातात. आणि ह्याठी लागणारे संगणकाचे प्रोग्रॅम कुठल्याही बाह्य व्यावसायिक संस्थेच्या मदती शिवाय, शाळेचे विद्यार्थी (आजी आणि काही माजी विद्यार्थीसुद्धा) आणि शिक्षक ह्यांनी स्वप्रयत्नांनी तयार केले आहेत.

जेंव्हा एखाद्या विषयाच्या पुस्तकातून शिकलेल्या संकल्पना प्रत्यक्ष रोजच्या जगात वापरायची किंवा अनुभवायची संधी मिळते तेंव्हाच तो विषय आपल्याला खऱ्या अर्थाने समजतो. म्हणूनच सुसज्ज प्रयोगशाळा असणं महत्वाचं ठरतं. सामान्यपणे अशा प्रयोगशाळा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अशा विषयांपर्यंतच मर्यादित असत्तात. पण अश्या प्रत्यक्ष अनुभवाचं महत्व ओळखून विद्यालयात ह्या नेहेमीच्या विषयांबरोबरच भूगोल कक्ष, संगीत कक्ष, चित्रकला कक्ष इतकंच नाही तर पाककला कक्ष सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

भूगोल कक्ष १९८८ साली उभारला गेला. त्यामध्ये सर्व प्रकारची आधुनिक भौगोलिक उपकरणे आणि साधने प्रत्यक्ष वापरायची सोय आहे. एका पूर्ण भिंतीवर सूर्यमालेची सजीव प्रतिकृती आहे. तसेच भूगोलातील वेगवेगळ्या संकल्पना – आंतरराष्ट्रीय वाररेषा, ग्रहणे, पृथ्वीचे अंतरंग इत्यादी विषद करून सांगणारी मॉडेल्स, ग्रह ताऱ्यांचा वेध घेण्यासाठी दुर्बिणी, कालमापनाच्या वेगवेगळ्या पद्धती दर्शविणारी अनेक उपकरणे इत्यादींनी हा कक्ष सुसज्ज करण्यात आला आहे. संगीत कक्षातही अनेक प्रकारची वाद्ये, अभिजात शास्त्रीय संगीताची ओळख करून देणारे तक्ते, ह्या मार्फत विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त गुणांचा विकास करण्याची संधी मिळते. पाककला कक्षही अश्याच आधुनिक स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांनी आणि सुविधांनी सज्ज आहे.

ह्या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमाबरोबरच क्रमिक शिक्षण आणि वेगवेगळ्या विषयांच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्येही विद्यालयाची नेत्रदीपक प्रगती ह्या काळात झालेली दिसेल. जो पर्यंत SSC बोर्डातर्फे SSC परीक्षेत उच्चतम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होत होती तोपर्यंत पार्ले टिळक विद्यालयातील विद्यार्थ्यांची नावं सर्वाधिक संख्येने ह्या यादीत दिसत. त्या व्यतिरिक्त बालवैज्ञानिक, गणित प्रज्ञा, राष्ट्रीय प्राज्ञ शोध, महाराष्ट्र प्रज्ञा शोध, मराठी प्राज्ञ आणि विषारद अशा अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये विद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने यश मिळवत असलेले दिसतात. ह्या मागे अर्थातच त्या विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांची कसून तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांचे परिश्रमही आहेत. हे सर्व उपक्रम सुरु करून यशस्वीपणे राबविण्यात त्या काळातले मुख्याध्यापक श्री. नी.र.सहस्रबुद्धे ह्यांचा मोठा वाटा आहे. अश्या ह्या परीक्षांमध्ये इतक्या सातत्याने शाळेचे विद्यार्थी यश मिळविताना दिसत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आघाडीची शाळा असा शाळेचा लौकिक पसरला त्यात काहीच नवल नाही.

