महासागर याविषयावरील भव्य प्रदर्शन – पहिला दिवस
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे नवीन वर्ष नेहमीच उत्साहात आणि कार्यमग्नतेत सुरु होते. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या प्रांगणात भव्य प्रदर्शन भरवण्यात येते. पा टि वि अ च्या पाचही शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन एका विषयाची संपूर्ण माहिती देणारे प्रदर्शन भरवतात. २०१७ साली प्रथम हा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला.इतिहास या विषयावर हे पहिले प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यानंतर करोनाची दोन वर्षे वगळता आतापर्यंत चार प्रदर्शने भरवण्यात आली. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. या वर्षी शनिवार ६ जानेवारी आणि रविवार ७ जानेवारी २०२४ ला हे प्रदर्शन भरवण्यात आले. यावर्षी ‘ओशन अर्थात महासागर’ याविषयावर हे प्रदर्शन भरवण्यात आले . राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या मुंबई विभागाच्या प्रमुख वैज्ञानिक डॅा. सोनिया सुकुमारन यांच्या हस्ते ६जाने.२४ रोजी सकाळी ८.३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
यावेळी डॅा. सुकुमारन यांनी विद्यार्थ्यांना समुद्रविज्ञान अर्थात ओशनोग्राफी या विषयावर अत्यंत प्रेरणादायी माहिती दिली.
यावर्षी प्रदर्शनात
विश्व महासागरांचे,
A VISUAL JOURNEY THROUGH OCEANIC DYNAMICS,
चला शोधूया –
लाटांमधील वाटा,
Marine life of oceans,
Aqua Escape: Your Passport to Tranquil Adventures.,
Careers and Future in Oceanography
अश्या शीर्षकाची विविध दालने होती. वैशिष्ट्यपूर्ण मांडणीतून दर्शकांना जणू काही सागराच्या आतमध्ये शिरल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. विविध मॅाडेल्सच्या साहाय्याने महासागरांची रचना, वैशिष्ट्ये, त्यातील जीवसृष्टी, जलमार्ग, व्यावसायिक उपयोग, नवीन संशोधन, समुद्रयान मिशन, करियरच्या संधी अशा सर्व बाजूंनी महासागर या विषयाची समग्र माहिती या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळाली. पाटिविअच्या पाचही शाळांमधील विज्ञान, भूगोल आणि कला शिक्षकांनी हे प्रदर्शन उभारण्यासाठी अपार मेहनत घेतली. शाळांमधील विद्यार्थी प्रदर्शनात सहभागी होउन अतिशय प्रभावीपणे दर्शकांना विषयाची माहिती विविध कल्पक पद्धतींनी देत होते. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते. पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली.