Home » PTVMM Secondary Section – About School

PTVMM Secondary Section – About School

WELCOME TO PTV Marathi Medium Secondary Section

About School 

पार्ले टिळक विदयालय – माध्यमिक शाळा (मराठी माध्यम)

शाळेची माहिती -

          लोकमान्य टिळक यांच्या कर्तृत्वाने व राष्ट्रवादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या काही ध्येयवादी पार्लेकरांनी लोकमान्यांचे एक सचेतन स्मारक पार्ल्यात उभारण्याचे ठरविले. दि. ९ जून १९२१ रोजी हे ध्येय “ पार्ले टिळक विदयालय ” या शाळेच्या स्थापनेने पूर्णत्त्वास आले. केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विदयालयाचा श्रीगणेशा झाला. चार विदयार्थ्यांसह ९६ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विदयालयात आज दोन हजार विदयार्थी शिक्षण घेत आहेत.

           ‘पार्ले टिळक विदयालय’ संस्थेचा जन्म राष्ट्रीय अस्मितेतून, त्याग भावनेतून व उच्च महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. उत्तमोत्तम मुख्याध्यापक, शिक्षक यांची परंपरा विदयालयाला लाभली आहे. विदयालयाच्या परंपरेचा वसा आताच्या मुख्याध्यापिका श्रीमती लतिका ठाकूर या चालवत आहेत. विदयालयातील अनेक गुणवंत शिक्षकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. You tube सारख्या आधुनिक प्रसार माध्यमातूनही आमच्या विदयालयातील शिक्षक विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
अनेक नामवंत माजी विदयार्थ्यांची परंपरा विदयालयाला लाभली आहे. विविध क्षेत्रांत या मान्यवरांनी विदयालयाचेच नव्हे तर आपल्या देशाचेही नाव उज्ज्वल केले आहे.

विदयालयाची यशोपताका फडकवणारे काही निवडक माजी विदयार्थी खालीलप्रमाणे आहेत.

1) सुप्रसिद्ध साहित्यिक कै. पु. ल. देशपांडे

महाराष्ट्राचे लाडके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. प्रवासवर्णन, नाट्यलेखन, संगीत, अभिनय अशा अनेक क्षेत्रांतील गुणग्राही कलावंत. तुझे आहे तुजपाशी, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, अपूर्वाई, पूर्वरंग या साहित्यकृतींना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार तर व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिचित्रणपर पुस्तकाला १९६६ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. भारत सरकारतर्फे १९६६ मध्ये पुलंना ‘पद्मश्री’ व १९९० मध्ये ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले.

2) श्री. प्रदीप नाईक – माजी हवाईदल प्रमुख

3) शेतकरी आंदोलनाचे नेते कै. शरद जोशी
महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते. १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना त्यांनी केली. ‘शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व त्यांनी केले. सप्टेंबर २००० ते जुलै २००१ या काळात भारत सरकारच्या कृषिविषयक कार्यबलचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २००४ ते २०१० या खासदारकीच्या काळात संसदेच्या १६ विविध समित्यांचे ते सदस्य होते. ‘अंगारमळा’ या पुस्तकासाठी सन २०१०चा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार व मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानचा सन २०११चा जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

4) क्रिकेटपटू श्री. अजित पै

सलामीवीर आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. अजित पै यांनी मुंबईसाठी रणजी करंडक स्पर्धेत १९६८-६९ च्या मोसमात पदार्पण केले. पहिल्या तीन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ११ बळी घेतल्यानंतर त्यांना दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी निवडले गेले. त्यांनी २५.८० च्या सरासरीने १२९ धावा व २३.२१ च्या सरासरीने २३ बळी टिपले.

5) कै. ले. मकरंद घाणेकर – सैन्यदल अधिकारी

ले. मकरंद घाणेकर यांना देशासाठी लढताना दि. ०६ डिसेंबर १९७१ रोजी वीरगती प्राप्त झाली.

6) कै. कॅ. विनायक गोरे - सैन्यदल अधिकारी

कॅ. विनायक गोरे यांना वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी दहशतवाद्यांच्या विरोधात कुपवाडा (जम्मू-काश्मीर) भागात ‘ऑपरेशन रक्षक’ मध्ये सहभागी असताना दि. २६ सप्टेंबर १९९५ रोजी वीरमरण प्राप्त झाले.

अशा अनेक विदयार्थ्यांनी शाळेच्या यशोगाथेत मानाचे स्थान पटकाविले आहे.

विज्ञान मंडळ, निसर्ग मंडळ, विदयार्थी मंडळ, सहली, विदयार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, व्यवसाय मार्गदर्शन, नकाशा मार्गदर्शन, पाठांतर स्पर्धा, हस्तलिखिते, शैक्षणिक प्रकल्प, विज्ञान प्रदर्शन, शिक्षक प्रशिक्षणाद्वारे विदयार्थी व शिक्षकांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

शाळा म्हणजे केवळ दगड-विटांच्या भिंती नव्हेत तर शाळा म्हणजे विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास यासाठी आमच्या शाळेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. विस्तृत क्रीडांगण, क्रीडासाहित्य, शैक्षणिक साधने, अद्ययावत संगणक कक्षा, सुसज्ज प्रयोगशाळा, भूगोल दालन, समृद्ध ग्रंथालय या सर्व सोयींचा लाभ विदयार्थ्यांना घेता येतो.

बदलत्या काळानुरूप विदयालयाच्या जुन्या वास्तुची जागा आज नव्या भव्य वास्तुने घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शाळेतही नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग अध्यापनासाठी केला जात आहे. मराठी अस्मिता, संस्कृती व परंपरा यांची जपणूक करून शतक महोत्सवी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या आमच्या विदयालयासाठी म्हणावेसे वाटते...