परीक्षांव्यातिरिक्त परंतु एका दृष्टीने तेव्हढ्याच महत्वाचे, विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता आणि कौशल्य विकसित करण्याची संधी देणारे अनेक उल्लेखनीय उपक्रमही विद्यालयात ह्या पुढील काळात सुरु झाले. विज्ञान मंडळाची स्थापना आणि त्याच्या माध्यमातून विज्ञान विषयक प्रदर्शने, विज्ञान-चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, विज्ञान-वक्तृत्व स्पर्धा ह्यांमध्ये भाग घेऊन शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्र पातळीवर पारितोषिके मिळवली आहेत. अर्थातच विज्ञान मंडळाचे कार्यक्षेत्र केवळ स्पर्धांपुरते मर्यादित नसून विज्ञानिष्ठ दृष्टीकोन निर्माण करणे, विज्ञानाच्या सर्वांगीण शिक्षणाचा प्रसार करणे असे व्यापक आहे. त्यानुसार विविध विज्ञान केंद्रांना भेटी, नामवंत वैज्ञानिकांची विद्यालयात भाषणे असे अनेक कार्यक्रम नेहमीच आखले जातात. विज्ञानविषयक असे वेगवेगळे उपक्रम सतत होत राहण्यामागे तत्कालीन मुख्याध्यापिका श्रीमती म.मा. वाटवे ह्यांचा मोठा वाट आहे.

शाळेतील विद्यार्थ्याचे जीवन सर्व अंगांनी विकसित व्हावे ह्यासाठी त्यांच्या कला गुणांनाही जोपासण्याची जरूर असते. अश्या विचारांनी नाट्यस्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, चित्रकला प्राविण्य परीक्षा ह्यामध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले जाते, त्याची योग्य ती तयारी, त्यासाठी लागणारे मार्गदर्शन असे अनेक कार्यक्रम सतत चालूच असतात. आणि त्यांचा परिणाम म्हणून शाळेचे विद्यार्थी ह्या स्पर्धांमध्ये, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी अशा माध्यमातून वेळोवेळी आपली कला सादर करून पारितोषिके मिळविताना दिसतात. क्रीडाक्षेत्रातही १९७६ पासून विद्यालयाने टिळक ट्रॉफी नावाने विविध मैदानी खेळांच्या आंतरशालेय स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली.

त्याच बरोबर काही लक्षणीय उपक्रमांचा उल्लेख येथे केलाच पाहिजे. आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्याच्या उन्नतीकरिता काम करणे आपले कर्तव्य आहे ही शिकवण देण्यासाठी विद्यालया तर्फे अनेक सामाजिक प्रकल्प हाती घेतले जातात – उदाहरणार्थ हेल्पेज इंडिया संस्थेबरोबर कॅन्सर पीडित रुग्णासाठी किंवा आदिवासी लोकांच्या मदती साठी निधी उभारणे, वनवासी कल्याण संस्थेच्या शिबिरात भाग घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक मार्गदर्शन करणे इत्यादी अनेक प्रकल्पात शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.

त्याचप्रमाणे विद्यर्थ्याना पर्यावरण विषयक माहिती देऊन, पर्यावरणाचा ढासळता तोल सांभाळण्याचे महत्व त्यांच्या मनावर बिंबवणे. तसेच पर्यावरणाची जपणूक करण्या मध्ये ते सुद्धा भाग घेऊन महत्वाचं योगदान देऊ शकतात जाणीव त्यांना करून देण्यासाठी वृक्ष संवर्धन योजनेसारख्या योजना विद्यालया तर्फे विद्यार्थ्याच्या सहभागाने राबविल्या जातात.

शालेय अभ्यासक्रम पूर्ण करून पुढच्या वाटचालीची योग्य दिशा ठरविण्यास शाळेतल्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिरं नियमितपणे ह्याच काळात आयोजित केली जाऊ लागली.

अर्थात असे नवं-नवीन उपक्रम सातत्याने अमलात आणले जात असताना, आणि शतकपूर्तीकडे वाटचाल होत असताना विद्यालयाची वाढ – विद्यार्थी संख्या, शिक्षक वर्गाचा विस्तार, त्यासाठी नवीन वर्ग कक्षांची उभारणी वगैरे – नित्यनियमाने चालूच राहिली.

शतकपूर्ती

शाळेची पंचाहत्तरी उलटण्याआधीपासूनच सुरु झालेला एकूणच सामाजिक बदलांचा प्रवाह पुढील काळात अधिकच गतिमान झालेला आपल्याला दिसेल. विलेपार्ल्यासारखी छोटी उपनगरे स्वतःच मोठ्या शहरात रूपांतरीत होत होती. त्यामुळे बाह्य जगाशी वाढणारा संपर्क आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रात उपलब्ध होणारे नवनवीन पर्याय, सातत्याने उंचावणारा आर्थिक स्तर, एकूणच जीवनात अधिकाधिक वाढत असलेली स्पर्धा आणि त्यामुळे शाळेसारख्या सेवा पुरविणाऱ्या संस्थांविषयी वाढलेल्या अपेक्षा ह्या सर्व पार्श्वभूमीवर शाळेच्या कार्य क्षेत्रात आणि व्यवहारांत झपाट्याने बदल घडणे अपरिहार्यच होते.

उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक बोर्डाशिवाय इतर बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांची स्थापना सर्वत्र झपाट्याने होत होती. त्यात CBSC,ICSE, International school इ. बोर्डांची शैक्षणिक पद्धती सुरुवातीला महाराष्ट्र राज्य बोर्डापेक्षा वेगळी होती. त्यांचा अभ्यासक्रम, शिकवण्याच्या पद्धती, प्रकल्पांवर भर, अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमांवर दिला जाणारा भर या सर्वांमुळे त्या शाळांचे आकर्षण वाढू लागले होते. विलेपार्ल्यातही अशा शाळांच्या मागणीचा जोर वाढत होता. हे सर्व लक्षात घेऊन संस्थेने सन २००८ मध्ये ICSE शाळा सुरु केली. परंतु ICSE बोर्डाचे संलग्नतेचे निकष फार कडक होते. त्यांच्या सर्व निकषांची पूर्तता झाल्यासच शाळेला मान्यता मिळणार होती. सर्वात महत्वाची अट म्हणजे या शाळेला स्वतंत्र जागा हवी. जागेची चणचण तर आधीच असलेल्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सुद्धा भेडसावतच होती. ह्याला एकच उपाय होता तो म्हणजे माध्यमिक शाळेच्या मैदानावर एक मोठी इमारत बांधून प्राथमिक आणि माध्यमिक अश्या दोन्ही शाळा त्यामध्ये भरवणे आणि प्राथमिक शाळेची इमारत (क्र. ५) ICSE शाळेसाठी उपलब्ध करून देणे. आणि हे सर्व विद्युतवेगाने होणे जरुरीचे होते कारण स्वतंत्र इमारतीच्या उपलब्ध्तेविना ICSE बोर्डाची मान्यता मिळाली नसती.

अर्थात अशी आव्हाने स्वीकारून ती वेळेआधीच पूर्ण करणे ही शाळेची परंपराच होती. त्यानुसार २०११ साली नवी इमारत तयार झाली आणि इमारत बांधणी साठी काढावे लागलेले कर्ज सुद्धा वेळेआधीच फेडले गेले. २०१४ साली ICSE बोर्डाची रीतसर मान्यता ही शाळेच्या ICSE शाखेला मिळाली.

एकीकडे शाळेच्या नवनवीन शाखा स्थापल्या जात असताना उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातही वेगवेगळे उपक्रम ह्याच काळात सुरु झाले. म.ल. डहाणूकर महाविद्यालयातील जागा वेगळी करून तेथे PTV Institute of Management ची स्थापना २००८ मध्ये केली गेली. ही इनस्टीट्युटही अल्पावधीतच नावारूपाला आली. इनस्टीट्युटमध्ये पदाव्युत्तर शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी हुशार असतात. कल्पक असतात स्वत:चा व्यवसाय करण्याची क्षमता आणि इच्छा सुद्धा त्यांना असते परंतु ह्या वेगळ्या वाटेने कसं जावं ह्या बद्दल ते पूर्णपणे अनभिज्ञ असतात. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांची मानसिकता ही उच्च विद्याविभूषित होऊन कुठेतरी चांगली नोकरी मिळवावी अशी बनते. त्यांना जर वेळीच मार्गदर्शन मिळालं तर त्यांच्यातील सर्जनशीलतेला योग्य तो वाव मिळेल अश्या विचाराने इनस्टीट्युटमध्ये COEI (Centre of Entepreneurship and Inovation) या सेंटरची स्थापना करण्यात आली. त्यासाठी इन्स्टीट्यूट मध्ये एक स्वतंत्र कक्ष उभारला गेला. विद्यार्थी येथे येऊन विविध क्षेत्रातील माहिती मिळवतात व त्यातून प्रकल्प निश्चित करतात. त्यांना उद्योग जगतातील अनुभवी व्यक्तींचे सतत मार्गदर्शन होत असते.

