शतकमहोत्सव सदर क्र. ७ : मुख्याध्यापक व शिक्षक / शिक्षिका सक्षमता

            शतकमहोत्सव सदर क्र. : मुख्याध्यापक व शिक्षक /शिक्षिका सक्षमता

विद्यार्थ्यांच्या /विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये चालणारे विविध उपक्रम तसेच त्यांना शिस्त लागावी म्हणून आखलेल्या योजना आपण सदर ६ मध्ये बघितल्या. ते उपक्रम राबवण्यात व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा कोणाचा असेल तर तो मुख्याध्यापक व शिक्षकांचा /शिक्षिकांचा . संस्कारक्षम अशा वयात मुले शाळेमध्ये घरच्यापेक्षा जास्त वेळ असतात. याचमुळे शाळेमध्ये झालेले संस्कार दीर्घ काळ टिकून राहतात. पार्ले टिळक शाळेच्या स्थापनेनंतर पहिल्या २५ वर्षातील मुख्याध्यापक, शिक्षकांची सक्षमता पाहण्यासाठी केलेली योजना व काही आठवणी दिल्या आहेत.  

विदयालयाचे माजी मुख्याध्यापक

  • श्री. महादेव गोविंद पिंगळे,B.A.,

हे ९ जून १९२१ पासून मुख्याध्यापक होते. ते शिस्तप्रिय असूनही विद्यार्थ्याना हसतखेळत शिकवणारे शिक्षक असा त्यांचा लौकिक होता. १९२३ च्या मार्च अखेरीस ते विद्यालय सोडून गेले. 

  • श्री. श्रीपाद सदाशिव मराठे, M.A., (Physics).

हे मुख्याध्यापक म्हणून मार्च १९२३ पासून काम पाहू लागले. श्री. मराठे हे अगदी आरंभापासूनच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे  चिटणीस होते. ते विद्यालयात येण्यापूर्वी टाटा कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीस होते. सार्वजनिक कामाची हौस, राष्ट्रीय वृत्ति, तरुणपणची धडाडी यामुळे मराठे यांनी आपल्या कारकीर्दीत विद्यालयाला नावारूपास आणण्याचे आटोकाट यत्न केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व चालक मंडळाचे चिटणीस या दोन्ही हुद्यांवर श्री.मराठे असल्यामुळे त्यांचा शिक्षक वर्ग व विद्यार्थी या उभय घटकांवर सारखाच वचक असे. श्री. मराठे यांनी विद्यालयाच्या हरएक कार्यक्रमात एकसूत्रीपणा व शिस्त यांचे उत्कृष्ट बीजारोपण केले.यांचेच कारकीर्दीत औद्योगिक शाखा सुरु होऊन तीत विणकाम, मातकाम,कागदकाम वगैरे विषयाचे शिक्षण सुरु झाले.विद्यार्थ्यांचे पार्लमेंट व शिक्षकसंघ यांनीच काढले. हे १९२६ पासून विद्यालयाचे लाईफ मेंबर होते. काही तात्विक मतभेदांमुळे श्री. मराठे हे जुलै १९३२ मध्ये विद्यालयातून स्वखुशीने सेवानिवृत्त झाले.

  • कै. श्री. गणेश सखाराम आगाशे, B.A.,S,T.C.D.

श्री. आगाशे हे नोव्हेंबर १९३२ ते ३१ मार्च १९३४ पर्यंत मुख्याध्यापक होते. उत्तम शिक्षक व मनमिळावू अशी त्यांची ख्याती होती. यांचे कारकीर्दीत विद्यालयाचे शिक्षक वर्गाचे पगाराचे स्केल कायम करण्यात आले. तसेच शैक्षणिक लायकीनुसार जास्तीत जास्त शिक्षकांना कायम करण्याचे धोरणही विद्यालयात अनुसरले जाऊ लागले. श्री. आगाशे यांनी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मुख्याध्यापक पद १९३४ च्या मार्च अखेर सोडले.

  • श्री. रामचंद्र महादेव मराठे MA., LLB, B.T.

हे जून १९३४ ते मे १९३७ अखेर विद्याल्याचे मुख्याध्यापक म्हणून काम पहात असत. ते उत्तम व्यासंगी शिक्षक असून मॅट्रिकच्या वर्गात इंग्रजी, मराठी, संस्कृत व गणित यापैकी कोणताही विषय उत्तम रीतीने शिकवीत. त्यांचे कारकीर्दीत विद्यार्थ्यांच्या पार्लमेंटचे पुनरुज्जीवन होऊंन छात्रसमिति नावाचा  विभाग सुरु झाला . श्री. मराठे हे १९३७ मध्ये विद्यालयातून सेवानिवृत्त झाले.

  • श्री.मा. सी. पेंढारकर MA., B.T., M.ED.

हे जून १९३७ ते में १९४५ अखेरपर्यंत श्री. पेंढारकर मुख्याध्यापक म्हणून काम पाहात होते. शिक्षणपद्धति निर्दोष करण्याकरिता अनेक अभिनव उपक्रम ते करीत. विद्यालयाची सांस्कृतिक परंपरा कायम ठेवण्याचा व शैक्षणिक कार्यक्रमातील दोषस्थळे घालविण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांनी अनेक आकडेवारीचे तक्ते जमा करुन विद्यार्थ्यांचे मानसिक उन्नतीचा सशास्त्र अभ्यास करणे सोपे जावे म्हणून बरीच माहिती जमविली होती. ते स्वत: अभ्यासू होते .विद्यालयास चांगले रूप द्यावे असे त्यांना वाटे. विद्यार्थीवर्गात श्री. पेंढारकरांबद्दल फार आदर असे. पालकवर्ग व इतर स्थानिक मंडळींतही त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदर वसत होता. ते जून १९४५ साली  विद्यालय सोडून गेले.

शिक्षक सल्लागार समिती : (Teachers Advisory Committee)

सन १९२६ मध्ये विद्यालयात ‘शिक्षकसंघ’ स्थापन झाला. त्यास बोर्ड ऑफ डायरेकटर्सनी मान्यता दिली होती. शिक्षकसंघाचे श्री. मराठे व श्री. म.द. बाक्रे या दोघांना आपले प्रतिनिधी नेमून दिले होते. हे दोन प्रतिनिधी व बोर्डाचे दोन सभासद मिळून चौघांचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट् त्या वेळी असून सर्व अंतर्गत कारभार बोर्ड ऑफ मॅनेजमेंट्च्या हातात होता. तथापि सन १९३० च्या सुमारास शिक्षक संघ मोडला व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट्ही बंद झाली. यानंतर १९३० ते १९४३ पर्यंत विद्यालयाचे मुख्याध्यापक जुन्या शिक्षकांच्या अनौपचारिक सल्ल्यानेच कारभार पाहत. असा सल्ला मिळवण्यासाठी मुख्याध्यापक ‘ कायम शिक्षक समिती’ स्वत:च्या अधिकारात स्थापित असत. या समितीस बोर्डाची अधिकृत संमती नसे. मुख्याध्यापक त्यांना वाटतील त्या बाबतीत या समितीचा सल्ला घेत. एप्रिल १९४३ मध्ये विद्यालयाच्या चिटणीसांनी ‘ शिक्षक सल्लागार समिती’ शिक्षक वर्गातील दोन प्रतिनिधी, सुपरिटेंडेंट व ऍ. सुपरिटेंडेंट व स्वत: आपण अशी पाच जणांची समिती स्थापिली. या समितीचे अध्यक्ष बोर्डाचे सेक्रेटरी असतात व कार्यवाह मुख्याध्यापक असतात. या सल्लागार समितीने कोणाही शिक्षकाच्या वैयक्तिक हिताहिताचा विचार करावयाचा नसून अंतर्गतकारभाराच्या नित्यनैमित्तिक बाबींचा विचार करून सुसंमत तत्वावर विद्यालयाचा कारभार चालविण्यास मदत करावयाची असे ठरले.

पहिल्या शिक्षक सल्लागार समितीचे सभासद :- (१) श्री. वा.दा. जोग, अध्यक्ष, (२) श्री. मा.सी. पेंढारकर, कार्यवाह, (३) श्री. शं. ग. भागवत,  ऍ.सुपरिटेंडेंट. (4) श्री. दि. ल. देवधर, व श्री. ज. वि. जोशी (शिक्षक वर्गाचे दोन नियुक्त प्रतिनिधि.) या समितीने एप्रिल १९४३ ते ३१ मार्च १९४५ अखेरपर्यंत काम केले.

