शतकमहोत्सव सदर क्र. ६ : शालेय अभ्यासक्रम व इतर उपक्रम

शतकमहोत्सव सदर क्र. ६ : शालेय अभ्यासक्रम व इतर उपक्रम             

सदर क्र. ५ मध्ये आपण औद्योगिक शाखेची विद्यालयात काय व्यवस्था होती तसेच विद्यालयाला सरकारी मान्यता मिळवताना किती अडचणी आल्या ते आपण पाहिले. टिळक विद्यालयाचा विद्यार्थी सतेज बुद्धिमान व स्वावलंबी झाला पाहिजे. विद्यालयाच्या ध्येयानुसार मुलामुलींची बौद्धिक व शारीरिक प्रगती करण्यासाठी सर्व व्यवस्था करावी असे घटनेत नमूद करण्यात आले होते. पार्ले टिळक शाळेने स्वतःच्या  मालकीची इमारत झाल्यावर १९४६ पर्यंतच्या कालावधीत विद्यालयाचे ध्येय साध्य करण्यासाठी काय  व्यवस्था केली होती व ती कशी यशस्वी झाली ते आपण पाहू या.

बौद्धिक प्रगती :
बौद्धिक वाढीस आवश्यक असणाऱ्या इतर क्रमिकेतर शैक्षणिक बाबींकडे सुरवातीपासून लक्ष पुरवले जात असे. यात मुलांकरिता वाचनालय, वक्तृत्व सभा, सहली, छात्रसमिती, खेळांचे सामने, शालेय उत्सव , निबंध स्पर्धा इत्यादींचा अंतर्भाव त्यात होता.
शाळेतून हिंदुस्थानी भाषेच्या परीक्षेला बसवत असत. शिवाय मराठी साहित्य संमेलनाचे वतीने घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या ” प्राज्ञ” व “विशारद” या परीक्षेसाठी सुद्धा विदयार्थ्यांची तयारी करून घेतली जात असे.

क्रमिकेतर उपक्रमातील  विशेष बाबींकडे आपले लक्ष वेधतो : 

‘विद्यार्थ्यांचे पार्लमेंट’ : 
मुलामुलींना बौद्धिक शिक्षण देताना ‘हुकमसे चलना’ अशी त्यांची परावलंबी भूमिका राहू न देता त्यांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव व्हावी, आपल्या आंगच्या बहुविध गुणांचे आविष्करण करण्यास संधी मिळावी, भावी नागरिक जीवनास उपयुकत ज्ञान संपादिता यावे, लोकसंग्रह करताना येणाऱ्या थोड्याफार अडचणींची जाणीव व्हावी, अशा अनेक दृष्टींनी विद्यालयाच्या अध्यापकांनी सन १९२८ च्या अखेरीस ‘विद्यार्थ्यांचे पार्लमेंट’ या नावाचा एक विभाग काढला विद्यालयाच्या प्रगतीतील एक महत्वपूर्ण टप्पा या नात्याने या मुलांच्या पार्लमेंटचे स्थान मोठे आहे, म्हणूनचं त्या घटनेचे व कार्याचे समालोचन करणे आवश्यक आहे.
पार्लमेंटचे काम छात्रमतानुवर्ती होण्याकरीता मुलांमधून प्रतिनिधीची निवड केली जाई. प्रतिनिधीची संख्या ३५ असून त्यात २५ मुलगे व १० मुली असत. पार्लमेंटची मुदत १ वर्षाची असून त्याचा अध्यक्षही प्रतिनिधींमधूनच निवडला जाई. या अध्यक्षीय निवडणुकीस शिक्षकसंघ व विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचीही समंति मिळावी लागत असे. क्रीडामंडळ, उत्सवमंडळ, कन्यामंडळ, स्टेशनरी स्टोअर्स ही चार पार्लमेंटची मंडळे असून प्रत्येक मंडळावर तीन पार्लमेंटचे सभासद व दोन सल्लागार शिक्षक शिक्षकसंघातर्फे निवडले जात. याशिवाय अध्यक्ष , खजिनदार, चिटणीस यांच्या कामांची वाटणी केलेली असे. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत पार्लमेंटने निवडलेल्या तात्पुरत्या अध्यक्षांचे मार्फत सभेचे काम चाले. मतभेदाचा प्रश्न उद्भवल्यास शिक्षकसंघाचा निर्णय मान्य केला जाई.
इतिहास मंडळ या नावाचे एक मंडळ त्याचवेळी विद्यालयात कार्य करीत होते. तिची व्यवस्था श्रीयुत रत्नपारखी व श्रीयुत आ. रा. चितळे या दोन शिक्षकांकडे सुपूर्त केली होती. विद्यालयाचे दृष्टीने पार्लमेंटची घटना अभूतपूर्व होती. कारण पार्लमेंटचा अध्यक्ष विद्यार्थी असे व पार्लमेंटचा सालीना तनखा ६०० रुपयांचा असे. शिक्षक केवळ सल्लागार होते. व मुख्याध्यापकांची पार्लेमेंटचे कामावर पूर्णतया देखरेख असे.