हे सर्व नवीन उपक्रम मार्गी लागले तो पर्यंत शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात– दोन मराठी माध्यमाच्या, एक इंग्रजी माध्यमाची व एक ICSE बोर्डाची अश्या एकंदर चार शाळा कार्यरत झाल्या होत्या.

एखाद्या संस्थेची व्याप्ती – कार्यक्षेत्राची आणि भौगोलिक दोन्ही – जसजशी वाढत जाते, तसतसं वाढत्या कार्यक्षेत्राचं योग्य विभाजन संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि कर्मचार्‍यांमध्ये करणं जरुरीचं होतं. परिणामी कार्यकर्त्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा एकमेकाशी असणारा संपर्क दुरावत जाण्याची आणि संस्थेच्या एकसंधतेला, एकवाक्यतेला तडे जाण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे संस्थेच्या विविध शाखांशी संलग्न असणाऱ्या सर्वांनी एकत्र यावे, एकमेकांपासून नवीन काही शिकण्याच्या संधी निर्माण व्हाव्या ह्यासाठी सन २०१८ पासून वेगवेगळी प्रदर्शन भरवण्यास सुरुवात झाली. २०१८ साली इतिहास, २०१९ साली भूगोल तर २०२० मध्ये भाषा विषयांवर प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाला भेट देणार्यांची संख्या १०००० वर होती. तसेच सर्व शाळांतील शिक्षक/ शिक्षिकांचे एकत्रित संमेलन भरवण्यासही सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचे वार्षिकोत्सव झाल्यावर शेवटच्या दिवशी हे शिक्षक एकत्र येऊन आपली कला सादर करतात. सर्व शाळांतील विद्यार्थी एकत्रित सहभागी होतील अश्या वेगवेगळ्या स्पर्धा सुरु झाल्या. त्यात चित्रकला, पाठांतर, विज्ञान प्रकल्प, वक्तृत्व, नृत्य इ स्पर्धा असतात. प्रत्येक स्पर्धेची जबाबदारी एकेका शाळेवर देण्यात येते.

आधुनिक तंत्राद्यान अंगिकारून नव नवीन शैक्षणिक उपक्रमांची सुरुवात शाळेच्या अमृत महोत्सवापूर्वीच झाली होती. ही काळाची गरज तर होतीचं पण ह्या मागे एक नाविन्यपूर्ण विचार ही होता. पुस्तकातून शिकलेल्या संकल्पना प्रत्यक्ष अनुभवायची संधी विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अश्या विषयांसाठी प्रयोगशाळा सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये असतात. जशी रसायनशास्त्रातली एखादी प्रक्रिया केवळ त्याचं पुस्तकातील वर्णन वाचण्यापेक्षा जर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता आली तर अधिक चांगल्या प्रकारे समजते तशाच प्रकारे भूगोल किंवा गणिता सारख्या विषयांतील संकल्पना मूर्त स्वरूपात विद्यार्थ्यांच्या समोर मांडता आल्या तर विद्यार्थ्यांना त्या जास्त चांगल्याप्रकारे आत्मसात करता येतील अश्या विचाराने वेगवेगळ्या विषयांना आणि कलागुणांच्या जोपासानेला वाहिलेली विविध दालने शाळेत ह्या काळात निर्माण झाली. आजमितीला आधुनिक दृक-श्राव्य उपकरणांनी सज्ज अशी संगणक, चित्रकला, संगीत, गणित, भूगोल, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राच्या प्रयोगशाळा, भाषा अश्या विषयांना वाहिलेली दालने शाळेत कार्यरत आहेत.

आजच्या रोजच्या जीवनातल्या नित्य वाढतच जाणाऱ्या ताण-तणावांना सक्षमपणे तोंड देणे भल्या भल्यांना कठीण जात असलेलं आपण दररोज बघतो. अपक्व मनाच्या, पौगंडावस्थेच्या स्थित्यंतरांनी आधीच गोंधळलेल्या, किशोरवयातील मुलांना तर ह्या तणावांना सामोरं जाणं अधिकच कठीण ठरू शकतं. विद्यार्थ्यांच्या संतुलित विकासासाठी त्यांच्या भावनिक आणि मानसिक संतुलनाकडेही लक्ष पुरविणे जरुरीचे आहे अश्या विचाराने विद्यालयाने नामवंत मानसशास्त्रज्ञांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांच्यासाठी मानसिक समुपदेशनाची उत्तम पद्धत प्रस्थापित केली आहे. विद्यार्थ्यांबरोबरच, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यानाही येथे समुपदेशनाचा लाभ घेता येतो. असेच ऑक्युपेशनल थेरपी सारख्या तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगळे दालन उभारण्यात आले आहे.