१ एप्रिल १९४५ पासून द्वितीयशिक्षक सल्लागार समिती स्थापन झाली.

शिक्षक सल्लागार समितीमुळे पुढील फायदे झाल्याचे निदर्शनास आले आहे:- (१) अंतर्गत व्यवस्था निर्दोष करण्यात आली. (२) शिक्षकवर्गाचे अधिक सहकार्य मिळू लागले. (३) शिक्षकवर्गाच्या सामुदायिक अडचणी दूर करणे सोपे झाले. (४) शैक्षणिक बाबींचा सांगोपांग विचार होऊन नव्या योजना आखणे सोपे झाले. (५) होतकरू व लायक शिक्षकांची ओळख होऊन त्यांच्या कर्तुत्वास वाव मिळू लागला. (६) पूर्वीच्या एकतंत्री  कारभारास मुरड घालून सुसंबद्ध कारभार सुरु झाला. (७) बोर्डाच्या सेक्रेटरींचा शिक्षकांशी वेळोवेळी परिचय झाल्याने मगदुराची माणसे कोण आहेत हे कळू लागले. (८) चालकवर्गांपैकी जबाबदार अधिकारी शिक्षकांत मिसळू लागल्याने त्यांना शिक्षिकवर्गाच्या खऱ्या अडचणी कळू लागल्या व त्या दूर करणे शक्य झाले.                                        

शिक्षक सल्लागार समिती स्थापन करून शिक्षक वर्गाच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला गेला.त्यातून शिक्षकांमध्ये सौदार्हाचे वातावरण निर्माण करण्यात यश मिळाले. हा व्यवस्थापनाचा आदर्श असून ते नेहमीच अनुकरणीय राहील.

नि:स्पृहतेचे उदाहरण:

विद्यालयातील एक नामवंत व विद्यार्थीप्रिय असे गणित विषयाचे शिक्षक श्री. वासुदेव सदाशिव फडके हे १९३५ मध्ये दिवंगत झाले. श्री, फडके हे हसतमुख, तडफदार, निरलस काम करणारे, खेळीमेळीने वागणारे, स्पष्टवक्ते असे उत्तम गणित शिक्षक होते. 1930 मध्ये जे दोन कायम शिक्षक विद्यालयात नेमले गेले त्यात श्री. फडके यांचा दुसरा नंबर होता व ते नेमणुकीपासून कायम शिक्षक म्हणून घेतले गेले होते. ही निवड श्री. पारधी यांनी केली होती. श्री. फडके दिवंगत होताच विद्यार्थी आणि शिक्षकवर्गातून त्यांच्या स्मृत्यर्थ काहीतरी फंड जमा केला जावा, त्यातील काही भाग श्री. फडके यांच्या पत्नीस मदत म्हणून पाठवावा व एखादे लहानसे पारितोषिक फडके यांच्या स्मृत्यर्थ १/३ वर्षे तरी ठेवता आले तर पाहावे अशा सुचना येऊ लागल्या. श्री. फडके यांच्याबद्दल शिक्षक वर्गालाही हळहळ वाटली. मग विद्यार्थी आणि शिक्षकांची संयुक्त सभा भरून फडके स्मारक निधि जमवावा व तो जमेल त्याप्रमाणे पुढील तजवीज कराव्या असे ठरून २/३ महिन्यात २००रु. निधी जमला. त्यातील १५० रु श्रीमती फडके यांना मदत देण्याचे ठरुन त्यादृष्टीने त्यांच्याशी स्मारकनिधीचे कार्यवाह श्री. ज. वि. जोशी यांनी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारास श्रीमती फडके यांनी पुढील उत्तर पाठविले, 

“आपण कै. फडके यांचे स्मृत्यर्थ जमविलेल्या निधीतून रु १५०  मदत मला देण्याचे ठरविल्याबद्दल मी स्मारक निधि मंडळाची आभारी आहे. तथापि श्री. फडके यांची चिरस्मृति विद्यालयात रहावी या हेतूने मी १५० रु. ची तुम्ही देऊ केलेली साभार परत करते व ती मंडळाने योग्य त्या मार्गाने खर्चून माझ्या पतीचे चिरस्मारक राहील अशी तजवीज केल्यास मला समाधान होईल.”