छात्रसमिती :
विद्यालयात सध्या अस्तित्वात असलेल्या छात्रसमितीचे मूळ बीज १९२८ साली स्थापन झालेल्या याच विद्यार्थ्यांच्या पार्लमेंट मध्ये आढळून येते.
सन १९३० ते १९३६ या सहा वर्षांच्या सुप्तावस्थेनंतर  १९३६ च्या डिसेंबर महिन्यात विद्यालयाचे त्यावेळचे मुख्याध्यापक श्री. रा. म मराठे यांनी पार्लमेंटचे छात्रसमितीच्या रूपाने पुरुज्जीवन केले. सन १९३६ च्या डिसेंबरच्या ८ तारखेस स्थापन झालेल्या प्रथम छात्रसमितीचे मुख्याध्यापक श्री. रा. म.मराठे यांनी नियुक्त केलेले अध्यक्ष श्री. मा. सी. पेंढारकर व कायम कार्यवाह निवडले असल्यामुळे समितीच्या कार्यात त्यांना बराच वेळ खर्चून कामाकडे लक्ष पुरविता आले. शिवाय मुख्याध्यापक हेही समितीबाहेर राहून दोषांचे निरीक्षण करून योग्य ते मार्गदर्शन पदाधिकाऱ्यास करीत असत.
विद्यार्थ्यांनी केलेले नियम त्यांच्याकडून लवकर पाळले जातात.त्यायोगे स्वयंस्फूर्तीने शिस्त पाळण्याची सवय लागते.निरनिराळ्या उपक्रमांमध्ये जबाबदारीची कामे करण्यामुळे स्वावलंबनाचे शिक्षण मिळते. शिवाय नेतृत्वाचे बीजारोपण होते. हि छात्रसमिती शिस्त परिषद , ग्रंथ संग्रहालय, स्टोअर्स , वाचनालय, खेळ व विद्यार्थी सहाय्यक मंडळ चालवते. ह्या समितीला दोन शिक्षक मार्गदर्शक असत. प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनापासून कार्यवाहीपर्यंत सर्व जबादारी समितीची असते, हा स्वयंस्फूर्त शिस्तीचा प्रयोग शिक्षणशास्रात नवीन होता.  

मुलांची हस्तलिखित मासिके :
छात्रसमितीच्या वतीने पहिल्या  “आत्मस्वरूप” नावाच्या  द्वैमासिकाचा अंक फेब्रुवारी १९२९ मध्ये प्रसिद्ध झाला. विद्यालयाचा हा वाङ्मयीन प्रयत्न विशेष होता, यातील लेखात विविधता आणि नावीन्य होते व त्याचा दर्जाही वरच्या प्रतीचा होता. पण एका वर्षातच हे द्वैमासिक बंद झाले. त्याची जागा इतर हस्तलिखितांनी घेतली. उदा. अरुण,प्रकाश ज्योती, किरण, विकास, प्रदीप, उदय. पण एकही मासिकाला “आत्मस्वरूप” ची आठवण मिटवता आली नाही.

सृष्टीनिरीक्षणगृह :
शरीरशास्त्रास आवश्यक त्या अवयवाचे नमुने व खनिज वस्तूंचा संग्रह इथे ठेवले होते. शिवाय डास, बेडूक, किडे इत्यादी प्राण्यांची प्रत्यक्ष वाढ विद्यार्थ्यांना पाहता येते व तारीखवार नमूद करता येते. झाडांची वाढ कशी होते ते सुद्धा विद्यार्थी इथे शिकत होते. या निरीक्षणाकरिता गोवारी भेंडी इत्यादी भाज्या लावण्यात आल्या होत्या.

