माझी पारले टिळक विद्यालयाच्या पाडव्याची (पहिल्या दिवसाची) पहिली आठवण -
मला अजून त्या दिवसाची चांगली आठवण आहे. मी मराठी ४थी इयत्ता पास झाल्यावर माझे नांव इंग्रजी १ ल्या इयत्तेत दाखल करून घेण्याकरिता कोठेतरी पारल्याच्या बाहेर जावे लागणार असे माझ्या वडिलांना वाटत होते. माझ्या वडिलांप्रमाणेच आणखीहि कांही पारल्यातील पालकांच्या समोर आपल्या मुला-बाळांच्या दुय्यम शिक्षणाचा प्रश्न उभा होताच. इतक्यांत पारलेकरांची सर्वसाधारण सभा भरून लोकमान्य टिळकांचे स्मरणार्थ एक आदर्श शिक्षणसंस्था स्थापन करण्याचे ठरले.
दिनांक ९ जून १९२१ या दिवशी त्या वेळचे पारल्यातील एक कसून काम करणारे कार्यकर्ते रा.रा. जमण्णा देशपांडे यांचेबरोबर मी शाळेत गेलो. आमच्या तमण्णांनी जमलेल्या विद्यार्थ्यांची (फक्त ४ च होते) व शिक्षकांची (फक्त एकच होते त्या दिवशी) ओळख करून देऊन ते निघून गेले. देशपांडे निघून गेल्यावर आम्हाला खालील प्रार्थना म्हणण्यास सांगितले. ‘‘हे जगज्जीवना परमेश्वरा ! सर्वेचे कल्याण असो. आमच्या हिंदमातेचे रोग, दुष्काळ, दैन्य सर्व दूर कर. तिच्या मुलांना सद्बूद्धी दे. तिला पूर्वीसारख वैभव प्राप्त होचो.’’
किती सुंदर व अर्थपूर्ण प्रार्थना होती ती !!
आमची शाळा म्हणजे रा. रा. भिडे (हल्लीचे विद्यालयाचे अध्यक्ष) यांचे माडीवरील एक खोली. त्या खोलीत एक लांब बाक (नुसते बसण्याचे), एक खुर्ची (टेबल नव्हतेच), पुस्तकांकरिता एक देवदारी पेटी, एक फळा, एक शिक्षक व आम्ही चार विद्यार्थी. आमच्या या गुरुजींचे नाव म. गो. पिंगळे व विद्यार्थ्यांची नांवे अनुक्रमे (१) कृ. र्शं पटवर्धन, (२) प्र. गो. फाटक, (३) कृ. ज. दामले (४) मो. के. गानू.
नंतर कांही दिवसांनी हीच मुलांची संख्या सातपर्यंत गेली व त्या साताचे आज सातशो विद्यार्थी झालेले पाहून या शाळेचा पहिला विद्यार्थी या नात्याने मला फारच आनंद होत आहे.
आपल्या संख्येची वाढ होवो अशी परमेश्वरापाशी प्रार्थना करून मी शाळेच्या इतिहासांतील पहिल्या दिवसाची पहिली गोड आठवण संपवितो.
दादर, दिनांक ३०.८.१९४६
कृ.शं. पटवर्धन
बी.एस् सी., बी.टी