तदनंतर फडके स्मारक निधि मंडळाने सदर निधि विद्यालयास पुढील अटींवर देण्याचे ठरविले व त्या अटी विद्यालयाने मान्य केल्या. त्या अटी अशा:- कै.वासुदेव सदाशिव फडके बी.ए. यांचा फोटो विद्यालयात ठेवला जावा. फडके स्मारक निधीच्या २०० रु. रकमेच्या कायम निधीचे सर्व व्याजाची रक्कम प्रतिवर्षी विद्यालयातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलास अगर मुलीस गणित (Mathematics) या विषयात जास्त मार्क मिळतील त्यास अगर तीस फडके यांचे स्मृत्यर्थ पारितोषिक रुपाने दिली जावी.   
सन १९४६ चे छायाचित्र 

शिक्षकांची सक्षमता

शिक्षकांच्या व शिक्षिकांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दुहेरी योजना पुढीलप्रमाणे होती.

सुपेरिटेन्डन्ट यांनी दर  सहामाहीत  प्रत्येक शिक्षकाचे काम निदान तीन तास काळजीपूर्वक पहावे.

शिक्षकाचा नियमितपणा ,कामाची आवड , शिक्षणाची कळकळ, मुलांबरोबर वागणूक या गोष्टी विचारात घेऊन शिक्षकांविषयी मत बनवावे,

शिक्षकाचे स्वतंत्र पुस्तक,या पुस्तकावरून शिक्षकाने किती विचारपूर्वक व पद्धतशीर काम केले आहे  ते समजून घेण्यास मदत होईल. पुस्तकात पुढीलप्रमाणे माहिती लिहावी.

१.ठराविक अभ्यासक्रम करून घेण्याकरता शिक्षकाने आखलेली सहामाही कामाची प्रत्यक्ष योजना.

२.विद्यार्थ्यांचे त्या त्या विषयातील प्रगतीप्रमाणे केलेले वर्गीकरण. ज्या विद्यार्थ्यांमध्ये फरक दिसून आला त्या विषयी नोंद

३. वर्गातील शिक्षणाला मदत म्हणून शिक्षकाने जमवलेली माहिती व तयार केलेले तक्ते

४. परीक्षेच्या पेपर तपासण्यावरून आत्मनिरीक्षणाच्या हेतूने काढलेलं निष्कर्ष

५, मुलांच्या वह्या तपासताना त्यातील गुण दोष व चुका सुधारण्यासाठी काही विशेष पद्धत असल्यास त्याचा उल्लेख

६. रोजच्या वह्या लिहिण्याबद्दल घालून दिलेली सामान्य पद्धत

७. घरचा अभ्यास देण्याविषयीचे धोरण

८. मुलांच्या वागणुकीत विशेषप्रमाणे दिसणारे स्वभाव विशेष

९. पालकांबरोबर संवाद, पत्रव्यवहार

१०. शिक्षकाला आपल्या कामात आलेल्या अडचणी व गरजा

११. शिक्षण विषयक पुस्तके अगर लेख यातून काढलेले मुद्दे , विशिष्ट पद्धती

शिक्षकांनी वरिलप्रमाणे ठेवलेल्या पुस्तकातून ते किती परिश्रम घेतात , किती विचार करतात. याची काहीशी कल्पना करता येईल, तसेच त्यानी केलेल्या नोंदी  अध्यापनाच्या प्रगतीला पूरक ठरतील. शिक्षक पुस्तकात लिहिल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करतो कि नाही हे शिक्षकाच्या निरीक्षणाच्या वेळी ताडून पाहता येईल.

अतिशय मोजक्या  शब्दात शिक्षकांशी संबंधित सर्व बाबी अंतर्भूत करून त्यांची सक्षमता वाढवण्याची व तपासण्याची एक चांगली योजना तयार केली आहे.आजही त्याचा तेवढाच फायदा होईल.