विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत : शतकमहोत्सव सदर क्र.4

शतकमहोत्सव सदर क्र.4: विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत

विद्यालयाच्या मालकीची पहिली इमारत

आपण पाहिले कि सुरवातीला इंग्रजी शाळांचे वर्ग भास्कर भिडे यांच्या घरी तर मराठी शाळांचे वर्ग दादासाहेब पारधी यांच्या घरी भरत असत. थोड्याच अवधीत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. पहिल्या वर्षाच्या अखेरीसच शाळेला मिळणारा प्रतिसाद बघून शाळेसाठी एक स्वतःच्या मालकीची स्वतंत्र इमारत असावी व त्या दिशेने त्वरित प्रयत्न करावेत असे ठरले. विद्यालयाचे अनेक हितचिंतक होते आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या  देणगीतून  शाळेचा दैनंदिन खर्च भागत असे. परंतु शाळेची इमारत बांधण्यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक होते.

सर्वात प्रथम जर कुणी पाऊल उचलले असेल तर ते पार्ल्यातील दानशूर व्यक्ती श्री विष्णू बाळकृष्ण परांजपे यांनी. त्यांच्या मालकीची असलेली ९६६ चौरस वार मौल्यवान जागा विद्यालयाला विनामूल्य दिली.तसेच त्या जागेच्या पूर्वेस व उत्तरेस रस्तेही बांधून  दिले.

या व्यतिरिक्त श्री फाटक व श्री पारधी यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये, भास्कर राव भिडे व शंकरराव कुंटे यांनी प्रत्येकी पाचशे रुपये तर इतर हितचिंतकांनी अनेक छोट्या मोठ्या देणग्या दिल्या.

या भांडवलाचे आधारावर चैत्र शुद्ध ९  शके १८४४ ( ६ एप्रिल १९२२) रामनवमीच्या मुहूर्तावर इमारतीचे बांधकामाला सुरुवात झाली. इमारतीचे आराखडे मुंबईतील कोरा आणि भट या कंपनीच्या चालकांपैकी  पैकी श्री सी बी कोरा यांनी तयार केले व ते कार्य त्यांनी विद्यालयासाठी विनामूल्य केले.

एकंदर इमारत बांधकामासाठी येणाऱ्या खर्चाची कल्पना देण्यात आली होती. या इमारत बांधकामाच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी या कामांमध्ये हिरीरीने भाग घेतला व उदार धनिकांच्या देणग्या व स्वावलंबी स्वयंसेवकांची मेहनत यांचा सुंदर समन्वय विद्यालयाच्या स्थापनेपासून दिसून येत होता.

सन १९२३ च्या प्रथमार्धात विद्यालयाची इमारत विद्यालयाचे मालकीचे जागेत उभी राहिली. इमारतीची वास्तुशांत दादासाहेब पारधी व त्यांच्या  पत्नी चंद्राबाई  पारधी यांच्या हस्ते झाली. मार्च १९२३ सुमारास शाळेचे वर्ग या नव्या इमारतीत भरू लागले. श्री विष्णू बाळकृष्ण परांजपे यांनी विद्यालयाला क्रीडांगणासाठी सुमारे सव्वाचार हजार वाराचा विस्तृत प्लॉट विनामूल्य दिला . दादासाहेब पारधी यांनी आर्थिक बाजू उचलली. त्यांचे इमारत बांधकामापोटी सुमारे ३५००० रुपये खर्च झाले.  विद्यालयाच्या कामात अनेक व्यक्तींनी आपल्या परिस्थितीनुसार यथाशक्ती मदत केली. काहींनी शारीरिक तर काहींनी आर्थिक.

आता विद्यालयाला स्थैर्य प्राप्त झाले. परंतु हे स्थैर्य प्राप्त करून देण्याचे श्रेय मुख्यत्वेकरून दोन व्यक्तींना जाते . ते म्हणजे तात्यासाहेब उर्फ विष्णू बाळकृष्ण परांजपे व दादासाहेब उर्फ त्रिंबक मोरेश्वर पारधी.या दोघांनीही निरपेक्ष बुद्धीने दिलेले दान होते. आपले कुठे नाव द्यावे अशी अपेक्षाही नव्हती.      

अशा ह्या सात्विक दानाच्या अधिष्ठानावर पार्ले विद्यालय असोसिएशन हि संस्था उभी आहे.खरंतर हि संस्था नसून विद्यादानाचे एक पवित्र मंदिर आहे.या मंदिरात विद्यादानाचा नंदादीप अखंड तेवत राहील.