मुलींचे शिक्षण – शतकमहोत्सवी सदर क्र 2

मुलींचे शिक्षण – शतकमहोत्सवी सदर क्र 2

१९२१ साली पार्ल्यात वस्ती फार नव्हती. मुलींच्या शिक्षणाची आबाळ होत होती. त्यांच्या शिक्षणाची सोय करण्याचे महत्वाचे कार्य करणाऱ्या तीन धडाडीच्या भगिनींची दखल आपल्याला घ्यावीच लागेल.

 त्या भगिनी होत्या  चंद्राबाई  पारधी , कमलाबाई भिडे व गंगाबाई उर्फ बगूताई कुंटे  .          

 या मुलींच्या शिक्षणाची सुरवात जानेवारी १४, १९२१ रोजी मकरसंक्रांतीचे दिवशी सार्वजनिक हळदीकुंकवाचे निमित्त करून श्री दादासाहेब पारधी यांच्या बंगल्यावर झाली.

चंद्राबाई  पारधी , गंगाबाई उर्फ बगूताई कुंटे व कमलाबाई भिडे  या मुलींना  शिकविण्याचे काम स्वत: हौसेने व कर्तव्यबुद्धीने करीत असत.  उपकरणे व साहित्य लागत असे तो सर्व खर्च. पारधी या एकट्या सोशित. या शिकणाऱ्या सर्व मुली जुलै १९२१ पासून पारले टिळक विद्यालयाच्या मराठी शाळेत दाखल झाल्या.

या तिन्ही भगिनींचा परिचय थोडक्यात  पुढे दिला आहे. यातून  आजच्या पिढीतील मुलींना निश्चित प्रेरणा मिळेल.


चंद्राबाई त्रिंबक पारधी :   

 चंद्राबाई त्रिंबक पारधी ह्या पार्ले टिळक विद्यालयाच्या आद्यप्रवर्तकांपैकी श्री दादासाहेब पारधी यांच्या पत्नी होत.        

   मुलींच्या हरएक शिक्षण बाबतीत चंद्राबाई पारधी लक्ष पुरवीत. शिवणकाम शिक्षणाची त्यांनीच सुरुवात केली. अगदी प्रारंभीच्या दोन वर्षात तर पारधी यांची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी पार्ले टिळक विद्यालय  मराठी शाळेच्या ऑनररी लेडी सुप्रीटेंडंट म्हणून नेमणूक केली होती. हे काम पारधी यांनी आनंदाने केले. पारधी यांचे विद्यालयावर मुलीसारखे प्रेम होते. १९२६ ते १९३० च्या दरम्यान ५/६ वर्षात त्या मुलींच्या ‘ गर्ल गाईड’ पथकाच्या मार्गदर्शिका होत्या. विद्यालयातील सुमारे २५-३० मुलींचे गर्ल गाईड पथक यशस्वीरीत्या चालविण्याचा मान पारधी यांचा आहे. या पथकाच्या सहली , प्रवास, कॅम्पस, परेड्स वगैरे कार्यक्रमांना स्वत:  पारधी याच चालना देत. या त्यांच्या कामात विद्यालयातील शिक्षिका श्रीमती रमाबाई रोडे व कुमारी कुसुम  गुप्ते या दोघी मदत करीत.

              सन १९३० च्या जानेवारीत मकरसंक्रांतीचे सुमारास विद्यालयात एक मोठे ‘ स्त्रियांच्या हस्त कौशल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्या प्रदर्शन कमिटीच्या पारधी या अध्यक्ष होत्या. या प्रदर्शनाइतके आकर्षक व मोठे असे प्रदर्शन यापूर्वी पार्ल्यात भरले नव्हते. या प्रदर्शनाचे सजावटीस श्री. त्रिं. मो. पार्धी यांनी बरीच मदत केली होती व पुष्कळसे प्रचारकार्य विद्यालयातील एक शिक्षक कै. श्री. भी. गु. कुळकर्णी (कु. यशोद ) यांनी केले होते.

             पारधी  ह्या जरी विश्वविद्यालयीन पदवीधर नसल्या तरी अनुभवजन्य ज्ञानाच्या बाबतीत त्या फार थोर होत्या. विलायतेतील शिक्षणसंस्था त्यांनी पाहिल्या होत्या. शिक्षण पद्धतीचे दोष हे मुलींच्या शिक्षणातून अजिबात वगळून त्यांची शारिरीक व बौद्धिक वाढ कशी होईल त्या पद्धतीचे व संसारी जीवनास पोषक असे शिक्षण मुलींच्या शाळांतून चालू झाले पाहिजे असे त्यांचे मत होते.


कमलाबाई भास्कर भिडे:         

कमलाबाई भिडे ह्या पार्ले टिळक विद्यालयाच्या आद्यप्रवर्तकांपैकी भास्करराव भिडे यांच्या पत्नी होत. त्या शीघ्र कवयित्री होत्या.त्या शिक्षिका म्हणून चांगले काम करीत. हसतमुख चेहरा, आनंदीवृत्ती व खेळीमेळीने काम करण्याचा उत्साह या गुणांमुळे त्या सर्वांनाच हव्या हव्या असे वाटे. 


गंगाबाई शंकर कुंटे: (बगूताई कुंटे):

        चंद्राबाई पारधी व कमलाबाई भिडे यांच्या बरोबरीनेच  पुढाकार घेऊन मुलींच्या शिक्षणाची सोय करण्यात बगूताई याही होत्या.पार्ल्यांतील स्त्रियांच्या हरएक हितसंबंधी बाबीत जातीने लक्ष घालत.  

  पार्ल्यातील अनेक संस्थांमध्ये आपुलकीने काम करण्यात त्या नेहमी पुढे होत्या .त्या विशेषत: स्त्रियांच्या चळवळीत पडून स्त्रियांच्या उत्कर्षासाठी खटपट करण्यात पुढाकार घेत.