मागे वळून पहाताना

आपण जर पूर्ण जगभरातल्या व्यावसायिक आणि सेवाभावी अश्या दोन्ही प्रकारच्या संस्थांचा आढावा घेतला तर शंभर वर्ष तर दूरच, पण ५० वर्ष सुद्धा टिकून राहिलेल्या आणि सातत्याने वृद्धिंगत होत असलेल्या संस्था अभावानेच आढळतील. १०० वर्ष सातत्याने आपला मूळ वारसा आणि गुणवत्ता टिकवणे आणि आपल्या कार्यक्षेत्राची आणि संस्थेची वाढ करत राहणे हे अतिशय कठीण व्रत आहे.

एक शतक सतत अधिकाधिक कार्य करत राहण्यासाठी संस्थेचा पाया शाश्वत मूल्यांवर आधारित असावा लागतो. संस्थापकांना व्यापक दूरदृष्टी असावी लागते. संस्था चालविणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक पिढीला आपल्या पेक्षाही अधिक कर्तृत्ववान आणि दूरदृष्टीची पुढची पिढी तयार करावी लागते. ही साखळी पाच पिढ्यांपर्यंत न तुटता पार्ले टिळक विद्यालयात अबाधित राहिली आहे.

शाळेतून बाहेर पडून बाह्य जगात आपली वाट शोधताना शालेय दिवसांत शिकलेल्या अनेक गोष्टींपैकी कशाचा पुढच्या आयुष्यात कसा उपयोग होतो ह्याचा कार्यकारणभाव ठरवणं कठीण असतं. तसेच प्रत्यक्ष शिकवले न जाताही शाळेच्या वातावरणातून, शिक्षक आणि चालकांच्या वागणुकीतून, प्रतीत होणाऱ्या मूल्यांचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतच असतो. शिवाय पार्ले टिळक विद्यालयाच उद्दिष्ट केवळ क्रमिक शिक्षण देणे असं मर्यादित कधीच नव्हतं. उत्तम नागरिक घडवणे ह्या उद्दिष्टाने जे बहअंगी शिक्षण विद्यालयात दिलं जातं त्यामुळे एकूणच रोजच्या जगण्याचा संघर्ष करताना लागणारा व्यापक दृष्टीकोन आणि बहुविध कौशल्य विद्यार्थ्यांना मिळतं नक्कीच. शाळेतून उत्तीर्ण होऊन विविध क्षेत्रांत उच्चतम यश मिळविणाऱ्या, समाजात मान्यता मिळविणाऱ्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळविणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची नामावलीच त्याचा उत्तम पुरावा आहे.

शंभर वर्षांपूर्वी, एक लहानशी खोली, एक लांब बाक, खुर्ची, फळा आणि एक लाकडी पेटी अश्या स्थितीत सुरुवात करून आज पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या, कॉम्पुटर विभागासकट सर्व आधुनिक उपकरणांनी सुसज्ज विलेपार्ल्यातील ३ शाळा (मराठी, इंग्रजी, ICSC), परांजपे विद्यालय अंधेरी, साठ्ये कॉलेज, म.ल.डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स, Institute of Management, मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स अशा आठ शिक्षण संस्थांमध्ये एकूण २६००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे पार्ले टिळक विद्यालयाची मूळ उद्दिष्टे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करतानाही तशीच अबाधित आहेत.

स्थापनेनंतरच्या ह्या १०० वर्षाच्या काळात शाळेच्या सर्व अंगांनी होणाऱ्या भरभराटीमागे अनेक पार्लेकरांचे आणि शाळेच्या चालक आणि शिक्षक वर्गाचे श्रम, कर्तुत्व, दूरदृष्टी आणि औदार्याचे बळ होते. त्यांचा नामनिर्देश करणे जरुरीचे आहे.