शालेय उत्सव :
विद्यालयात विविध उत्सव साजरे केले जायचे. त्या उत्सवांमधील विशेष उपक्रम फक्त नमूद करणार आहे.

टिळक पुण्यतिथी :
कोणातरी प्रथितयश पुढाऱ्याचे व्याख्यान होऊन टिळक पुण्यतिथी साजरी करण्याची परंपरा २५ वर्षे चालू होती. लोकमान्य टिळकांच्या चरित्राचे परिशीलन निबंध व व्याख्यानाद्वारा करण्याची प्रथा होती.

ज्ञानेश्वर पुण्यतिथी :
प्राचीन मराठी भाषा , ज्ञानेश्वरांचे भाषाप्रभुत्व, संतवाङ्मयाची महती व गोडी याचे ज्ञान आणि ज्ञानेश्वरी वाचनाची गोडी लागावी या हेतूने आदरणीय सोनोपंत दांडेकर यांच्यासारख्या वारकरी संप्रदायातील वक्त्यांची प्रवचने होत.

गीताजयंती:
भगवद्गीतेतील नेमून दिलेल्या अध्यायाचे पाठांतर व एखादे व्याख्यान ठेवले जाई.

दासनवमी :
रामदासचरित्र व महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास व्हावा म्हणून व्याख्याने ठेवली जात.

शिवराज्याभिषेक:
पोवाडे व चरित्रकथन या स्वरूपात हा दिन साजरा व्हायचा.

विजयादशमी:
प्रत्येक  महाराष्ट्रीय  विद्यार्थ्याने स्वकर्तव्य म्हणून मराठ्यांच्या इतिहासाचे अध्ययन केले पाहिजे. या हेतूने दसऱ्याच्या वेळेस मराठयांच्या इतिहासासंबंधी विषय निबंधाकरिता ठेवले जात. सांघिक कवायत घेतली जाई.

गणेशोत्सव शारदोत्सव हे उत्सवही निबंध , वक्तृत्व , हस्ताक्षर, नाटक, पाठांतर, नकला , काव्यगायन इत्यादी विविध स्पर्धा घेऊन साजरे व्हायचे

वक्तृत्व कला :
१९३६ मध्ये छात्रसमिती स्थापन झाल्यावर वक्तृत्व प्रधान कार्यक्रम आखून दर बुधवारी सभा घेण्याचे ठरले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विदयार्थ्यांनी अनेक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रशंसनीय कामगिरी केली, त्याचे सर्व पातळीवर कौतुक झाले.

सहली :
त्याकाळीही लांब पल्ल्याच्या सहली काढल्या जात होत्या. १९३२ व १९३३ साली सहलीची ठिकाणे होती गोवा, हंपी, विजयनगर, सोलापूर , दिल्ली, ग्वाह्लेर आग्रा, मथुरा इत्यादी,

शारीरिक शिक्षण:
१९२७ साली विद्यालयाचे संघांनी बडोदा येथील ‘ हिंदविजय जीमखान्यातर्फे घेण्यात आलेल्या हिंदी खेळांच्या सामन्यात उतरुन उपांत्य सामन्यात यशस्वीहोऊन प्रशस्तिपत्रे मिळवून विद्यालयाचे नावलौकिकात भर टाकली. याकाळात (१९२७-१९३०) विद्यालयात श्री. धोंडोपंत कोपर्डेकर (गु. अण्णासाहेब कोपर्डेकर) हे व्यायामशिक्षक असून त्यांनी विद्यार्थ्यांत व्यायाम विषयक आवड उत्पन्न केली होती. हरएक खेळात श्री. कोपर्डेकर हे मुलांचे बरोबरीने खेळत व मुलांना खेळवीत. शिक्षक स्वत: मुलांबरोबर मिळूनमिसळून  व्यायामक्षेत्रात काम करू लागताच त्याचा इष्ट तो परिणाम मुलांवर होतो व मुलांचा त्या शिक्षकाबद्दलचा आदरही दुणावतो.  

