विद्यालयाचे उद्घाटन

वि‌द्यालयाचे उद्घाटन

पहिल्या सर्वसाधारण सभेच्या मूळ इतिवृत्ताचे छायाचित्र 

आज  मिती जेष्ठ शु ४ गुरुवार शके १८४३ (दिनांक ९ जून १९२१) रोजी सकाळी ८ वाजता पार्ले टिळक विद्यालयाचे उद्घाटन झाले. हस्तपत्रके पाठवून व स्टेशनवर वगैरे चिकटवून विलेपार्ले येथील तमाम लोकांस व काही बाहेरील सभ्य गृहस्थांस या समारंभास निमंत्रणे केली होती. समारंभास ६० लोक हजर होते. हा गोड समारंभ श्री त्रिं. मो. उर्फ दादासाहेब पारधी यांच्या बंगल्यात झाला.या समारंभाचे अध्यक्षस्थान पार्ल्यातील एक जुने नागरिक श्री. विष्णु बाळकृष्ण उर्फ तात्यासाहेब परांजपे यांना देण्यात आले होते.
या समारंभास मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कनिष्ठ बंधु डॉ. नारायण दामोदर सावरकर हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षांचे परवानगीने श्री वि.स घाटे यांनी शाळेचा पूर्वेतिहास संगितला  ते म्हणाले की,

“मुंबईस मराठी भाषा बोलणाऱ्यांच्या शिक्षणाच्या सोयी अनेक आहेत.परंतु बी.बी. सी. आय. रेल्वे  लगतच्या गावातून मुंबई किंवा दादर येथील शाळेत मुले धाडणे पालकांस फार अडचणीचे व धोक्याचे वाटते. साधारणपणे दादर सोडल्यावर  बी.बी.सी.आय. रेल्वेवर सांताक्रूझ ,विलेपार्ले ,मालाड ,बोरिवली ,विरार इत्यादी ठिकाणी मराठी बोलणाऱ्यांची वस्ती फार आहे. त्यातल्या त्यात विलेपार्ले येथी हवा चांगली असून ते गाव मुंबईपासून फार दूरही नाही व फार नजिकही नाही.
या ठिकाणी जर एखादी शिक्षण संस्था निघाली तर ती वर सांगितल्याप्रमाणे लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचे एक केंद्रस्थान होऊन बसेल हि गोष्ट विलेपार्ले येथिल लोकांच्या लक्षात बरेच दिवसापासून होती
. तसेच राजातर्फे व प्रजातर्फे राष्ट्राच्या अभ्युदयासाठी चाललेल्या घडामोडींमुळे प्रचलित शिक्षणाची व्यंगेंही स्पष्ट दिसू लागली होती.  
ती लक्षात घेउन लोकमान्य टिळक स्मारक फंड कमिटी व पार्ले सार्वजनिक मंडळ या दोहोंच्या सुंदर मिलाफामुळे व तसेच पार्ल्यातील उदार धनिक, उद्योगी व सुशिक्षित लोक यांचा जोडयत्न यामुळे पार्ले टिळक विद्यालय उघडण्याचा आज मंगल समारंभ होत आहे. त्यास पुष्कळ लोकांनी हजर राहून त्या विद्यालयासम्बधी आपली  प्रेमाची भावना व्यक्त केली.
खरोखर कार्य अजून पुढेच आहे परंतु ते कार्य वर सांगितलेल्या पार्ले येथील लोकांच्या जोडगुणामुळे अव्याहत चालण्याची अशा आहे. यानंतर कै.श्री.गोपाळराव फाटक (विद्यालयाचे तेव्हाचे खजिनदार) यांनी अध्यक्षांना विद्यालयाचे नावाचा फलक दिग्दर्शित करून विद्यालयाचे उद्घाटन करण्यास व लोकमान्य टिळकांचे छायाचित्रास पुष्पहार अर्पण करण्यास विनंती केली. उद्घाटनानंतर अध्यक्षांनी विद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त केली. 

मग डॉ. नारायणराव सावरकर यांचे विद्यालयाच्या अभिनंदनपर भाषण झाले. डॉक्टरसाहेबांनी लोकमान्यांच्या जीवनकार्याची थोडी माहिती देउन पार्लेकरांना त्यांनी अंगीकृत कार्याचे महत्व ध्यानी आणून दिले व संस्थेस शुभाशीर्वाद दिला.
यानंतर अध्यक्ष श्री. तात्यासाहेब परांजपे यांनी सर्वास या कार्याचे शुभ चिंतून त्यास हातभार लावण्याची विनंती केली.
 आभार प्रदर्शन , हारतुरे, मुलांस खाऊ वगैरे झाल्यावर हा छोटासा गोड समारंभ पार पडला.