महासागर OCEAN याविषयावरील भव्य प्रदर्शन -दुसरा दिवस
रविवार ७ जाने.२४ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून अनेकांनी प्रदर्शनाला भेट दिली. दु. ३.३० वा. व्हाईस ॲडमिरल किशोर ठाकरे (निवृत्त) यांचे प्रदर्शन स्थळी आगमन झाले. एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी सलामी देवून पाहुण्यांचे शानदार स्वागत केले. यावेळी ॲडमिरल किशोर ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदल याविषयी विस्तृत सादरीकरण केले. त्यांच्या माहितीपूर्ण सादरीकरणाचा लाभ विद्यार्थी ,सर्व शिक्षक, आणि प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या पालक आणि नागरिकांनी घेतला. त्यानंतर पाहुण्यांनी प्रदर्शनातील सर्व कक्षांना भेट देवून विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.
संध्याकाळी दर्शकांची गर्दी खूपच वाढली . मराठी शाळेला सुभाषरोडच्या बाजून वळसा घालून रांग बाहेर पर्यंत पोहोचल्याचे दृश्य होते. शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी शिपाई दादांच्या मदतीने गर्दीचे नियोजन करत काही वेळातच सर्वांना प्रदर्शनात प्रवेश मिळण्याची व्यवस्था केली.
संध्याकाळी ७ वाजता दरवर्षी प्रमाणे प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शानदार संचलनाला सुरूवात झाली. प्रथम एन सीसी पथकाने पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर लेझीम पथकाने सुंदर फॅारमेशन करत रॅलीला सुरूवात झाली. एका मागोमाग एक सर्व शाळांचे मुख्याध्यापक आपल्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या चमूसह रॅलीत सहभागी झाले. या नंतर या कल्पक उपक्रमाची संकल्पना ज्यांची आहे ते संस्थेचे सह कार्यवाह श्रीयुत हेमंत भाटवडेकर यांनी सर्वांचे आभार मानले. गेली पाच वर्षे भाटवडेकर सर स्वतः प्रदर्शनाचा विषय ठरवण्यापासून ते प्रदर्शनाच्या सांगते पर्यंत प्रत्येक गोष्टीत सक्रिय सहभागी होतात, किबहुना प्रदर्शनाच्या टीमचे ते “ Non Playing Caption” आहेत अस म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
प्रदर्शन उभारणीत ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले ते डेकोरेटर्स, प्रिंटर्स, हाऊसकिपिंग, सेक्युरिटी आणि केटरर्स या सर्वांना यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल गानू, कार्यवाह श्री दिलीप पेठे, खजिनदार श्री. धुरंधर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.