बालवीर चळवळ :
पहिल्या जागतिक महायुद्धानंतर लॉर्ड बेडन पॉवेल यांनी जागतिक स्वरूपाची बालवीर चळवळ सुरु केली. ब्रिटिश वसाहतीत सर्वत्र त्या चळवळीचा प्रसार झाला. हिंदुस्थानात ही चळवळ सुरु झाली. विद्यालयातील बौद्धिक शिक्षणास बालवीर चळवळीची जोड मिळाल्यास शीलवर्धक नागरिक शिक्षण मिळेल ह्या हेतूने १९२६ च्या सुरुवातीस विद्यालयात बालवीर शिक्षणाचा श्रीगणेशा सुरु करण्यात आला. विद्यालयाच्या बालवीर पथकात ६०-६५ बालवीर होते. ते सार्वजनिक समारंभात स्वयंसेवकांचे काम करीत असत. याशिवाय सहली, प्रवास वगैरे कार्यक्रमही उत्साहाने पार पाडीत. या चळवळीस श्री. दादासाहेब पारधी यांची मदत होती. शैक्षणिक बाब इतक्याच दृष्टीने चालकांचे या चळवळीकडे लक्ष होते. मुलांप्रमाणे मुलीनाही नागरिकत्वाचे शिक्षण हवे होते म्हणून व ते देणे इष्ट वाटल्यावरून सौ.चंद्राबाई पारधी यांचे पुढाकाराने मुलींचे ‘ गर्ल्स गाईड’ पथक सुरु करण्यात आले.पथकाचे चालकत्व सर्वस्वी सौ.पारधी यांचेकडे होते. या मुलींच्या पथकात सुमारे २०-२५ मुली असत. सन १९२८ मध्ये विद्यालयात मुलांचे पार्लमेंट स्थापन झाले व त्यामुळे बालवीर चळवळीतील पुष्कळशी कामे पार्लमेंट मार्फत होऊ लागली व बालवीर चळवळ बंद पडली. १९३६ मध्ये छात्रसमितीचे कार्य जोमाने सुरु झाले. त्यावेळी शिस्तमंडळ व परिषद मंडळया दोन मंडळांकडे जवळ जवळ बालवीर मंडळांचे सर्वच्या सर्व काम आले. विद्यालयीन जगात स्वयंसेवकांची आवश्यकता आहे व विद्यालयापुरतेच क्षेत्र छात्रसमितीने आखून घेतल्यामुळे सर्व प्रकारचे उपयुकत शिक्षण मुलांना मिळणे व त्यांनी मिळवणे शक्य आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट स्वंसेवक म्हणून कार्यक्षम करणे छात्रसमितीच्या कर्तव्यक्षेत्रात येऊ शकत असल्याने निराळे स्वयंसेवक दल उभारण्याची विद्यालयास आता गरज भासत नाही.

विदेशी खेळ :
क्रिकेट, फुटबॉल बॅडमिंटन व व्हॉलीबॉल या चार खेळांकरता साहित्य दिले जाई. पण त्यावेळी देशी खेळांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष जास्त होते  त्यामुळे हे खेळ मागे पडले.

विद्यार्थ्याचे देशी खेळातील क्रीडानैपुण्य: –
१९३७-३८ मध्ये मुंबई नॉर्थ व उपनगर शिक्षक संघामार्फत वैयक्तिक व सांघिक खेळांचे सामने सुरु झाले. त्यात विद्यार्थी संघांनी सतत तीन वर्ष ‘खो खो या खेळाची ढाल मिळवली. मुलींच्या संघांनी ‘लंगडी’ या खेळाची ढाल सतत दोन वर्ष मिळवली. प्रशस्तिपत्रके मुलांनी वैयक्तिकरीत्या मिळवली ती वेगळीच. १९३८ मध्ये मुंबई शारीरिक शिक्षण मंडळातर्फे झालेल्या सामन्यात मुलामुलींच्या संघांनी चषक व ढाली मिळवल्या.

याशिवाय १९४३ पासून मुंबई शारीरिक शिक्षण मंडळातर्फे आंतरशालेय हिंदी खेळांच्या सामन्यातील मुलांच्या संघांकरीता ‘ टोपीवाला हिंद ट्रॉफी’ व मुलींच्या संघांकरिता ‘राणी लक्ष्मीबाई हिंद ट्रॉफी’ ठेवण्यात आल्या. या दोन्ही ट्रॉफीज् विद्यालयाच्या मुलांच्या संघानी पहिल्याच वर्षी व मुलींच्या संघांनी सतत तीन वर्ष विद्यालयास मिळवून दिल्या. मुलींच्या संघाने सतत आठ वर्ष स्त्रियांच्या गटासाठी ठेवलेल्या हिंदी खेळांच्या खुल्या सामन्यात दरवर्षी यशस्वी होऊन आठही वर्ष चषक मिळविले.