दश-दिशांतून तुझ्या कीर्तीचे पडघम दुमदुमती |

विदयार्थी आमचे नवयुगाचे स्वागत जणू करती ||

उज्ज्वल भविष्य या मातेचे सांगत कृती उक्ती |

पार्ले टिळकची यशोकीर्ती दिगंत या जगती ||

****

THE PRINCIPAL

लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर पार्ल्यातील काही रहिवाशांनी टिळकांचे शैक्षणिक स्मारक निर्माण करण्याच्या हेतूने ‘पार्ले टिळक विदयालय’ ही संस्था १९२१ साली स्थापन केली.गेल्या ९७ वर्षांत या रोपट्याचा महावटवृक्षाप्रमाणे विस्तार झाला. त्याची एक शाखा म्हणजेच पार्ले टिळक विदयालय - माध्यमिक शाळा (मराठी माध्यम) होय.

विदयालयाच्या सुरुवातीपासून श्री. पिंगळे, श्री. आगाशे, श्रीमती मराठे, श्री. पेंढारकर, श्री. कुलकर्णी, श्री. सहस्रबुद्धे, श्रीमती वाटवे, श्रीमती देव, श्रीमती करंडे, श्रीमती वाडेकर अशा दिग्गज शिक्षकांनी मुख्याध्यापक पद भूषविले. शैक्षणिक विकासाबरोबरच इतर सर्व क्षेत्रांत निरनिराळे प्रयोग करून प्रथितयश शाळेचा पाया भक्कम केला. शाळेची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात उंचावली.

अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा, विज्ञान अशा सर्व क्षेत्रांत विदयार्थी तरबेज व्हावेत म्हणून अनेकविध उपक्रमांचा पाया घालून एक आदर्श शाळा अशी प्रतिमा निर्माण केली. कै. नी.र.सहस्रबुद्धे यांना शासनाने राज्यपुरस्कार तर श्रीमती वाटवे यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विदयालयात विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. इ. ५ वी पासून सेमी इंग्लिशचे वर्ग घेतले जातात. विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विदयार्थी सहभागी होतात. विविध क्रीडास्पर्धांमध्येही विदयार्थी सहभागी होतात. काही विदयार्थ्यांनी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल यश मिळविले आहे. शाळा सुटल्यानंतर दररोज विदयार्थ्यांसाठी विविध खेळांची शिबिरे विनामूल्य घेतली जातात. अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांसाठी खास अध्यापन वर्ग घेतले जातात. शिष्यवृत्ती, बाल वैज्ञानिक, एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला वर्ग, एम.टी.एस. व एन.एम.एम.एस. वर्ग अशा स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते, विशेष अध्यापन वर्ग घेतले जातात. विदयालयाची स्वतःची व्यायामशाळा असून त्याठिकाणी विनामूल्य शिक्षण दिले जाते.

शाळेत व्यावसायिक समुपदेशक (ऑक्युपेशनल थेरेपिस्ट) आहेत. त्यांच्या मदतीने लेखनात कमी गती असणाऱ्याविदयार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे समुपदेशक आहेत. त्यांच्या मदतीनेही अभ्यासात कमी असणाऱ्या विदयार्थ्यांना, विशेष समस्या असणाऱ्या विदयार्थ्याना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. शाळेत सुसज्ज असे ग्रंथालय आहे. त्याचप्रमाणे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगाला पूरक अशी A.V. Room आहे. वक्तृत्त्व, निबंध, संगीत, नाट्य, पाठांतर, विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमध्ये विदयार्थ्यांना सहभागी केले जाते, त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.

कार्यानुभव विषयांतर्गत पाकशास्त्र, स्क्रीन प्रिंटींग, टंकलेखन, विणकाम, शिवणकाम, संगणक, तंत्रशिक्षण हे व्यवसायाभिमुख वर्ग चालवले जातात. राष्ट्रप्रेम, शिस्त यासाठी N.C.C., M.C.C. हे अभ्यासक्रम घेतले जातात. आज विदयालयाचे N.C.C. पथक मानबिंदू ठरले आहे.

विदयालयात विदयार्थी मंडळ, विज्ञान मंडळ, निसर्ग मंडळ, क्रीडा मंडळ कार्यरत आहेत. शाळेच्या निसर्ग मंडळातर्फे शाळेच्या एका कोपऱ्यात सुरेख अशी बाग तयार केलेली आहे. या बागेत विविध फुलझाडे, औषधी वनस्पती, शोभेच्या वनस्पती आहेत. या बागेत छोट्या स्वरूपात शेतीही केली जाते.

अशा प्रकारे विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहेमीच झटत असते. त्यामुळेच आज भारतात आणि परदेशातही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये शाळेचे विदयार्थी चमकताना दिसतात. त्यामुळेच जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असलेला विदयार्थी जेव्हा म्हणतो, ‘मी पार्ले टिळक विदयालयाचा विदयार्थी आहे.’ तेव्हा आम्हां शिक्षकांचाही ऊर भरून येतो, आकाश ठेंगणे वाटते.

विदयालयाची स्थापना करताना संस्थापकांनी विदयार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास करण्याचे जे ध्येय डोळ्यांपुढे ठेवले होते तेच अबाधितपणे, अखंडपणे साध्य करण्याचा प्रयत्न आजही केला जात आहे.

                                                                                                      * * *

प्रवेश :    इ.५ वी ते १० वी प्रवेशासाठी मुख्याध्यापिकांना भेटावे.