विद्यार्थी सहाय्यक योजना :
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व उपकरणे मिळावीत यासाठी छात्रसमितीचे विद्यार्थी सहाय्यक मंडळ निधी जमवते.जुनी पुस्तके एक वर्षासाठी वापरायला देतात. तसेच स्वावलंबी, गरीब व  होतकरू विद्याथ्यांना नादारी अथवा अर्धनादारी मंजूर करण्याचे काम शिक्षक सल्लागार समिती करते, त्यावेळी नादारीचे प्रमाण शेकडा ८ असे होते.

पहिला गणवेश :
प्रत्येक संस्थेला आपल्या शाळेतील मुलांसाठी गणवेशाची आवश्यकता असते. या गणवेशामुळे एक वेगळी ओळख त्या मुलांना आणि पर्यायाने शाळेला मिळते. १५ ऑगस्ट १९३६ या दिवशी पालकांच्या संमतीने शाळेतील प्रत्येकाला गणवेश असावा असे ठरले. गडद निळी अर्धी विजार, पांढऱ्या अर्ध्या अस्तन्याचा सदरा व काळी टोपी असा गणवेश निश्चित केला. आज ८४ वर्षांनंतरही थोडा बदल सोडला तर हाच गणवेश चालू आहे. मोठ्या विद्यार्थ्यांना पूर्ण विजार पण निळ्या रंगाचीच व काळी टोपी बंद करण्यात आली. मुलींचे कपडे त्याच रंगाचे ठेवण्यात आले.

सांघिक कवायत :  
शिस्तीस अत्यंत उपयुक्त म्हणून सांघिक कवायत १९३६ पासून सुरु झाली.सुरवातीस आठवड्यातून एक वेळा घेतली जाणारी हि कवायत आठवड्यातून पाच दिवस दररोज २० मिनिटे पर्यंत घेतली जाऊ लागली. दार शनिवारी बँड वर घेतली जायची.

स्टेशनरी स्टोर :
मुलांना लेखन साहित्य , वह्या वगैरे विद्यालयातच विकत मिळावे म्हणून विद्यालयाच्या देखरेखीखालींएक छोटेसे स्टेशनरीचे दुकान गेली २० वर्षे चालवले जात आहे.नफा हि बाब न ठेवता मुलांची सोय हे धोरण त्यामागे होते. दुकानात झालेल्या नफ्यातून तेथे काम करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना काही मदत दिली जावी अशी योजना आहे.

पालकांना विनंती (१९३० ते १९३९)
शारीरिक व बौद्धिक शिक्षणाच्या योजना पार पाडण्यास पालकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी  नेमून दिलेला अभ्यास करतो कि नाही याकडे पालकांनी नियमित लक्ष पुरवल्यास शाळेला मदत होईल. क्रमिकेतर कार्यक्रमात बरेचसे विद्यार्थी लक्ष घालत नाहीत. त्यांना भाग घायला लावण्यास पालकांना शक्य आहे. शाळेत होणाऱ्या वैद्यकीय तपासणीच्या परिणामांकडे व वैद्यकीय सल्ल्याकडे लक्ष दिल्यास डॉक्टरांच्या परिश्रमाचे सार्थक होईल. शाळेच्या अभिवृद्धीबद्दल पालकांच्या विधायक सूचना शाळेच्या वाढीस पोषक होतील.

वरील अभ्यासेतर उपक्रमातल्या अनेक गोष्टी अजून चालू आहेत. वेगळेपण दिसते ते निबंध , वक्तृत्व यासाठी निवडलेल्या विषयात. मुलांमध्ये शिस्त लागावी, स्वावलंबनाचे धडे मिळावेत, नेतृत्व गूण अंगी यावेत यासाठी छात्रसमिती, बालवीर , स्काऊट असे उपक्रम सातत्याने चालू ठेवायला हवेत.

पालकांना केलेली विनंती बघितली तर ती सध्याचीच वाटते.

सुरवातीलाच शिक्षणाचा व त्याचबरोबर इतर उपक्रमांचा भक्कम पाया घातला  गेला. त्यामुळेच आज संस्थेच्या सर्व शाळांची वाटचाल योग्य दिशेने व सुरळीतपणे चालू आहे.